आपल्या मोटारसायकलच्या 'डिस्क ब्रेक'ला होल का असतात ?

मंडळी, आपण सगळेच मोटारसायकल चालवतो. काळाच्या ओघात मोटारसायकल तंत्रज्ञानामध्येही अनेक बदल झाले आहेत. इंजिनपासून ते डिझाइनपर्यंत झालेल्या या अनेक बदलांमुळे मोटारसायकल चालवणे अधिक सुसह्य झाले. उदाहरणार्थ, पूर्वीच्या गाड्यांना साधे ब्रेक असायचे पण आताच्या गाड्यांना ‘डिस्क ब्रेक’ लावले जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की डिस्क ब्रेकमध्ये भोकं का असतात? त्यांचा खरंच काही उपयोग आहे की फक्त शोभा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या आकारांची भोकं पाडली जातात? चला तर मग जाणून घेऊया…

स्रोत

वेगात चालणाऱ्या गाडीची गती नियंत्रणात आणण्याचे काम ब्रेक करतात. ब्रेकशिवाय गाडीची आपण कल्पनाच करू शकत नाही इतका महत्वाचा हा पार्ट आहे. ब्रेक दाबल्यावर घर्षण निर्माण होऊन गाडीची गती कमी होते आणि गाडी थांबते. पूर्वी येणारे साधे ब्रेक सुद्धा हेच काम करायचे पण त्यांनी क्षमता थोडी कमी असायची. त्यात सुधार करण्यासाठी डिस्क ब्रेकची निर्मिती झाली. गोल चकती सारखे दिसणारे डिस्क ब्रेक हे सुरुवातीला लोखंडापासून बनवले जात असत. नंतर असे लक्षात आले की पाण्यामुळे डिस्क गंजतात आणि लवकर खराब होतात. आता हे ब्रेक  स्टेनलेस स्टीलपासून बनवले जातात. रेसिंग बाईक्सच्या डिस्क ब्रेक मध्ये कार्बन फायबर वापरले जाते. आता पाहूया डिस्क ब्रेक मध्ये भोक का असतात? 

तर हे फक्त शोभेसाठी नसून यामागे विज्ञान आहे मंडळी… डिस्क ब्रेक मध्ये होल असण्याचे मुख्यतः तीन कारण आहेत.

स्रोत

थर्मोडायनॅमिक्सच्या नियमानुसार जिथे घर्षण होते तिथे उष्णता निर्माण होते. मग ब्रेक दाबल्यावर होणाऱ्या घर्षणापासून उष्णता निर्माण होणार हे साहजिकच आहे. ही उष्णता धातूला गरम करते आणि धातूच्या क्षमतेवर तसेच आकारावर परिणाम करते. आता विचार करा, सारखे ब्रेक दाबून डिस्कवर किती परिणाम होत असेल? तर त्यामुळेच तयार होणारी उष्णता त्वरित बाहेर पडावी म्हणून डिस्कला होल्स पाडलेले असतात.

दुसरे कारण म्हणजे अतिरिक्त वजन कमी करणे. तुम्ही पाहिलं असेल की जड भरीव धातूपासून बनवलेल्या डिस्क ब्रेकचे वजन सुद्धा जास्त असते. या जास्तीच्या वजनाचा परिणाम गाडीच्या परफॉर्मन्स वर होतो. 200-300 ग्राम वजन हे हाताळायला सोपे असले तरी एखाद्या मशीनच्या कार्यक्षमतेवर ते मोठा परिणाम करू शकते. आता तर काही बाईक्सना पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक लावलेले असतात. होल्स पाडल्याने हे वजन कमी होते.

स्रोत

तिसरे कारण म्हणजे पाण्यापासून बचाव. कल्पना करा, तुम्ही भर पावसातून प्रवास करताय आणि गाडी संपूर्ण ओली आहे. सपाट विना होल्सचे डिस्क ब्रेक आणि ब्रेक पॅडसुद्धा उघड्यावर असल्याने ओले झालेले आहेत आणि अश्यातच तुम्ही ब्रेकचा वापर करता… ब्रेक लागेल का? नाही! कारण ओलसरपणामुळे घर्षण निर्माणच होणार नाही. म्हणूनच ही परिस्थिती टाळण्यासाठी होल्स पाडले असतात जेणेकरून ब्रेक पॅडसना चकतीवर व्यवस्थित पकड मिळावी आणि ओले असतानाही घर्षण निर्माण व्हावे. 

स्रोत

आता तुम्हाला समजले असेल की डिस्क ब्रेकला पाडलेली भोकं ही फक्त शोभेसाठी नसून ती कामासाठी आहेत. जर कुणाला अशी परत शंका आली तर वरील उत्तरे देऊन तुम्ही त्याचे समाधान करू शकता. 

पण मंडळी, डिस्क ब्रेक आहेत म्हणून रस्त्यावर जोरात गाडी चालवण्याचे आणि स्टंट करण्याचे प्रकार करू नका बरं! हे स्टंट फक्त प्रोफेशनल लोक योग्य जागी करतात. लक्षात ठेवा, डिस्क ब्रेक हे सुरक्षेसाठी बनवले गेले आहेत… सुरक्षा धोक्यात टाकण्यासाठी नाही. 

आपला प्रवास नेहमी सुखाचा होवो अश्या बोभाटातर्फे शुभेच्छा...

सबस्क्राईब करा

* indicates required