शहर अस्तित्वात नाही हे सिद्ध करणाऱ्यास मिळणार ८ कोटी रुपये ? काये आहे हा येडचाप प्रकार ?

मंडळी, आस्तिक आणि नास्तिक लोकांमध्ये देवाच्या अस्तित्वावरून अनेकदा भांडणं होतात. आता देव दिसत नसल्याने फक्त वादच होतात, पण निष्पन्न काहीच होत नाही. समजा डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टीचं अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली तर ? तर मात्र हा प्रकार येडचाप वर्गात मोडतो.
जर्मनीतलं बिलफेल्ड शहरातले लोक सुद्धा सध्या अशाच एका चॅलेंजने व्हायरल झालेत. या लोकांचं म्हणणं आहे की आमचं शहर अस्तित्वात नाही हे सिद्ध करा आणि पैसे मिळवा. एवढे तेवढे नाही तर चक्क ८ कोटी रुपये.
या वेडाची सुरुवात कुठून झाली ?
(युझनेट)
मंडळी, या गोष्टीची सुरुवात २५ वर्षांपूर्वी झाली. १९९४ साली युझनेट या मेसेजिंग सिस्टीमवर एका तरुणाने मेसेज पाठवला की “बिलफेल्ड ? असं कोणतं शहर अस्तित्वातच नाही.”
ज्यावेळी इंटरनेट नव्हतं त्याकाळी ही गोष्ट व्हायरल झाली होती. यानंतर अनेक जोक बनले आणि वेगवेगळ्या थियरीज जन्माला आल्या. इंटरनेट आल्यावर तर या गोष्टीला आणखी हवा मिळाली.
आज २५ वर्षानंतर या गोष्टीचा वापर बिलफेल्डचे लोक मार्केटिंग फंडा म्हणून करतायत. आता बघा ना, त्या कोणत्या वात्रट पोरानं बिलफेल्ड शहराचं अस्तित्व नाकारलं, पण आज अख्ख्या जगात बिलफेल्डचं नाव पोचलं आहे. अशारितीने या शहराचं नाव झालं आणि जास्तीतजास्त पर्यटक पण मिळाले.
जाता जाता महत्वाची गोष्ट समजून घ्या, ही स्पर्धा फक्त जर्मन लोकांसाठी आहे. नाही तर जाल ८ कोटी मिळवायला. तसंही हे ८ कोटी कोणालाच मिळणार नाही, कारण कोणाला हे सिद्धच करता येणार नाही.
तर मंडळी, कसा वाटला हा मार्केटिंग फंडा ?