computer

फुटबॉल जगतात खळबळ माजवणारी युरोपियन सुपर लीग काय आहे? तिला विरोध का होतोय?

सध्या फुटबॉल जगतात चर्चा आहे नव्या युरोपियन सुपर लीगची. तसा हा खेळ काही विशेष देशांतच अधिक खेळला जातो. भारतातही लोक फुटबॉल खेळतात, पण तो क्रिकेटसारखा उठसूट कधीही न खेळता बहुतकरून पाऊस पडल्यावरच खेळायचा प्रकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे. काही असो, खेळजगतात काही घडत आहे आणि बोभाटा त्याची दखल घेणार नाही, असं तर होणारच नाही. चला तर मग, जाणून घ्या कोणत्या टीम्स या लीगमध्ये असतील, कोणत्या टीम्स नसतील आणि का? कुणाचा याला पाठिंबा असेल आणि कुणाचा नसेल.. हे सगळं, इथ्यंभूत, इथेच, या लेखात!!

तर, युरोपातल्या आघाडीच्या १२ फुटबॉल क्लब्सनी नविन युरोपियन सुपर लीग सुरू करण्याची घोषणा केली आहे. यावर्षाच्या सुरुवातीपासून असे काही तरी घडेल याची कुजबुज सुरू होती, पण अधिकृत घोषणा झाल्याबरोबर या लीगला विरोध सुरू झाला आहे. यात खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन देखील सामील आहेत. कारण ही स्पर्धा थेट यूएएफएच्या चॅम्पियन्स लीगसोबत स्पर्धा करणार आहे. 

क्लब रचना:

या स्पर्धेत २० प्रमुख क्लब सामील होणार आहेत. या लीगमध्ये १५ संस्थापक क्लब हे लीगचे कायमचे सदस्य असतील आणि दरवर्षी मागील सत्रात केलेल्या कामगीरीच्या आधारावर इतर ५ क्लब सामील होतील. यात १०-१० क्लब्सचे २ ग्रुप असणार आहेत. प्रत्येक ग्रुपचे पहिले ३ क्लब हे क्वार्टर फायनलसाठी जातील, चौथ्या आणि पाचव्या स्थानी असणारे क्लब्स हे उरलेल्या क्वार्टर फायनलच्या जागेसाठी स्पर्धा करतील.

सुपरलीगमध्ये कोण आहे आणि कोण नाही?

सामील झालेल्या क्लब्जमध्ये प्रीमियर लीगचे पारंपरिक बिग सिक्स म्हणजे अर्थातच आर्सेनल, चेल्सी, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल आणि टोटनहॅम हॉटस्पुर हे क्लब्ज सामील आहेत. तसेच स्पॅनिश दिग्गज टीम म्हणजेच रियल माद्रिद, बार्सिलोना आणि एटलेटीको माद्रिद देखील इटलीच्या टीम एसी मिलान आणि इंटर मिलान सोबत खेळणार आहेत.

 २०२० चॅम्पियन्स लीगचे विजेते बायर्न म्युनिक या नव्या योजनेत भाग घेणार नाहीत,  तसेच बोरुसिया डार्टमुंडचे अध्यक्ष हंसजोचिम वत्जके यांनीही त्यांचा क्लब युरोपियन सुपर लीगच्या विरुद्ध आहे असा खुलासा केला आहे. बायर्न आणि डार्टमुंड या जर्मनीच्या मोठ्या टीम्स आहेत.  द गार्डीयन या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार पॅरिस सेंट जर्मन हा क्लबही या नव्या युरोपियन लीगमध्ये सामील नसेल. त्यांची अनिच्छा ही नव्या स्पर्धेत प्रस्तावित असलेल्या पैशांच्या नियमाशी निगडीत असू शकते. युरोपियन सुपर लीगची घोषणा याचवेळी का झाली यामागे देखील विविध कारणे असू शकतात.

जेव्हा लीगची घोषणा झाली तेव्हा चॅम्पियन्स लिगचे प्रस्तावित मॉडेल लाँच होणार होते. आधीच सामन्यांची गर्दी असताना या नव्या मॉडेलमध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाणार होती. काही फुटबॉल लेखक आणि विश्लेषक असे देखील सांगतात की, इएसएलसाठी वर्तमान घोषणा ही यूएएफएसोबत चर्चा सुरू करण्याचे एक धोरण असू शकते. 

क्लब्सनुसार, 'सुपर लीगची निर्मिती अशावेळी करण्यात आली आहे जेव्हा कोरोनाच्या जागतिक संकटाने सध्याचे युरोपियन फुटबॉल मॉडेल हे अनिश्चित करून ठेवले आहे. गेली अनेक वर्षे संस्थापक क्लब हे प्रत्येक सीझननंतर युरोपियन स्पर्धांची गुणवत्ता वाढवण्याचे ध्येय ठेऊन होते. पण कोरोनाने दाखवून दिले आहे की, एक निश्चित धोरण आणि आर्थिक दृष्टीकोण हे संपूर्ण युरोपियन फुटबॉल विश्व तारण्यासाठी गरजेचे आहेत. या सर्व गोष्टींचा निष्कर्ष काढायचा झाला तर युरोपियन फुटबॉल विश्वात जे काही सुरू आहे त्याच्या मुळाशी पैसा हा मोठा फॅक्टर आहे हे समजून येते. 

युरोपियन सुपर लीग प्रत्यक्षात साकार झाली तर त्याचा सर्वात मोठा फटका चॅम्पियन्स लीगला बसेल आणि चॅम्पियन्स लीगची जागा इएसएलने घेतलेली दिसेल. या स्पर्धेला अमेरिकन बँक जेपी मॉर्गन पैसे पुरवणार आहे. या स्पर्धेच्या संस्थापक क्लब्सच्या अधिकृत घोषणेनुसार त्यांच्या पायाभूत गुंतवणूकीसाठी आणि कोरोना रोगाच्या प्रभावाची भरपाई करण्यासाठी 3.5 बिलियन युरो मिळणार आहेत. 

या संस्थापक क्लब्सचे असे देखील म्हणणे आहे की, नव्या लीगसाठी यूएएफए आणि फिफासोबत चर्चा करण्यासाठी ते आशावादी आहेत. संपूर्ण फुटबॉल विश्वासाठी आणि नविन लीगसाठी चांगले परिणाम सिद्ध करण्यासाठी ते प्रयत्न करतील. या नव्या स्पर्धेला मात्र घोषणा झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. फिफा आणि युरोपियन क्लब असोसिएशनने या स्पर्धेवर टीका केली आहे. यूएएफएचे अध्यक्ष अलेक्झांडर कॅफेरीन यांनी या स्पर्धेचा तीव्र शब्दात निषेध केला असून याला लज्जास्पद म्हटले आहे. तर युरोपियन गव्हर्निंग बॉडीने जे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील ते वर्ल्डकप आणि इतर स्पर्धांमधून बॅन केले जातील असे म्हटले आहे. एवढेच नाहीतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ही स्पर्धा रोखण्यासाठी सरकारकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील असे म्हटले आहे.

नवेजुने हा वाद होता, आहे आणि पुढेही राहिलच. या नव्या सुपर लीगचं काय होईल हे येणारा काळच ठरवेल. आपण सामन्यांचा केवळ आनंद लुटू शकतो. सध्या कोरोनाकाळात तर इतकंच शक्य आहे. तुम्हांला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required