computer

सामाजिक अंतर राखणे म्हणजे काय? कोरोना विषाणू पसरू नये म्हणून हे का गरजेचं आहे?

कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे लांब पल्ल्याच्या बसेस, ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हटलं आहे की जर लोकांनी सहकार्य केलं नाही तर लोकल आणि बेस्टसेवा बंद करण्यात येईल. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून नाट्यगृह, जिम आणि स्विमिंग पूल बंद करण्यात आले आहेत. खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे सगळं गर्दी कमी व्हावी आणि लोकांमध्ये अंतर राखलं जावं यासाठी केलं जात आहे. कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या COVID-19 आजारावर औषध उपलब्ध नाही. आपल्याला COVID-19 होऊ नये यासाठी आपण काळजी घेऊ शकतो. त्याची पहिली सुरुवात होते ती इतरांपासून लांब राहण्यापासून. सध्या या मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. आज आपण या संकल्पनेवर सविस्तर माहिती वाचणार आहोत. इथे तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

सामाजिक अंतर राखणे म्हणजे काय?

सामाजिक अंतर राखणं म्हणजे तुमच्यात आणि इतरांमध्ये एक ठराविक अंतर राखणं. हे ठराविक अंतर म्हणजे कमीतकमी ६ फुट अंतर असायला हवं. याचा अर्थ लोकांशी कमीतकमी संपर्क ठेवायचा, शक्य असल्यास सार्वजनिक वाहनांनी प्रवास टाळायचा, शक्य असल्यास घरी राहूनच काम करायचं, गरज नसल्यास प्रवास टाळायचा, गर्दीची ठिकाणे टाळायची, इत्यादी इत्यादी.

तुम्ही जेवढं कमीतकमी लोकांच्या संपर्कात याल तितका हा आजार लोकांमध्ये पसरण्यास आळा बसेल. तुम्ही म्हणाल की मला तर आजार नाही ,मग मी हे नियम का पाळावेत? या प्रश्नाचं उत्तर पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया.

तरुण आणि सुदृढ व्यक्तीने सामाजिक अंतर राखलं नाही तरी चालेल का ?

कोरोनासारख्या व्हायरसचा सर्वाधिक धोका हा वृद्ध व्यक्तींना असतो.  हे जरी खरं असलं तरी याचा अर्थ तरुणांनी किंवा सुदृढ व्यक्तींनी काळजी घेऊ नये असा होत नाही. संसर्ग झाल्याच्या सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाही. त्यामुळे नकळत इतरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. जर आधीपासूनच एक ठराविक अंतर राखलं, तर रोग पसरणार नाही आणि तुम्ही स्वतःही सुरक्षित राहाल.

कॉलेज, मित्रांच्या भेटी किंवा नोकरीच्या निमित्ताने तरुणांचा लोकांशी मोठ्याप्रमाणात संपर्क येतो. त्यामुळे एकदम स्वतःला इतरांशी तोडणं कठीण जाऊ शकतं, पण जर वरती सांगितलेले नियम पाळले नाहीत तर स्वतः आणि इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

मी घरातून बाहेर पडू शकतो का?

ज्यांच्यावर संसर्ग असल्याचा संशय असतो, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायचं नसतं अशा व्यक्तींना Home Quarantined म्हणजे घरातल्या घरातच वेगळं ठेवलं जातं. आपण ज्या सामाजिक अंतर राखण्याबद्दल  बोलत आहोत, त्यात तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची परवानगी आहे. पण काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सामाजिक अंतर राखणे म्हणजे सर्वात आधी तर लोकांशी कमीतकमी संपर्क ठेवणे. याखेरीज तुम्ही जर बाहेर जाणार असाल,  तर हात वेळोवेळी सॅनिटायझरने स्वच्छ करा, लगेचच तुमच्या चेहऱ्याला, नाकाला, डोळ्यांना हात लावू नका, बाहेरून आल्यानंतर ताबडतोब हात धुवून घ्या, जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा, लहान बाळांच्या संपर्कात येण्यापूवी हात स्वच्छ आहेत ना याची काळजी घ्या.

घरात पाहुणे आलेले चालतील का?

तुम्ही इतरांच्या घरी जाऊ शकता किंवा इतर लोक तुमच्या घरी येऊ शकतात. पण तुम्ही ज्या लोकांच्या संपर्कात येणार आहात ते आजारी नाहीत ना, हे महत्त्वाचं आहे. तुमच्या घरी येणारे लोक हे आजारी असल्यास त्यांच्यापासून अंतर राखलेलं केव्हाही सोयीचं. यावर उपाय म्हणजे पुढचे दोन-एक आठवडे फोन आणि व्हॉट्सॲपवरून एकमेकांच्या संपर्कात राहा.

लहान मुलांना घराबाहेर नेऊ शकतो का?

जर मुलं आजारी असतील तर त्यांना बाहेर घेऊन जाऊ नका. जर मुलं आजारी नसतील, तरी त्यांना खेळण्यासाठी क्रीडांगणासारख्या ठिकाणी नेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मैदानात गर्दी असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे तिथे गर्दी नाही ना याची  खात्री करून घ्या. कमीत कमी मुलं असतील तर सोबत सॅनीटायझर ठेवा. जमल्यास मुलांच्या खेळण्याच्या जागा स्वच्छ ठेवा.

मुलांचे हात वेळोवेळी धुणे आणि मुलं अस्वच्छ हात तोंडात टाकत नाहीत ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनासारखा आजार लहान बाळांना होण्याची शक्यता कमी असली तरी त्यांच्यामुळे घरातील वृद्ध माणसांना रोगाची लागण होऊ शकते. 

हे कधी पर्यंत चालणार?

किती दिवस गर्दी टाळायची? किती दिवस मित्रांपासून लांब राहायचं? या प्रश्नाला तसं एकच एक उत्तर देता येणार नाही. रोग किती प्रमाणात पसरतोय किंवा तो कसकसा कमी होतोय यावर सर्व अवलंबून असेल. सध्याच्या अंदाजानुसार महिनाभर तरी आपल्या सर्वांना इतरांपासून लांब राहणंच सोयीचं आहे.

तर मंडळी, तसं पाहायला गेलं तर हे नियम आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलेलो आहोत. संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी वरती दिलेले सर्व नियम लागू पडतात. फरक एवढाच की आपण आजवर हे नियम फारशा गांभीर्याने पाळलेले नाहीत. आता या लहानसहान गोष्टी गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required