'स्कॅम १९९२' मध्ये दिसलेल्या के माधवन यांच्यावर सिरीज बनवण्याची मागणी लोक का करत आहेत? कोण आहेत के माधवन ?

स्कॅम १९९२ ही सिरीज सोनी लिव्हवर रिलीज झालीये तेव्हा पासून हर्षद मेहता हे नाव चर्चेचा विषय ठरले आहे. दहा एपिसोडच्या ह्या सिरीजमध्ये फक्त ३ ते ४ एपिसोडमध्ये रजत कपूर झळकले. पण त्यांनी साकारलेल्या CBI ऑफिसरच्या भूमिकेने सर्वांच्या मनावर छाप उमटवली आहे. रजत कपूर ह्यांनी CBI ऑफिसर के माधवन ह्यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेल्या ह्या भूमिकेमुळे वास्तवातले ते CBI ऑफिसर कोण आहेत ह्याविषयी बरीच उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. वास्तवात इतके कर्तव्यनिष्ठ आणि सच्चे अधिकारी खरच होते का असाही प्रश्न लोकांना पडलाय. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, हो...
कोण होते के. माधवन?
एक प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून के माधवन ओळखले जायचे. केरळमधल्या त्रिसूरचा त्यांचा जन्म. पण त्यांची कर्मभूमी मुंबई होती. CBI मध्ये स्पेशल इनव्हेस्टिगेशन ऑफिसर, Joint Director म्हणूनही त्यांनी बरीच वर्षं काम पहिले.
१९८४ सालची भोपाळ वायू गळती आठवतेय? त्यावेळी ३,७८७ लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. पण हरवलेल्या लोकांच्या एकूण १६,००० तक्रारींची पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली होती. ह्या घटनेचा तपासही के. माधवन ह्यांनीच केला होता. या दुर्घटनेला कारणीभूत असणाऱ्या युनियन कार्बाईड इंडियाच्या अधिकाऱ्यांना २०१० मध्ये सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवले होते.
(भोपाळ वायू गळती)
बोफोर्स प्रकरण कोणाला नाही ठाऊक? भारत आणि स्वीडनमध्ये १९८० ते १९९० च्या दरम्यान झालेल्या शस्त्रांस्त्राच्या करारातील घोटाळ्याची तपासणी के. माधवन ह्यांच्याकडेच होती. ह्या केसचा ८० टक्के तपास त्यांनी जवळपास पूर्णच केला होता. पण त्यांच्या ह्या प्रामाणिक कर्तृत्वाकडे पाहूनच की काय, त्यांच्याकडून अर्ध्यातूनच ह्या घटनेचा तपास करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले.
(बोफोर्स)
त्यांची कर्तव्यनिष्ठा, काम करण्यातील शिस्त पाहून १९९२ सालच्या हर्षद मेहता स्कॅमच्या तपास कामाची जबाबदारी के. माधवन ह्यांच्याकडे देण्यात आली होती. खोट्या बँक पावत्या वापरून हर्षद मेहताने एक नाही, दोन नाही, तब्बल १००० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. हर्षद मेहता, भूपेन दलाल ह्या सर्वांची त्यांनी कसून चौकशी केली होती. सत्याच्या अगदी जवळ पोहचलेले असताना त्यांना ८ ऑगस्ट १९९२ रोजी ह्या केसवरूनही काढण्यात आले. पुढे हर्षद मेहताची तुरुंगातून सुटका झाली. कोणी एकटा माणूस तर इतका मोठा घोटाळा करणे हे शक्यच नव्हते. तरीही नंतरच्या तपासात फक्त हर्षद मेहता हेच नाव पुढे आले होते. इंडिया टुडेनुसार, “के. माधवन ह्यांनी खूप खोलात जाऊन ह्या घोटाळ्याची चौकशी करणे चालू केले होते. पण एका उच्च नामांकित कंपनीच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या मोठ्या कर्जाची चौकशी होणे गरजेचे होते. आणि नेमके याच वेळी के. माधवन ह्यांच्यासाठी गोष्टी कटू बनू लागल्या होत्या.”
अशा अनेक उच्चस्तरीय घोटाळ्यांच्या केसेस सोडवत असताना राजकीय दबाव हा वाढत होता. अखेर त्यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी आपल्या कामातून निवृत्ती घेतली. ३० वर्षं त्यांनी CBI मध्ये काम केले. सत्याचा शोध घेण्याच्या त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे त्यांना त्याच्या सहकाऱ्यांचा रोषही बऱ्याच वेळा पत्करावा लागला होता. पुढे जाऊन त्यांनी सुप्रीम कोर्टात वकील म्हणूनही काही वर्षं काम केले. २० जानेवारी,२०२० रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
स्कॅम १९९२ सिरीजमध्ये अवघ्या ३ ते ४ एपिसोड पुरतं येणारं हे पात्र हर्षद मेहताच्या गोष्टीपुरतं नक्कीच मर्यादित नाही. त्यांच्या कामाचा आवाका समजावा म्हणून त्यांच्यावर एक सिरीज तर नक्कीच यायला हवी अशी मागणी लोकांकडून होताना दिसत आहे. बोभाटाच्या वाचकांना याबद्दल काय वाटतं ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!
लेखिका : स्नेहल बंडगर