computer

इंटरपोलचा वॉन्टेड सिरीयल किलर चार्ल्स शोभराज; याला एकदा इन्स्पेक्टर झेंडेंनी पकडलं होतं!!!

सिरिअल किलर... हा शब्द जरी उच्चारला तरी मनाच्या एका कोपऱ्यात भीतीची एक अनामिक लहर निर्माण होते. जगाच्या इतिहासात अनेक प्रसिद्ध (?) सिरिअल किलर्स होऊन गेले. यात सर्वात प्रथम आठवणारं नाव म्हणजे जॅक द रिपर...!!!! मग तिथपासून, हेरॉल्ड शिपमन ते अगदी अलिकडे पकडला गेलेला सॅम्युअल लिटल आणि इतर अनेक अट्टल खुनी आठवत जातात. भारतातही रामन राघव, सायनाईड मोहन, सायनाईड मल्लिका वगैरे सिरिअल किलर्स कुप्रसिद्ध आहेत. यापैकी एक नाव म्हणजे चार्ल्स शोभराज. ७० ते ९० च्या दशकांत हे नाव भारतात प्रचंड गाजलं.

जन्म आणि बालपण-

चार्ल्स शोभराजचा जन्म ६ एप्रिल १९४४ ला झाला. व्हिएतनाममधलं सायगाव त्याचं जन्मगाव. या गावाला हो चि मिन्ह सिटी असंही म्हणतात. त्याची आई व्हिएतनामी तर वडील भारतीय सिंधी वंशाचे होते. आई ट्रॅन लोआंग फुन एक दुकानात विक्रेती म्हणून काम करत असे आणि वडील शोभराज हातचंद भवनानी यांचं शिवणकामाचं दुकान होतं. तसं पाह्यलं तर त्याचं पूर्ण नाव हातचंद भवनानी गुरुमुख चार्ल्स शोभराज आहे. मात्र त्याच्या जन्मानंतर वडिलांनी त्याची जबाबदारी घ्यायला नकार दिला आणि आईसोबत ती जिथे जाईल तिथे त्याची फरफट सुरू झाली. वडिलांचे नाव लावता येत नसल्यामुळं त्याला अनेक वर्षं कोणत्याही प्रकारचं कायदेशीर अस्तित्व नव्हतं. या दरम्यान त्याच्या आईने एका फ्रेंच लेफ्टनंटशी लग्न केलं व त्या लेफ्टनंटने त्याला दत्तक घेऊन आपलं नाव दिलं. या काळात त्याच्या इतर सावत्र भावंडांमुळं त्याच्याकडे आईचं दुर्लक्ष होऊ लागलं. शोभराजचं संपूर्ण बालपण असं अत्यंत वाईट अवस्थेत गेलं. जन्मदाते आई आणि वडील या दोघांनाही तो नकोसा झाला होता. या सततच्या नाकारले जाण्यामुळं तो बंडखोर होत गेला.

गुन्हेगारीची सुरुवात

किशोरवयातच तो बंदूक वापरुन चोरी करायला शिकला आणि इथंच त्याच्या गुन्हेगारी आयुष्याला खरा प्रारंभ झाला. सुरुवात अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी झाली आणि १९६३ मध्ये घरफोडीच्या गुन्ह्याखाली त्याला पहिला तुरुंगवास झाला. पॅरिसजवळील Poissy कारागृहात असतानाच तो फेलिक्स देस्कोन नावाच्या एक तरुण श्रीमंत मुलाला भेटला. पॅरोलवर सुटल्यावर शोभराज फेलिक्ससोबत राहू लागला. फेलिक्स श्रीमंत असल्याने आता चार्ल्सचा प्रवेश पॅरिसमधल्या उच्च वर्तुळात झाला होता. हळूहळू गुन्हेगारी विश्वातला त्याचा संचारही वाढू लागला. चोऱ्या आणि अफरातफर करून त्याने बराच पैसा कमावला. यादरम्यान त्याची भेट शांताल कॉम्पानन हिच्याशी झाली. दोघेही प्रेमात पडले व त्यांनी लग्न केलं.

भारतात आगमन

१९७० मध्ये आपली अटक चुकवण्यासाठी चार्ल्स शांतालला घेऊन पूर्व युरोप मार्गे वाटेत अनेक पर्यटकांना लुबाडत मुंबईत आला. येथेच त्याच्या मुलीचा, उषाचा जन्म झाला. काही काळाने त्याने आपला खर्च भागवण्यासाठी स्मगलिंगलाही सुरुवात केली. यातून मिळणारा सगळा पैसा तो जुगारात उडवत असे. दक्षिणपूर्व आशियातले पाश्चात्य पर्यटक, मुख्यतः हिप्पी हे त्याचे प्रमुख सावज होते. गोड बोलून लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं त्याचं कौशल्य अतिशय वादातीत होतं. त्याच्या आकर्षक राहाणीमानामुळे लोकं पटकन त्याच्याकडे आकर्षित होत व सहज त्याच्या जाळ्यात अडकत. अतिशय बेमालूमपणे लोकांना फसवून, त्यांचा वापर करून घेऊन, काम झाल्यावर त्यांचा अलगद काटा काढण्यात तो पटाईत होता.

दिल्लीतलं प्रसिद्ध हॉटेल अशोकामधल्या दागिन्यांच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात १९७३ मध्ये शोभराजला अटक झाली आणि तुरूंगात टाकण्यात आलं. आजारपणाचे नाटक करून शांतालच्या मदतीने शोभराज पळून जाण्यात यशस्वी झाला खरा, परंतु त्यानंतर थोड्या वेळातच त्याला पुन्हा पकडण्यात आलं. चार्ल्स शोभराजनं आपल्या वडिलांकडून जामिनासाठी पैसे उकळले आणि या दोघांनी थेट काबूलला पलायन केलं. तेथे त्यांनी आपल्या गुन्हेगारी कारवाया परत सुरू केल्या. परत त्या दोघांना तेथे अटक झाली व पुन्हा एकदा शोभराज आजारपणाचे नाटक करून, रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांना गुंगीचं औषध देऊन इराणला पळून गेला. परंतु शांताल पळून जाऊ शकली नाही. तीला दोन वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला. शेवटी या गुन्हेगारी आयुष्याला ती कंटाळली आणि तिने त्याला कायमचा रामराम ठोकला.

चार्ल्स आणि भाऊ आंद्रे यांच्या कारवाया

शोभराजने पुढची दोन वर्षे पूर्व युरोप आणि मध्य पूर्वेतील विविध देशांतून पोलीसांपासून पळण्यातच घालवली. या काळात तो जवळजवळ १० बेकायदेशीर पासपोर्ट्स वापरत होता. इस्तंबूलमध्ये शोभराजला त्याचा छोटा सावत्र भाऊ, आंद्रे येऊन मिळाला. आंद्रेवर लहानपणापासूनच शोभराजचा खूप प्रभाव होता. त्यांच्या दिसण्यातही विलक्षण साम्य होतं. त्या दोघांनी तुर्की आणि ग्रीस या दोन्ही देशांत विविध गुन्हे एकत्रपणे केले. अखेरीस या दोघांना अथेन्समध्ये अटक करण्यात आली. वेगवेगळ्या आरोपाखाली शोभराजला तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या जागी त्याने आपला सावत्र भाऊ आंद्रे याला शोभराज म्हणून उभे केले व स्वतः आंद्रे बनून तो पळून गेला. सत्य परिस्थिती कळल्यावर ग्रीक पोलीस अधिकाऱ्यानी आंद्रेला तुर्की पोलिसांकडे सोपविले आणि त्याला १८ वर्षाची शिक्षा भोगावी लागली.

शिक्षा कितीही मोठी अथवा छोटी असूदे, या ना त्या मार्गाने चार्ल्स स्वतःची सुटका करून घेत असे. कारागृहातून अनेक वेळा पळून जाण्याच्या त्याच्या या कौशल्यामुळे त्याला 'The Serpent' हे नाव मिळालं होतं.

शोभराजला पुढील काही काळ पोलीसांपासून लपत छपत घालवावा लागला. या दरम्यान पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी तो अनेक वेळा अमूल्य रत्नांचा व्यापारी म्हणून किंवा अंमली पदार्थ विक्रेता म्हणून त्यांच्यासमोर जाई. त्यांच्याशी चांगली मैत्री झाली की त्यांना लुबाडून त्या पैशातून तो स्वतःचे शौक पुरवत असे.

गुन्ह्याची पद्धत-

सावज गाठण्याची त्याची एक ठरलेली विशिष्ट पद्धत होती. शीतपेयातून सौम्य विषप्रयोग करून लोकांना आजारी पाडणे व त्यांची शुश्रूषा करुन त्यांचा विश्वास संपादन करणे हा त्याच्या कटाचा एक भाग असे. एकदा का त्यांचा विश्वास संपादन केला की त्यांचा हवा तसा वापर करून घेऊन/लुबाडून शेवटी त्यांना मारून टाकण्यात तो यशस्वी होई. त्या काळात तंत्रज्ञान आजच्याइतकं पुढे गेलं नव्हतं. त्यामुळे शोभराजला स्वतःचं साम्राज्य उभारणं सोपं गेलं. त्याचे डावपेच फारच प्रभावी होते. अनेकवेळा त्याने केलेल्या हत्यांची नोंदही कुठे केली गेली नाही, कारण मुळात त्याचे सावज मेले आहे हेच कोणाच्या लक्षात येत नसे. मृतांचीच ओळखपत्रे व नाव वापरुन तो पुढचा प्रवास करत असल्यामुळे इतरांसाठी त्याचे बळी कायम जिवंतच असत.

(शोभराज आणि मेरी-आन्ड्रे लेकलर)

लोकांसाठी अनेक अडचणी निर्माण करून, त्या आपणच सोडवून, त्यांना आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली दाबून त्यांची निष्ठा संपादन करण्यात त्याची हातोटी होती. त्याने अशाप्रकारे अनेक अनुयायी गोळा केले. थायलंडमध्ये त्याला त्याची सर्वात निष्ठावान अनुयायी मेरी-आन्ड्रे लेकलर भेटली. शेवटी शेवटी त्याची भेट अजय चौधरी नावाच्या तरुणाशी झाली. हाच अजय चौधरी पुढे त्याचा उजवा हात बनला. शोभराज आणि चौधरी यांनी त्यांची पहिली ज्ञात हत्या १९७५ मध्ये केली. मृतांपैकी बहुतांश लोकांनी मृत्यूपूर्वी या दोघांसोबत काही काळ घालवला होता. आपल्यावरील खुनाच्या आरोपांसंबंधी स्पष्टीकरण देताना शोभराजचा असा दावा होता की बहुतेक खून हे खून नसून अमली पदार्थांच्या अतिसेवनाने झालेले अपघाती मृत्यू होते. पण तपासणी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मृतांनी शोभराजचे गुन्हे उघडकीस आणण्याची धमकी दिली होती म्हणून त्यांचे खून झाले.

बळींची मालिका
तसे त्याने बरेच बळी घेतले असे म्हणतात, पण त्याचे उघडकीस आलेले गुन्हेही काही कमी नाहीत.

बळी क्र. १.

त्याचा पहिला बळी म्हणजे सिएटलमधील एक युवती टेरेसा नॉल्टन. ती थायलंडमध्ये एका तलावात बुडालेल्या अवस्थेत सापडली. तेव्हा तिच्या अंगावर फुलांच्या डिझाईनची बिकिनी होती. सुरवातीला हा एक अपघात मानला गेला, पण काही महिन्यांतच नॉल्टनच्या पोस्टमार्टेम रिपोर्ट आणि इतर न्यायवैद्यकीय पुराव्यांवरून हे सिद्ध झाले की तिचे बुडणे हा अपघात नसून एक हत्या आहे.

बळी क्र. २.

त्याचा पुढचा बळी होता विटाली हकीम नावाचा एक तरुण भटक्या ज्यू. त्याचा जळलेला मृतदेह पटाया रिसॉर्टच्या रस्त्यावर सापडला. शोभराज आणि त्याचे अनुयायी देखील तिथेच राहत होते.

बळी क्र. ३, ४, ५.

त्याच्या हॉंगकॉंगमधील वास्तव्यात त्याला दोन डच विद्यार्थी भेटले होते. हेन्क बिन्तांन आणि त्याची प्रेयसी कॉर्नेलिया हेमकर. त्यांच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने त्यांना थायलंड भेटीचे निमंत्रण दिले. थायलंडमध्ये त्यांच्याशी परत भेट झाल्यावर शोभराजने त्याची नेहमीची युक्ती वापरत त्यांच्यावर त्यांच्या नकळत विषप्रयोग केला व आजारपणात त्यांची शुश्रूषा करून त्यांचा विश्वास संपादन केला.

याच सुमारास हकिमची मैत्रीण शर्मिन कॅरो ही त्याला भेटायला आली. हकिमचा मृत्यू संशयास्पद आहे असं तिचं म्हणणं होतं. आपला गुन्हा उघडकीस येण्याच्या भीतीने शोभराजने चौधरीच्या मदतीने बिंतान व हेमकर यांची गळा आवळून हत्या केली. प्रेतांना जाळून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ त्याने शर्मिनचाही पाण्यात बुडवून खून केला. त्यासमयी तिच्या अंगावरदेखील टेरेसासारखाच बिकिनी स्विम सूट होता. या खुनामुळेच त्याला 'बिकिनी किलर' असेही नाव मिळाले. ज्या दिवशी बिन्तान आणि हेमकर यांचे मृतदेह सापडले त्याच दिवशी शोभराज आणि लेकलर यांनी त्या दोघांचे पासपोर्ट वापरून नेपाळमध्ये प्रवेश मिळवला.

बळी क्र. ६,७.

तिथे त्यांनी लॉरेन कॅरियर आणि कोनी ब्रॉंझीच यांची हत्या केली. त्यांचे पासपोर्ट वापरून शोभराज आणि लेकलर थायलंडला परत आले. यादरम्यान थायलंडमधील त्याच्या ३ फ्रेंच साथीदारांना मृतांची काही कागदपत्रे मिळाली. त्यामुळे त्यांना शोभराज हा एक सिरिअल किलर असल्याचा संशय येऊ लागला. त्याबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांना कळवून त्यांनी फ्रान्सला पलायन केले. थाई पोलीस त्याकाळी अतिशय भ्रष्ट म्हणून कुप्रसिद्ध होते. त्यांनी त्या तिघांची चौकशी केली खरी परंतु पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होईल या भीतीने त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान, डच मुत्सद्दी अधिकारी हर्मन किप्पेनबर्ग बिन्तांन आणि हेमकर यांच्या हत्येचा तपास करीत होता. तो शोभराजला प्रत्यक्ष भेटला होता, परंतु त्याला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्द्ल काहीही माहीत नव्हते. जसजसा त्याचा तपास वाढू लागला तसतसे त्याला समजले की हरवलेल्या इतर बर्‍याच लोकांचे शोभराजशी संबंध आले होते. शोभराजच्या शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने पुरावे एकत्रित केले व त्याच्याविरूद्ध खटला उभा केला. शोभराज देश सोडून गेल्यानंतर जवळपास एक महिन्याने त्याला त्याच्या घराची झडती घेण्याची परवानगी मिळाली. या झडतीत त्यांना मृतांचे पासपोर्ट, इतर कागदपत्रं, विष व ते देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिरिंज अशा शोभराजच्या विरोधात जाणारे अनेक पुरावे मिळाले. या सर्व पुराव्यांमुळे शोभराजच्या गुन्हेगारी कारवाया सर्व प्रथम जगासमोर आल्या.

बळी क्र. ८.

यानंतर शोभराज वाराणसीला आला. तिथे त्याने फक्त पासपोर्ट मिळवण्यासाठी इस्त्रायली अवोनी जेकबची हत्या केली. त्या पासपोर्टचा वापर त्याने लेकलर आणि चौधरी यांच्यासमवेत सिंगापूर, भारत, बँकॉक इत्यादी ठिकाणी प्रवास करण्यासाठी केला.

किप्पेनबर्गच्या चिकाटीने थाई पोलिसांना शोभराजवर कारवाई करण्यास भाग पाडले. पण आश्चर्य म्हणजे त्याने आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा उपयोग करुन घेत शिक्षेपासून सुटका करून घेतली व मलेशियाला पलायन केले. त्याच्याबरोबर लेकलर व अजय चौधरीसुद्धा होते.

बळी क्र. ९.

त्यानंतर चौधरी परत कधीही कोणाला दिसला नाही. असा प्रवाद आहे की शोभराजने त्याचा इतरांप्रमाणेच मलेशियामध्ये काटा काढला. यानंतर शोभराज मुंबईत परत आला व त्याने बार्बरा स्मिथ आणि मेरी एलन एथर या आणखी दोन स्त्रियांना आपल्यासोबत सामील करून घेतले.

बळी क्र. १०.

त्याचं पुढचं सावज होतं जॉन-लुक सोलोमन. तो दरोडा घालताना प्रमाणाबाहेर विष दिले गेल्यामुळे मरण पावला.

जुलै १९७६ मध्ये नवी दिल्ली येथे शोभराजने आपल्या तीन महिला साथीदारांच्या मदतीने फ्रेंच-पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या एका गटाला जाळ्यात ओढले व त्यांचा टूर गाईड म्हणून काम मिळवले. आपली नेहमीची युक्ती वापरत त्यांना जुलाबरोधक गोळ्या आहेत असं सांगून विष दिले. परंतु अपेक्षेपेक्षा या विषयाचा परिणाम फारच जलद झाला व ते विद्यार्थी पटापट बेशुध्द पडू लागले. त्यापैकी ३ विद्यार्थ्यांना आपल्यासोबत काहीतरी विपरीत घडले आहे याची जाणीव झाली व त्यांनी शोभराजला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चौकशीदरम्यान स्मिथ आणि इथर यांचा पोलिसांसमोर टिकाव लागला नाही व त्यांनी कबुलीजबाब देऊन टाकला. शोभराजवर सोलोमनच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता आणि औपचारिक खटल्याची प्रतीक्षा करीत तिघांनाही तिहार तुरुंग, नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले होते.

तिहार तुरुंगात शोभराजने अनेक मौल्यवान रत्ने लपवून नेली होती. त्यांच्या जोरावर त्याने तुरुंगात ऐषोआरामचे जीवन जगण्यास प्रारंभ केला. तुरुंगाधिकाऱ्यांना अत्यंत पद्धतशीरपणे लाच देत त्याने टीव्ही, उत्कृष्ठ दर्जाचे अन्न यासारख्या अनेक सुखसोयी पदरात पाडून घेतल्या. सतत वकिल बदलत राहणे, नुकत्याच पॅरोलवर सुटलेल्या आंद्रेला मदतीसाठी बोलावून घेणे, उपोषण करणे अशा अनेक गोष्टीमुळे त्याने खटल्याला एका मोठ्या तमाशाची कळा आणली. या खटल्यात त्याला बारा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पहारेकरी व तुरुंगातील कैदी या दोघांशीही त्याची मैत्री होती. यादरम्यान त्याने अनेक पाश्चात्य पत्रकारांना मुलाखती दिल्या. या मुलाखतीत त्याने स्वतः वरील कोणतेच आरोप कधीही मान्य केले नाहीत.तिहारमध्ये शिक्षा भोगत असतानाच त्याच्यावर थाई सरकारने जारी केलेल्या अटक वॉरंटची मुदतसुद्धा वैध होती. थायलंडमध्ये त्याच्यावर पाच खुनांचा आरोप होता. शिक्षा म्हणून त्याची फाशी निश्चित होती. हे टाळण्यासाठी त्याने पहारेकऱ्यांना गोड मिठाईतून विष खायला घालून बेशुद्ध केलं आणि दिल्लीच्या तिहार तुरुंगातून पलायन केलं.

मुंबई पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांनी गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये अतिशय नाट्यमय पद्धतीने त्याला अटक केली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे या पलायनामुळे त्याची शिक्षा वाढवण्यात आली. यामुळे त्याच्या हस्तांतरणाचा काळ पुढे ढकलला गेला, पर्यायाने त्याच्यावर थायलंडमधे खटला चालवला जाण्याची वीस वर्षाची कालमर्यादाही संपली व तो फाशीच्या शिक्षेपासून बचावला.

शिक्षा संपल्यानंतर...

१७ फेब्रुवारी १९९७ रोजी ५२ वर्षाचा शोभराज जेव्हा सर्व शिक्षा भोगून बाहेर आला तेव्हा त्याच्याविरुद्ध असलेले इतर देशातले पुरावे आणि साक्षीदार गायब झाले होते. वॉरंट्सची मुदतही जवळजवळ संपली होती. त्यामुळे तो अगदी आरामात फ्रान्सला परत जाऊ शकला. फ्रान्सला परतल्यावर पॅरिसच्या एक उपनगरात तो अतिशय आरामाचे जीवन जगू लागला. त्याने अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखती व छायाचित्रांसाठी त्याने मोठमोठ्या रकमा आकारण्यास सुरवात केली. आपल्या आयुष्यावर आधारित सिनेमाच्या हक्कांसाठी त्याने दीडशे लाख डॉलर्सपेक्षा जास्त पैसे घेतले असं म्हटलं जातं.

पुन्हा अटक?

१७ सप्टेंबर २००३ रोजी शोभराजला एका पत्रकाराने काठमांडूच्या एका रस्त्यावर पाहिले. या पत्रकाराने तातडीने नेपाळच्या पोलीस अधिकाऱ्यांना याची खबर दिली. शोभराजला दोन दिवसांनंतर एका हॉटेलच्या कॅसिनोमध्ये अटक झाली. जगाच्या पाठीवर नेपाळ हा एकमेव देश होता जिथे त्याला १००% अटक होऊ शकत होती. पण तरी ही तो तिथे गेला याला त्याचा फाजील आत्मविश्वास म्हणावं का?

या प्रकरणात त्याच्या विरोधात वापरल्या जाणाऱ्या पुराव्यांपैकी बहुतेक पुरावे डच मुत्सद्दी अधिकारी किप्पेनबर्ग आणि इंटरपोल यांनी एकत्र केले होते. आपल्याला कोणत्याही खटल्याशिवाय शिक्षा सुनावली आहे असा दावा करत शोभराजने या शिक्षेविरूद्ध अपील केले. परंतु पाटण कोर्ट ऑफ अपीलने २००५ मध्ये शोभराजची शिक्षा कायम केली. २००८ मध्ये शोभराजने निहिता बिस्वास या नेपाळी महिलेबरोबर लग्न ठरल्याची घोषणा केली. त्याचा वकील शकुंतला थापा यांची ती मुलगी. ३० जुलै २०१० रोजी काठमांडूच्या जिल्हा कोर्टाने कोनी ब्रॉन्झिचच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आणि अवैधरीत्या नेपाळमध्ये प्रवेश केल्याबद्दल आणखी १ वर्षाची कैद तसेच २०००/- रुपये दंड ठोठावला. शोभराजची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिले.

चार्ल्स शोभराज आता कुठं आहे?

(शोभराज आणि निहिता बिस्वास)

२०१०ला त्याला शिक्षा सुनावली गेली तेव्हापासून आजतागायत तो नेपाळमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. २०१८ मध्ये शोभराजची प्रकृती गंभीर झाली होती आणि बर्‍याच वेळा त्याच्यावर हृदयाच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत.

तसं पाहायला गेलं तर शोभराज हा अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचा माणूस होता. हे सर्व वाचल्यावर असं वाटत राहतं की तो काय होऊ शकला असता आणि काय झाला. एक प्रश्न तर सतत पडत राहतो, तो म्हणजे 'का केलं असेल त्याने हे सर्व?' याचं उत्तर त्याच्या बालपणात असावं कदाचित. जन्मदात्या आई वडिलांकडून सतत नाकारले जाण्यामुळे झालेले मानसिक क्लेश इतके त्रासदायक असावेत की इतर कोणाकडून कुठल्याही कारणासाठी नाकारलं जाणं तो सहन करू शकला नसावा. त्याचा बदला म्हणून त्याने हे खून केले असावेत अशी एक अटकळ मांडली जाते. त्याचं गुन्हेगारी साम्राज्य वास्तवापेक्षा त्याच्या कल्पनेतच अधिक मोठं होतं. तो त्यात स्वतःला धर्मपिता/गॉडफादर मानत असे. जी लोकं त्याच्या योजनेला विरोध करत त्यांना तो आपल्या मार्गातून अलगद बाजूला करत असे. तो स्वतःला सतत त्याच्या भूतकाळाचा, आजूबाजूच्या परिस्थतीचा किंवा न्यायव्यवस्थेचा बळी समजत असे.

शोभराज आजही काठमांडू कारागृहात बंद आहे आणि अजूनही तो स्वतःला न्याय व्यवस्थेचा बळी मानतो. वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक, उत्साही व विनोदी आहे. त्याचं आयुष्य इतके नाट्यमय व अनेक चित्र विचित्र घटनांनी भरलेले आहे की बीबीसी व नेटफ्लिक्सलाही त्याच्या आयुष्यावर ८ भागांची मालिका बनवण्याचा मोह आवरला नाही. 'The Life and Crimes of Charles Sobhraj' व 'Serpentine' ही चरित्रात्मक पुस्तकंही त्याच्यावर लिहिली गेली.

पण या सर्व गोष्टी मागे पडून त्याचं नाव घेतल्यावर आठवतात ते १० निष्पाप तरुण जीव ज्यांची त्याने हत्या केली. नव्या संधींच्या, नव्या अनुभवांच्या शोधांत असताना ते शोभराजला भेटले आणि हकनाक जीव गमावून बसले. प्रवासाला निघालेले हे १० जण शोभराजमुळे कधीही त्यांच्या कुटुंबीयांकडे परतू शकले नाहीत. म्हणूनच आजही त्याची खरी ओळख फक्त आणि फक्त एक सिरिअल किलर हीच आहे.

 

लेखिका : भारती मुळे

सबस्क्राईब करा

* indicates required