computer

अँडी जेस्सी: जेफ बेझॉस यांची जागा घेणारे अमेझॉनचे नवे मालक कोण आहेत?

१९९७ साली एक बुकस्टोर म्हणून सुरू झालेली कंपनी आज ई-कॉमर्स क्षेत्रात जगातील सर्वात दिग्गज कंपनी झाली आहे. या कंपनीचा सीईओ आज जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. ही गोष्ट अमेझॉनची आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. २४ वर्षे या कंपनीला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे जेफ बेझॉस यांनी कंपनीचे सीईओपद सोडले आहे. जगभर या गोष्टीची तुफान चर्चा रंगली. पण त्याहीपेक्षा जास्त चर्च होती ती अमेझॉनच्या नव्या सीईओची. अमेझॉन कोण सांभाळणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. 

अँडी जेस्सी हे आता अमेझॉनचे नवे सीईओ असणार आहेत. आजवर ते अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे चीफ म्हणून काम पाहत होते. अमेझॉनच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते याच कंपनीत आहेत. जेफ बेझॉस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शेवटचे पत्र लिहिले, त्यात त्यांनी जेस्सी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बेझॉस यांच्यामते जस्सी हे कंपनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात.  जेस्सी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बेझॉस यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाते. बेझॉस यांच्या कार्य काळात अमेझॉनमध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व निर्णयांमध्ये त्यांचा थेट हस्तक्षेप असायचा.

जेस्सी अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे सीईओ होण्याआधी बेझॉस यांचे मुख्य तांत्रिक सल्लागार होते. या काळात या दोघांचे जुळलेले सूर म्हणजे आजच्या दिवसाची नांदी होती, असे म्हणता येईल. जेस्सी यांना आता १० वर्षांचे पॅकेज मिळणार असून त्यात २०० मिलियन डॉलर्सच्या ६१ हजार शेयर्सचा समावेश आहे. जेस्सी हे १९९७ साली अमेझॉनमध्ये दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी एमबीआय नावाच्या कंपनीत ५ वर्ष नोकरी केली होती.

पण नोकरी सोडत त्यांनी हॉवर्ड बिजनेस स्कुलमध्ये एमबीए करण्याचे ठरवले. एका मुलाखतीत जेस्सी सांगतात की, त्यांनी १९९७ साली शुक्रवारी एमबीए पूर्ण केले आणि सोमवारी अमेझॉनमध्ये नोकरी सुरू केली. त्याकाळी अमेझॉन छोटी कंपनी असल्याने त्यांचा निर्णय हा जोखमीचा होता. पण त्यांनी 'रिस्क है तो ईश्क है' या डायलॉगप्रमाणे काम केले आणि आज ते त्याच कंपनीत सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत. 

जेस्सी यांचे लग्न एलाना रोसेल या फॅशन डिझायनर सोबत झाले आहे. या दोघांना दोन मुले आहेत. जेस्सी यांची कोट्यवधी रुपयांची दोन घरे आहेत. त्यात एक घर सीयटल येथे तर दुसरे कॅलिफोर्नियाला आहे.

अमेझॉनमध्ये तंत्रज्ञानविषयक मोठे बदल करण्यात जेस्सी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २००३ साली अमेझॉनमधील क्लाउड कंप्युटिंग टेक्नॉलॉजी असेल किंवा 2006 साली अमेझॉन वेब सर्व्हिसेसची स्थापना असेल, ते नेहमीच मुख्य भूमिकेत दिसत असत. त्यांच्या याच कर्तृत्वाची दखल घेत २०१६ साली फायनान्शियल टाइम्सने त्यांची निवड पर्सन ऑफ द एअर म्हणून केली होती. 

आजच्या तारखेला जेस्सी कारभार बघत असलेल्या वेब विभागाने ३४ टक्के बाजारभाग काबीज केलेला आहे. त्यांची क्लाउड होस्टिंग ही गुगल आणि मायक्रोसॉफ्टपेक्षा पुढे आहे. जेस्सी यांनी अमेझॉनच्या ई-कॉमर्सपेक्षा हा विभाग अधिक नफ्यात आणून दाखवला आहे. स्टँडर्ड अँड पूअर (Standard & Poor) या रेटिंग एजन्सीने या वाढीचे श्रेय जेस्सी यांनाच दिले आहे. 

जेस्सी यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते खेळात विशेष रस असणारे व्यक्ती आहेत. सीयटल येथील नॅशनल हॉकी लीगमध्ये त्यांनी स्वतःचा एक हॉकी संघ पण विकत घेतला आहे. द क्रेकन हा त्यांचा संघ नॉर्थ अमेरिकन लीगमध्ये खेळला आहे. 

आजच्या घडीला अमेझॉन ज्या क्षेत्रात आहे त्या सर्व क्षेत्रात वरच्या स्थानी आहे. तब्बल १.७ ट्रीलीयन डॉलर एवढी त्यांची मार्केट व्हॅल्यू आहे. सध्या अमेझॉन ई-कॉमर्स, क्लाउड कम्युटिंग, ग्रोसरी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्ट्रीमिंग अशा क्षेत्रातील बाजार काबीज करून पुढे ते रिटेल क्षेत्रात पण शिरण्याची शक्यता आहे.

जेफ बेझॉस जरी सीईओ पदावरून पायउतार होत असले तरी ते अमेझॉनचे चेयरमन असतील. कंपनीकडून सुरू करण्यात येत असलेल्या नव्या उपक्रमांवर त्यांचे लक्ष असेल. पण त्यांचा मुख्य भर अवकाश तंत्रज्ञानावर असणार आहे. त्याचाच भाग म्हणून पुढील काही दिवसांत ते अवकाशात सुद्धा जाणार आहेत. अँडी जेस्सी यांनी अमेझॉनची धुरा हाती घेतल्यावर कंपनीचा प्रवास कसा होतो, याकडे आता जगाचे लक्ष लागून राहणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required