computer

हबीबगंज नव्हे, आता राणी कमलापती रेल्वे स्टेशन!! भोपाळ रेल्वेस्टेशनला नाव दिलेली ही राणी आहे तरी कोण?

भोपाळमधील ‘हबीबगंज’ रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात आलं आहे. आता या रेल्वे स्टेशनचे नावही बदलण्यात येणार आहे. भोपाळची शेवटची  गोंड राणी कमलापती हिच्या नावाने आता हे रेल्वे स्टेशन ओळखले जाणार आहे. पण ही राणी कमलापती होती तरी कोण आणि ती कुठल्या काळात होऊन गेली हे तुम्हाला माहित आहे का?

राणी कमलापती ही भोपाळची सर्वात शेवटची गोंड आदिवासी शासक होती. सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या या राणीचा पराक्रम आठवून आजही भोपाळवासियांचा ऊर अभिमानाने भरून येतो. राणी कमलापती ही गीनोरगड संस्थानचे शेवटचे शासक निझाम शाह यांची पत्नी होती. निझाम शाह यांना एकूण सात पत्नी होत्या, त्यात राणी कमलापती ही अत्यंत देखणी आणि शूर होती.

राजा निझाम शाह यांनी भोपाळच्या मोठ्या आणि छोट्या तलावाच्या काठावर तिच्यासाठी खास सात मजली महाल बांधून घेतला होता. याच महालातून उडी घेऊन राणीने आपली जीवनयात्रा संपवली होती. आत्मसन्मान आणि संस्कृती रक्षणासाठी तिने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही म्हणूनच राणी कमलापती आजही भोपाळवासियांच्या अभिमानाचा विषय आहे. अशा या शूर राणीला मात्र उर्वरित भारतात फारसे ओळखले जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.

१६व्या शतकात सलकनपूर संस्थानावर महाराजा कृपाल सिंह यांचे राज्य होते. त्यांच्या राज्यात सर्वत्र भरभराट आणि समृद्धी होती. प्रजा अतिशय सुखी होती. याच काळात महाराजा कृपाल सिंह यांच्या पोटी एका कन्यारत्नाने जन्म घेतला. ही मुलगी अगदी कमळाच्या फुलाप्रमाणे सुंदर असल्याने तिचे नाव कमलापती असे ठेवण्यात आले. कमलापती लहानपणापासूनच हुशार आणि धाडसी होती. शिक्षण, घोडेस्वारी, मल्लयुद्ध, धनुष्यबाण चालवणे अशा सगळ्याच विद्येत ती पारंगत होती. आपल्या हुशारीने आणि कर्तृत्वाने तिने सैन्यदलात चक्क सेनापती पद मिळवण्यापर्यंत मजल गाठली. महाराजा कृपाल सिंह यांच्या सोबत ती युद्धात उतरत असे. तिने स्वतःच्या नेतृत्वाखाली महिलांची एक विशेष सैन्य तुकडी बनवली होती. राजकुमारी कमलापती रणांगणात उतरल्यावर शत्रूची पार दैना उडत असे.

राजकुमारी कमलापतीच्या शौर्याची आणि सौंदर्याची चर्चा हळूहळू सर्वत्र पसरू लागली. याच काळात भोपाळपासून ५५ किमी अंतरावर ७५० गावांचे विलीनीकरण करून गीन्नौरगढ हे नवे संस्थान निर्माण करण्यात आले. सुराज सिंह शाह हे या संस्थानाचे महाराज होते. त्यांचा मुलगा निझाम शाह देखील पराक्रमी आणि शूर होता. राजकुमारी कमलापतीचा विवाह गीन्नौरगढच्या निझाम शाह यांच्याशी लावून देण्यात आला. राणी कमलापती यांचा संसार अगदी सुखात सुरु होता. त्यांच्या संसारवेलीवर पुत्ररुपी फळही लगडले होते. राणी कमलापती आणि राजा निझाम शाह यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव होते नवल शाह.

सलकनपूर राज्यातील बाडी किल्ल्याचा किल्लेदार हा राजा कृपाल सिंह यांचा मेव्हणा. त्यांना चैनसिंह नावाचा एक मुलगा होता. चैन सिंह राणी कमलापतीसाठी पुरता वेडा झाला होता. त्याने कमलापतीसमोर तिच्या लग्नापूर्वी तशी इच्छाही बोलून दाखवली होती, पण चैन सिंहाला कमलापतीने नकार दिला होता. हा नकार पचवू न शकल्याने राणी कमलापतीचा सूड उगवण्यासाठी चैन सिंह तडफडत होता. त्याने मोठ्या प्रेमाने राजा निझाम शाहला भोजनाचे आमंत्रण दिले आणि त्याच्यावर विषप्रयोग करून त्याचा खून केला. राजा निझाम शाहचा पुतण्या अस्लम शाहही चैन सिंहच्या या कटात सहभागी होता. राणी कमलापतीला जेव्हा या बातमीचा सुगावा लागला तेव्हा ती सुडाच्या भावनेने पेटून उठली.

अफगाण शासक दोस्त मोहम्मदच्या मदतीने तिने चैन सिंह आणि अस्लम शाहला धडा शिकवण्याची योजना आखली. दोस्त मोहम्मदने राणी कमलापतीला मदत करण्याचे आश्वासन दिले आणि तो भोपाळ वर चालून आला. चैन सिंह आणि दोस्त मोहम्मद यांच्यातील लढाईत चैन सिंह मारला गेला. अस्लम शाहला देखील राणी कमलापतीने कंठस्नान घातले.

चैनसिंहला मारल्यानंतर दोस्त मोहम्मदची नजर संपूर्ण भोपाळ आणि राणी कमलापतीवर पडली. त्याने संपूर्ण भोपाळ ताब्यात घेऊन राणी कमलापती समोर  विवाहाचा प्रस्ताव ठेवला. राणीसाठी हा मोठाच बाका प्रसंग होता. दोस्त मोहम्मदला रोखण्यासाठी तिने आपल्या १४ वर्षांच्या मुलाला म्हणजेच नवल शाहला पाठवले. नवल शाहजवळ अवघे १०० सैनिक होते तरीही तो दोस्त मोहम्मदशी पंगा घेण्यास सज्ज झाला. ज्या ठिकाणी हे सैन्य आपसात भिडले तिथे प्रचंड रक्तपात झाला होता. या ठिकाणची सगळी जमीन रक्ताने लाल झाली होती म्हणून आजही हे ठिकाण लाल घाटी या नावाने ओळखले जाते. नवल सिंह आणि त्याचे संपूर्ण सैन्य धारातीर्थी पडले. यातून वाचलेल्या दोन सैनिकांनी मनुआभानचा डोंगरावर जाऊन धूर केला आणि राणीला आपल्या पराजयाची वार्ता दिली.

दोस्त मोहम्मद आता राणीच्याच दिशेने निघाला होता. या नामुष्कीतून वाचण्यासाठी कमलापती जवळ एकच मार्ग होता तो म्हणजे जोहार.

भोपाळ सर करून दोस्त मोहम्मद राणी कमलापतीच्या दिशेने निघालाच होता. इकडे राणी कमलापतीने आपल्या महालाशेजारील मोठ्या तलावाचे पाणी छोट्या तलावात सोडण्यास सांगितले. महालातील दागदागिने, सोने-नाणे सगळी संपत्ती तिने छोट्या तलावात फेकून दिली आणि आपल्या दासींसोबत स्वत:ही जलसमाधी घेतली. शत्रूच्या हाती लागण्यापेक्षा तिने स्वतःहून मृत्यूची गळाभेट घेतली.

नंतर संपूर्ण भोपाळ या अफगाण शासकांच्या हातात गेला असला तरी, राणी कमलापतीच्या शौर्याच्या खुणा ते पुसू शकले नाहीत. भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्थानकाला राणी कमलापतीचे नाव दिल्याने तिच्या शौर्याला आणि स्मृतींना पुन्हा एकदा नवी झळाळी प्राप्त होईल हे नक्की.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required