भारताचे अर्थमंत्री आणि संसद सदस्या यांच्या लग्नाची आगळीवेगळी गोष्ट !! वऱ्हाडी कोण होते माहित आहे??

आज आम्ही भारतातल्या एका आगळ्यावेगळ्या लग्नाची गोष्ट सांगणार आहोत. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे या लग्नाच्या नोंदणीच्या वेळी साक्षीदार म्हणून खुद्द जवाहरलाल नेहरूंनी सही केली होती. तिथे उपस्थित आणखी साक्षीदारांमध्ये इंदिरा गांधी या सुद्धा उपस्थित होत्या.

आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार की हे लग्न होतं तरी कोणाचं ? चला जाणून घेऊया.

स्रोत

सर्वात आधी मुलाची ओळख करून घेऊया. मुलगा पूर्वी रिझर्व बँकेचा गव्हर्नर होता. लग्नाच्या वेळी तो भारताचा अर्थमंत्री होता. मुलगी पण मुलाच्याच बरोबरीची भारतातली महत्वाची व्यक्ती होती. तिचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता, स्वातंत्र्यानंतर ती संसद सदस्य आणि नियोजन मंडळाची सदस्य होती. अशा या २ महत्वाच्या व्यक्तींचा हा विवाह होता.

मुलाचं नाव होतं सी. डी देशमुख आणि मुलगी म्हणजे दुर्गाबाई. बोभाटाच्या वाचकांना या लग्नाची फारशी माहिती नसेल कारण हे लग्न झालं १९५३ साली. आता जाणून घेऊया या लग्नाचा नाट्यमय प्रवास.

स्रोत

तर, सी. डी. देशमुख यांचं त्यापूर्वीच लग्न झालं होतं, पण १९४९ साली त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. पुढे जेव्हा दुर्गाबाईंशी त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचं वय होतं ५७ वर्ष तर दुर्गाबाई होत्या ४३ वर्षांच्या. दोघांच्याही वयात मोठं अंतर होतं मग दोघांनी एकमेकांना पसंत कसं केलं ? हा किस्सा वाचण्यासारखा आहे.

मंडळी, दोघं एकमेकांना फारसं ओळखत नव्हते, पण दोघांना एकमेकांच्या कामाबद्दल माहिती होती. दुर्गाबाई नियोजन मंडळाच्या सदस्या झाल्यानंतर त्यांचा जवळून संपर्क आला. दुर्गाबाईंकडे पुनर्वसन आणि सहकार ही खाती होती. देशमुखांकडे अर्थखाते होते. दोघांचाही कामाच्या निमित्ताने वारंवार संपर्क होऊ लागला.

स्रोत

एकदा दुर्गाबाईंनी अर्थमंत्री या नात्याने देशमुखांना आंध्र महिला सभेच्या सुतिकागृहाच्या उद्घाटनासाठी मद्रासला (आजचा चेन्नईला) येण्याचे निमंत्रण दिले. आमंत्रण स्वीकारून देशमुख मद्रासला गेले. १७ ऑगस्ट १९५२ साली हा उद्घाटन सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी दुर्गाबाई देशमुखांना विमानतळावर पोहोचवण्यासाठी गेल्या असता त्यांनी देशमुखांच्या आईंसाठी चांदीचे पूजा साहित्य व उपकरणी भेट म्हणून दिली.

थोड्याच दिवसांनी देशमुखांनी दुर्गाबाईंनी फोन करून आपल्या आईला भेटण्याचे आमंत्रण दिले. हे आमंत्रण स्वीकारून त्या अर्थमंत्र्यांच्या वॉशिंग्टन क्रिसेंट या बंगल्यावर पोहोचल्या. तिथे बागेत फेरफटका मारताना देशमुखांनी अचानक दुर्गाबाईंना लग्नाची मागणी घातली. ते म्हणाले की “माझ्या जीवनातील रिकाम्या झालेल्या जागेची स्वामिनी होणे आवडेल का ?”. हा एकदम जुन्या मराठी चित्रपटांची आठवण करून देणारा संवाद वाटतो नाही का ? सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाईंच्या लग्नापर्यंतच्या गोष्टी अशाच नाट्यमय आहेत.

स्रोत

दुर्गाबाईंना अर्थातच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी एक दिवसाची मुदत मागितली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मनातली अडचण बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की माझी राहणी साधी आणि तुम्ही तर उलट पाश्चात्य संस्कृतीत वाढलेले. अशा परिस्थितीत तुम्हाला माझ्याशी जुळवून घेता येईल का ?

यावर देशमुखांनी दिलेलं उत्तर अतिशय हटके होतं. देशमुख दुर्गाबाईंना घेऊन एका निलगिरीच्या झाडाजवळ गेले आणि त्या झाडाच्या एका सालीवर त्यांनी चक्क संस्कृतमध्ये दुर्गाबाईंना मागणी घातली. देशमुखांच्या या उत्तराने दुर्गाबाईंच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन झालं. अशा प्रकारे दोघांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला.

स्रोत

सुरुवातीला ही बातमी अत्यंत गुप्त ठेवण्यात आली. मधल्याकाळात देशमुख पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून लंडन येथील राष्ट्रकुल परिषदेत जाऊन आले. डिसेंबर १९५२ साली लंडनवरून परतल्यावर त्यांनी दुर्गाबाईंसोबत जवाहरलाल नेहरूंची भेट घेतली. असं म्हणतात की दोघांच्या लग्नाची बातमी ऐकून नेहरूंनी लहान मुलांसारखी उडीच मारली होती. त्यांना प्रचंड आनंद झाला होता.

दोघांनी नेहरूंना सांगितलं की ‘आम्हाला अद्याप ही बातमी गुप्त ठेवायची आहे’. या गुप्ततेच्या काळात दोघांवर आपापल्या कामाचा भार होताच.

यथावकाश २२ जानेवारी १९५३ साली त्यांचा विवाह पार पडला. आधीच सांगितल्याप्रमाणे जवाहरलाल नेहरू हे लग्नाचे साक्षीदार होते तर इतर साक्षीदारांमध्ये सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित, हाथीसिंग आणि इंदिरा गांधी अशी महत्वाची मंडळी होती.

स्रोत

देशाच्या २ महत्वाच्या व्यक्तींचं लग्न अशा प्रकारे अत्यंत सध्या पद्धतीने पण महत्वाच्या मंडळींच्या उपस्थितीत पार पडलं. लग्न झाल्यानंतर आज ज्या प्रकारे कपल्स एकांतवासात जातात तसं काहीच या वधूवराच्या बाबती घडलं नाही.

२३ जानेवारीला दोघेही कामाच्या निमित्ताने मुंबईला गेले. मुंबईची कामे आटोपून दोघेही पुण्याला गेले. पुण्याहून दुर्गाबाई महाराष्ट्रातील ४ दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर निघून गेल्या, तर देशमुख १९५२-५३ च्या मध्यवर्ती सरकारच्या अंदाजपत्रकाचे काम करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले.

कसा वाटला हा भारतातल्या एका आगळ्यावेगळ्या लग्नाचा किस्सा ? कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required