computer

एसबीआय बँक डेबिट कार्ड बंद का करत आहे ? हे आहेत महत्वाचे मुद्दे !!

डिजिटल पेमेंटमुळे नगदी व्यवहार बंद झाला, पण आता हे एवढ्यावरच थांबणार नाहीय. थोड्याच दिवसात तुमच्या खिशातला डेबिट कार्डपण इतिहास जमा होईल. याची सुरुवात आज एसबीआय या भारतातल्या एका महत्वाच्या बँकेने केली आहे.

मंडळी, एसबीआय बँक पुढील ५ वर्षात डेबिट कार्ड हद्दपार करण्याच्या तयारीत आहे. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या देशात ९० कोटी डेबिट कार्ड आहेत, तर ३ कोटी क्रेडीट कार्ड आहेत. येणाऱ्या वर्षात त्यांना हे प्लास्टिक कार्ड हद्दपार करून ‘योनो’ सारख्या प्लॅटफॉर्म्सना वाढवायचं आहे.

योनो काय प्रकार आहे ?

योनो हे एसबीआयचं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. योनो अॅपच्या स्वरुपात ‘अॅप स्टोर’ व ‘गुगल प्ले’वर उपलब्ध आहे. याखेरीज एसबीआयच्या ATMवर योनो सुविधा आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे एसबीआयचे ग्राहक कोणत्याही कार्डशिवाय ATM मधून पैसे काढू शकतात.

रजनीश कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे योनोमुळे ग्राहक कार्डशिवाय खरेदी करू शकतो, पैसे काढू शकतो आणि पैसे पाठवूही शकतो. याखेरीज योनो प्लॅटफॉर्म क्रेडीट कार्ड सारखं पण काम करू शकतं. म्हणजे डेबिट कार्ड नंतर क्रेडीट कार्ड पण हद्दपार होईल.

एसबीआयने आजवर ६८,००० योनो कॅशपॉईंट बसवले आहेत. पुढच्या १८ महिन्यांमध्ये ही संख्या १० लाख इतकी होईल. अशा पद्धतीने पुढच्या ५ वर्षात डेबिट कार्ड खिशात घेऊन फिरण्याची कमीतकमी गरज पडेल.

तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, डेबिट कार्ड बंद करण्याचा निर्णय बरोबर आहे का ? तुमचं मत नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required