computer

नवर्‍यासाठी वाट्टेल ते! त्याला तुरुंगातून पळवून नेण्यासाठी तिनं केली प्रचंड धाडस!!

सिनेमातील प्रेमवीर नायिकेसाठी काहीही दिव्य करतात. प्रेमासाठी जीव देणं किंवा घेणं ही क्षुल्लक बाब आहे हा संदेश अनेक चित्रपटांनी तरुणांच्या मानत खोलवर रुजवला. चित्रपट बघून प्रेमवीर उदयाला आले की वास्तवात असे वेडे प्रेम करणारे बघून चित्रपट निर्माण झाले हा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. पण अशा गोष्टी फक्त चित्रपटात घडत नाही हे सिद्ध करणारी एक घटना तुम्हाला सांगणार आहे. घाबरू नका, या घटनेत जे काही दिव्य केलय ना, ते नायकाने नायिकेसाठी नाही, नायिकेने नायकासाठी केलं आहे. आजच्या कहाणीतल्या नायिकेचं नाव आहे नदीन वॅजोअर!

आता ही कोण??? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. कारण तुम्हाला इतिहासातल्या जोड्या माहीत आहेत,चला मग, बघूच या ही आगळीवेगळी प्रेमकहाणी.

ही कहाणी घडली १९८६ मध्ये. याची सुरुवात झाली एका केसच्या निकालाने! ३४ वर्षीय मिचेल वॅजोरला सशस्त्र लूट केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. त्याचे नियोजन फसल्याने पोलिस अधिकाऱ्यानी त्याला आणि या कृत्यात सहभागी असणाऱ्या इतरांना रंगेहाथ पकडले. हे फ्रान्समध्ये घडले. तिथे अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा असतात. मिचेलला १८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि यातून लवकर सुटका होऊ शकेल अशी काहीही आशा नव्हती. पॅरिसमधील ‘ले सांते’ या कारागृहात त्याला ठेवण्यात आले.

इथं जास्त काळ राहायचं नाही हे त्याच्या डोक्यात आधीपासूनच घोळत होतं. पहिल्या काही महिन्यांतच त्यानं तिथून पळून जाण्याचे चार प्रयत्न केले. पण एकही यशस्वी झाला नाही. तो वारंवार सुटकेचे असे बेकायदेशीर प्रयत्न करत राहिला. कारण त्याचं त्याच्या बायकोवर नितांत प्रेम होतं आणि १८ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी तिच्या शिवाय काढण्याच्या कल्पनेने तो कासावीस झाला होता. आपल्या एकट्याचे प्रयत्न पुरेसे नाहीत तर कोणीतरी बाहेरून मदत करणारी व्यक्ती मिळायला हवी याची त्याला कल्पना होती. इथं एंट्री झाली त्याच्या प्रिय पत्नी नदीनची!

नदीन त्याला भेटायला तुरुंगात यायची. येताना घरी बनवलेले खाद्यपदार्थ घेऊन यायची. त्यात मिचेलसाठी काही माहिती किंवा सूचना लिहिलेली एखादी चिट्ठी लपवलेली असायची. गार्डच्या लक्षात येऊ नये याची ती खबरदारी घ्यायची. मार्च ८६ मध्ये तिने मिचेलला अशाच एका चिट्ठीमार्फत कळवले की अमुक अमुक दिवशी त्याची सुटका होईल.

या योजनेचा सुरुवातीचा भाग म्हणून नदीन हेलिकॉप्टर उडवण्याचे प्रशिक्षण घेत होती. प्रायव्हेट पायलट लायसन्स मिळवणे हा तिचा मुख्य उद्देश होता. ८० च्या दशकात अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणे ही महागडी बाब होती. पण तरी यामागे पलायनाच्या गुन्ह्याचा सुनियोजित कट आहे याची कोणालाही कसलीही शंका आली नाही. कारण ‘असतो एखाद्याला छंद काही नवीन शिकत राहण्याचा’ असे वाटून लोकांनी याकडे काणाडोळा केला. नदीनने व्यवस्थित योजना आखली. तिचे लायसन्स तिच्या हातात पडायला तीन महिन्यांचा कालावधी लोटणार होता. म्हणजे लायसन्स तिच्या हाती २७ मे १९८६ या तारखेला पडणार होते. म्हणून मिचेलच्या सुटकेसाठी तिने एकही दिवस मध्ये न दवडता २८ मे १९८६ ही तारीख आणि सकाळी दहा वाजताची वेळ ठरवली.

नुसते हेलिकॉप्टर नेऊन उपयोग नाही हे तिला माहीत होते. तिने एक खेळण्यातले पिस्तूल आणले. त्याला काळया रंगाने रंगवून खऱ्या पिस्तुलासारखे दिसेल असे रंगरूप दिले. काही संत्री आणून त्यांना हिरवा रंग चोपडला. त्यामुळे ते ग्रेनेडसारखे दिसू लागले. या बनावट शस्त्रांच्या आधारे गार्ड्सना धमकावून हेलिकॉप्टर शक्य तितक्या जवळ न्यायचे जेणे करून मिचेल पटकन त्यात बसू शकेल हा तिचा विचार होता.

प्रत्यक्षात थोडा घोटाळा झालाच! एखादे हेलिकॉप्टर असे थेट तुरुंगात उडत येईल याची कल्पना नसलेले गार्ड्स बेसावध होते. नदीनने मिचेलला त्या दिवशी इमारतीच्या छपरावर थांबायला सांगितले होते. कोणाच्या तरी मदतीशिवाय हे शक्य नाही हे त्याला माहीत होते. त्याने तुरुंगातल्याच एका मित्राला, पिअरी हर्नांडीझ याला मदत करण्याची विनंती केली. त्याबदल्यात ते त्यालाही हेलिकॉप्टरमध्ये घेणार होते. नदीन हेलिकॉप्टर घेउन छपरावर पोहचली तेव्हा हे दोघेही तिची वाट पाहत थांबले होतेच. तिने हेलिकॉप्टरमधून एक दोर सोडला. हर्नान्डीझच्या मदतीने मिचेल त्या दोरावरून चढला. मिचेल हेलिकॉप्टरमध्ये पोहचेपर्यंत खाली पोलीस पोहचले होते. त्यामुळे त्याला तिथेच सोडून हे दोघे निघून आले.

कोणीही गोळीबार केला नाही. पण ट्राफिक एअर कंट्रोलने नदीनला सूचना दिल्या की ती प्रतिबंधित क्षेत्रात हेलिकॉप्टर उडवत आहे आणि तिने ताबडतोब ते लँड करावे. पॅरिस विद्यापीठाच्या कँपसच्या दिशेने नदीनने हेलिकॉप्टर उडवले. तिथे भरपूर मोकळी जागा तर होतीच, पण तिथेच एक ड्रायव्हर त्यांची वाट पाहत उभा होता. तिने यशस्वीरित्या लँडिंग केले आणि शक्य तितक्या लवकर राजधानीच्या बाहेर जाण्याच्या तयारीला लागले.

तिने लँड केलेल्या हेलिकॉप्टरपर्यंत पोलीस पोहचले. तोपर्यंत उशीर झाला होता. हेलिकॉप्टरच्या नंबरवरून त्यांनी तपास केला असता त्यांना आढळले की ते लोकल एअरफील्डमधून भाड्याने घेतले आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार नदीनने तिचं लायसन्स आणि त्यासंबंधी सर्व कायदेशीर कागदपत्रे हेलिकॉप्टरमध्ये ठेवली होती.
काही वर्षांनी दोघांनाही पकडण्यात पोलीसांना यश मिळाले. दोघांनाही तुरुंगात डांबण्यात आले. मिचेलला त्याची मूळ शिक्षा पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात आले. या सुटकेच्या हकीकतीचे रंजक वर्णन त्याने २००५ साली लिहिलेल्या एका पुस्तकात केले आहे.

बघितलंत, प्रेम माणसाला किती धाडसी बनवतं? आपल्या प्रेमाच्या माणसाबरोबर राहण्यासाठी नदीनने किती बेकायदेशीर आणि जीवावर बेतणारी धाडसे केली?

सबस्क्राईब करा

* indicates required