computer

जेवणावरून झालेल्या हाणामाऱ्या...या ४ घटना पाहून घ्या !!

माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्नाचं महत्व वेगळं सांगायची गरज नाही. कोणत्याही लग्न,जेवण किंवा पार्टी असो जेवणाचा मेनू काय याची उत्सुकता असतेच. पण कधी कधी हे अन्नच भांडणासाठी कारणीभूत ठरतं. हो म्हणजे या जेवणापायी लोक स्वतःवरचा ताबा सोडून हणामारी करू लागलेत.

आज असे काही व्हिडीओ आम्ही दाखवणार आहोत ज्यात त्या माणसांचं वागणं बघून तुम्हालाच वेड लागेल.

१. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्यासमोर झालेला गोंधळ.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी मुलतानमधील एका रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. तेव्हा केक मागवण्यात आला होता. सध्या कोरोना काळात लोकांना सुरक्षित अंतर आणि मास्क घालण्यासाठी नियम आहेत. पण केक पाहताच लोकांनी ते नियम अक्षरशः पायदळी तुडवले आणि तो केक खाण्यासाठी लोकं वेडे झाले. एक तुकडा मिळवण्यासाठी इतकी ढकलाढकली आणि मारामारी झाली की हसावे की रडावे कळेना.

२. लग्नाच्या मेजवानीत जेवण संपल्यामुळे झालेले भांडण

कोणत्याही लग्नात जेवण महत्वाचे असते. पाहुणे किती येणार आहेत त्यापेक्षा जास्तच अन्न तयार केले जाते. पाहुण्यांना कमी पडू नये हा त्यामागचा विचार असतो. पण पंजाबमधील लुधियानामध्ये एका लग्नात नेमकी गडबड झाली. लग्न झाले आणि पाहुणे जेवायला आले पण जेवणच संपले होते. मग आलेल्या पाहुण्यांचा इतका संताप झाला की ते खुर्च्या आणि प्लेट्स एकमेकांवर फेकू लागले. सगळीकडे गोंधळ माजला. असंही म्हणतात की मोफत दिलेली दारू तिथल्या पाहुण्यांना चढल्यामुळे त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि गोंधळ झाला.

३. चुकीची बिर्याणी दिल्यामुळे लग्नात आले विघ्न 

लग्नात वराच्या बाजूने केलेले नखरे आपल्याकडे काही नवे नाहीत. त्यांचे मानपमान करण्यातच वधुकडचे जास्त व्यग्र असतात. त्यांच्या अक्षरशः सगळ्या मागण्या पुरवल्या जातात. ऐन लग्नातही काहीजण मागणी करून, जर पूर्ण नाही झाली तर लग्न मोडणारेही खूप जणं असतात. अश्याच एका लग्नात वराकडच्यांनी मटण बिर्याणीची मागणी केली होती, परंतु वधूच्या कुटूंबाने त्याऐवजी त्यांना चिकन बिर्याणी पाठविली. त्यावरून इतके भांडण झाले की लग्नच तुटले. 

४. दोन पाणीपुरीवाल्यांमध्ये झालेली मारामारी

बागपत जिल्ह्यात बरात बडौत शहरातील अतीथी भवन बाजारपेठेत दोन पाणीपुरीवाल्यांनी जोरदार भांडण केले. ग्राहकांनी आपल्याकडे यावे म्हणून हे पाणीपुरीवाले प्रयत्न करत होते. पण आपले ग्राहक शेजारचा पळवतो या संशयाने यांच्यात फक्त शाब्दिक चकमक न होता अक्षरशः मारामारी झाली. 

कोणीही माघार घेत नव्हते शेवटी त्यांनी लोखंडी रॉड व काठ्याही आणल्या. अर्धातास चाललेल्या या मारामारीत ते जवळजवळ एकमेकांच्या जीवावर उठले होते. शेवटी पोलिसांना येऊन हे भांडण थांबवावे लागले. अर्थात या मारामारी करणाऱ्या लोकांना अटकही झाली.

 

तुम्हीही पाहिलेय का जेवणामुळे झालेलं असं भांडण? नक्की कमेंट करून सांगा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required