computer

सायनाईड मल्लिका...भारतातली पहिली महिला सिरियल किलर !!

गेल्या वेळी आम्ही तुम्हांला निर्दयी गावित मायलेकींनी महाराष्ट्रातल्या ४३ चिल्ल्यापिल्ल्यांना कसं मारुन टाकलं याबद्दल सांगितलं होतं. पण ती तर सगळी पळवली गेलेली लहान मुलं होती. आज आम्ही तुम्हांला चांगल्या तीस ते साठ वर्षांच्या कित्येक बायकांना मारुन टाकणाऱ्या सिरियल किलरबद्दल सांगणार आहोत. हेतू हाच की, अशा उदाहरणांवरुन आपण बोध घ्यावा आणि अशा जीवावर बेतणाऱ्या प्रसंगात अडकू नये. दिखावे पे ना जाओ, अपनी अकल लडाओ हे तर सुरक्षित राहण्याचं सूत्र आहे मंडळी!! तर, या बाईनं रंजल्यागांजल्या बायकांना आधी देवळात हेरलं आणि देवाधर्माच्या नावाखालीच मारुन टाकलं. दुर्दैवाने त्यातल्या फक्त सहा खुनांचा तपास लागला.

या बाईचं खरं नांव के.डी. केंपम्मा. नावावरुन कळलंच असेल, सौदिंडियन अम्मा आहे ते. तर, ही मूळची कर्नाटकातली. बेंगलोरच्या आसपासच्या काग्गलीपुरा नावाच्या खेड्यातली. तिचा जन्म १९७०चा. तिचा नवरा व्यवसायाने टेलर होता. ती काहीतरी चिट फंडाचा बिझनेस करत असे. त्यात बरंच नुकसान झालं. मग काय, याचा राग येऊन नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं. तेव्हा ती २८ वर्षांची होती. काही मूलबाळही नव्हते. तिनं मग कुठे कामवाली बाई म्हणून किंवा सोनाराकडे मदतनीस म्हणून आसपास लहानसहान कामं केली. या सोनाराच्या दुकानातल्या कामातूनच तिला लोकांना मारायची आयडिया कशी मिळाली ते पुढे आम्ही सांगूच. पण ही बया त्या कामांवरही चोऱ्या करायचीच. 

खूनांचं सत्र

हळूहळू केंपम्मानं चोरीसोबत हे खून करण्याचे उद्योग सुरु केले. ती बंगलोरमधल्या मंदिरात जायची. तिथे ती त्रासलेल्या बायकांना हेरायची. मग त्यांच्यासोबत सहजच गप्पा मारत त्यांच्या अडीअडचणी ऐकायची. तेव्हा ती स्वत: खूप धार्मिक आहे, तिला पूजा-कर्मकांडे यांची खूप माहिती आहे असं भासवायची. त्यामुळे त्या बायकाही तिला निरागसपणे त्यांचं जीवाचं दुखणं सांगायच्या. मग तेव्हा केंपम्मा त्यांना गावाबाहेरच्या देवळात अमकीढमकी पूजा किंवा काहीतरी व्रत केलं की अडचण दूर होईल असा सल्ला देई. मग आता सल्ला देणारी बाईच पूजा करायला मदत करणार ना!! आणि आपल्या पूजा म्हणजे साडी नेसून, दागदागिने घालून, नटूनथटून असतात. केंपम्मा त्या बायकांना हेच सांगे. मग पूजा चालू असताना ती तीर्थ म्हणून त्या बायकांना चक्क सायनाईड प्यायला देई.

सिनेमात तुम्ही पाह्यलंच असेल, अतिरेकी किंवा डाकू सायनाईडची गोळी गिळल्यागिळल्या कसा मरतो ते.. तर ही भयानक बाई त्या बिचाऱ्या बायकांचे नाक दाबून ठेवत असे. यावर त्या बायकांकडे ते विषारी तीर्थ पिण्यावाचून पर्याय नसे. मग ती पूजा करायला आलेली बाई थोड्याच वेळात मरत असे आणि केंपम्मा काकू तिचे दागिने घेऊन पळ काढत. केंपम्माला हे सायनाईड सोनाराच्या दुकानात मिळत असे. सोनार मोडीसाठी आलेले दागिने स्वच्छ करायला सायनाईड वापरतात आणि सायनाईड खाल्ल्यावर माणूस मरतो ही मोलाची माहिती तर आपल्याच टीव्ही-सिनेमांमधून केंपम्माला मिळाली होती. या सायनाईड वापरायच्या करामतीतूनच तिला नांव मिळालं- सायनाईड मल्लिका!! बाई एवढी हुशार होती की प्रत्येक खुनानंतर ती आपलं नांव-गांव वगैरे ओळख बदलत असे. नवा बळी, नवं व्यक्तीमत्व!! 

असं म्हणतात की तिनं १९९९च्या ऑक्टोबरमध्ये पहिला खून केला असावा. मग तिचं हे काम चालूच राहिलं. २००७च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या अवघ्या तीन महिन्यांत बाईसाहेबांनी तब्बल पाच खून केले. तिनं खून केलेल्यांपैकी दोघी ३० वर्षांच्या, एक ५२ वर्षांची तर राहिलेल्या तिघी ६०च्या होत्या. आणखी एका ३० वर्षांच्या बाईचा या सायनाईड मल्लिकाने खून केला असावा अशी तिच्या कुटुंबियांची आणि पोलिसांची अटकळ आहे.   

कशी सापडली ही सायनाईड मल्लिका??

साधारण २०००च्या सुमारास केंपम्माने नेहमीसारखी गावाबाहेरच्या मंदिरात पूजा न करता एका बाईच्या घरीच पूजा केली. त्या बाईनं नाक दाबून सायनाईड प्यायला भाग पाडल्यावर आणि ही केंपम्मा चोरी करायला लागल्यावर आरडाओरडा केला. बाईच्या घरच्यांनी तिला वाचवलं आणि केंपम्मा पोलिसांच्या हाती सापडली. पण तिच्यावर फक्त चोरीचा आळ लागला आणि अवघ्या सहा महिन्यांच्या शिक्षेनंतर ही सायनाईड मल्लिका तुरुंगाबाहेर पडली.

ती खरी पोलिसांच्या हाती लागली २००७मध्ये. तेव्हा तिनं जयम्मा नाव घेतलं होतं आणि चोरीचे दागिने विकण्यामुळे ती पोलिसांच्या यादीत आली होती. पोलिसांना तिच्याबद्दल खबऱ्यांनी अधिक माहितीही पुरवली होती. अटकेनंतरच्या झडतीत तिच्या कारस्थानाला बळी पडलेल्या काही बायकांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू तिच्याकडे सापडल्या. अटकेनंतर तिनं गुन्हाही कबूल केला. केवळ चोरीसाठी तिने हे सारे खून केल्याचा तिच्यावर आरोप ठेवण्यात आला. पण तिने केलेल्या सगळ्या खूनांची माहिती काही तिने पोलिसांना दिली नाही.

तिच्यावर वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळे खटले चालले. दोन खुनांसाठी तिला फाशीची शिक्षा झाली. कर्नाटकात फाशीची शिक्षा झालेली केंपम्मा ऊर्फ सायनाईड मल्लिका ही पहिली बाई आहे. दोनपैकी एका खुनात फक्त परिस्थितीजन्य पुरावा असल्याने तिची फाशी जन्मठेपेत रुपांतरित झाली. 

सायनाईड मल्लिका, जयललिता आणि शशिकला.

सध्या या काकू बेंगलोरच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. ती म्हणे जयललितांची मोठी फॅन आहे. जयललितांना २०१४मध्ये याच बेंगलोरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा तिला त्यांना खूप भेटायचं होतं. ती भेट तर राहून गेली. नंतर जयललितांची सहकारी शशिकला, तिलाही करप्शनच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर याच जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा ही बाई शशिकलाला भेटण्याचे प्रयत्न करत होती म्हणून तिला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आलं. पण काही लोकांचं असंही म्हणणं आहे की शशिकलाला जेलमध्ये जेवणासाठी रांगेत उभं राहायला लागू नये म्हणून केंपम्मा तिला जेवण आणून द्यायची आणि तुरुंगात या दोघींचं गूळपीठही चांगलंच होतं. 

केंपम्माच्या खूनसत्रामागे निव्वळ लोभ होता, त्यामागे काही मानसिक आजार आहे असं आजवर तिचा अभ्यास करणाऱ्या कुणाला वाटलं नाही. एखाद्या देवस्थानात आपण सहजपणे आपलं दु:ख कुणाला सांगून जातो. पण त्या बिचाऱ्या बायकांना त्या दु:ख सांगण्याचे हे परिणाम होतील असे स्वप्नातही वाटले नसेल. दुसरीकडे ममतेची देवी समजली जाणारी एक स्त्रीच इतके थंड डोक्याने खून करते हे ही आहेच. 

हे कलीयुग आहे मंडळी. त्यामुळे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि आपली खाजगी माहिती तर त्यांना बिल्कुल सांगू नका. बरोबर ना?

 

आणखी वाचा :

४३ निष्पाप आणि निरागस लेकरांचं हत्याकांड या तिघींनी का केलं? कारण जाणून तुम्हांलाही राग येईल !!

दीड वर्षांत १० खून आणि दरोड्यांनी हादरवून टाकणाऱ्या पुण्याच्या जोशी-अभ्यंकर केसचे भयानक सत्य आणि तपास वाचा या खास लेखात...

सबस्क्राईब करा

* indicates required