computer

अर्चना तिंमराजू: मोटारसायकल चालवणारी जगातली पहिली स्त्री!! तिची पुढची स्वप्नं तर जाणून घ्या!!

बाईक म्हणजे तरुणाईच्या गळ्यातला ताईत. बाईक म्हणजे स्वातंत्र्याचं प्रतीक, मुक्तपणे हिंडण्याची संधी. सुट्टीच्या दिवशी बाईकवरून यथेच्छ भटकत नवनवीन ठिकाणं धुंडाळत राहाणं हा एक हमखास स्ट्रेसबस्टर आहे. उगाच नाही, तिची सर्वत्र इतकी क्रेझ आहे. रस्ता मोकळा असो वा रहदारीचा, झुंईऽऽ झुंईऽऽ करत वाट काढत जाणार्‍या या देखण्या गाड्या आणि हेल्मेट घालून त्यावर सवार झालेली तरुणाई हे दृश्य मनोमन दाद द्यावी असंच! चित्तथरारक!!

बाईक हे तसं ‘रांगडं’ व्यक्तिमत्त्व असलेलं वाहन. खास पुरुषांना शोभेल असं. पण आजकाल मात्र अनेकदा मुली-बायकाही तिच्या प्रेमात पडून मनमुराद भटकंतीचा आनंद लुटताना दिसतात, मग यात धर्म, वय, लिंग, सामाजिक दर्जा, शारीरिक/मानसिक क्षमता यांचा कुठलाही अडथळा येत नाही. अर्चना तिम्माराजू ही यापैकीच एक.

पण अर्चना बाईक चालवू इच्छिणाऱ्या इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहे. ती कर्णबधिर आहे. तिला आपण बोललेल्यातलं केवळ ४०% ऐकू येतं. आणि हीच अर्चना तिम्माराजू, ‘मोटरबाईक चालवणारी जगातली पहिली कर्णबधिर महिला’ हे बिरुद मिरवतेय.

ती जन्मत:च कर्णबधिर. स्पीच थेरपीमुळे ती साइन लँग्वेजमध्ये इंग्रजीच्या माध्यमातून संवाद साधू शकते. बंगळुरूच्या अदिती मल्ल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती कलाशिक्षक आहे. आतापर्यंत तिने २०,००० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास बाईकवरून केला आहे. त्यात डिसेंबर २०१८ मधल्या इस्ट टु वेस्ट सदर्न कोस्टल राईडचा आणि बंगळुरू ते लेह क्रॉस कंट्री राईडचा समावेश आहे. भलेही तिला रहदारीत गाड्यांचे हॉर्न ऐकू येत नसतील, पण आपल्या बाईकची स्पंदनं अगदी व्यवस्थित जाणवतात. आपल्या क्षमतेवर आणि स्वप्नांवर तिचा विश्वास आहे. हा विश्वास शरीराने धडधाकट असूनही मनात सतत भीती आणि असुरक्षिततेची भावना बाळगून कुचमत जगणार्‍या सामान्यजनांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. अर्थात हे सगळं एका रात्रीत घडून आलेलं नाही, त्यामागे तिची अनेक वर्षांची मेहनत आहे.

बालपण आणि शिक्षण

अर्चनाचा जन्म हैदराबादचा. तिथल्या विद्यारण्या स्कूलमध्ये तिचं सुरुवातीचं शिक्षण झालं. पहिल्यापासूनच तिला अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टसची आवड होती. ट्रेकिंग, स्कूबा डायव्हिंग अशा धाडसी क्रीडाप्रकारात तिला रस होता. त्याचवेळी ती हळूहळू स्कूटर, छोट्या गाड्या आणि वडिलांची जीप चालवू लागली. ड्रायव्हिंगचा पहिला किडा चावला तो इथेच.

पुढे शालेय शिक्षण संपल्यावर तिने कर्नाटक चित्र कला परिषद येथे स्कल्प्चर (शिल्प) या विषयातलं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. तिने केलेल्या काही कलाकृती हैदराबादजवळच्या शिल्पारामम येथील स्कल्प्चर पार्कमध्ये उभ्या राहिल्या. पण त्यावेळी ड्रायव्हिंगच्या आघाडीवरही काहीतरी घडत होतं, घडणार होतं...

बाईकिंगचा प्रवास

यादरम्यान तिचं बाईकप्रेम वाढत गेलं. कॉलेजमध्ये असताना तिने एका मित्राकडून त्याची यामाहा आर एक्स १०० ही बाईक दोन महिन्यांसाठी भाड्याने घेतली. बाईकवर ‘राईड’ कसं करायचं हे ती तेव्हा शिकली. मग हळूहळू कर्नाटकातल्या डोंगर दर्‍यांत आणि घाटांमध्ये भटकंती सुरू झाली. आपण बाईकर व्हावं आणि कर्णबधिरांचं आयुष्य बदलण्यासाठी काहीतरी करावं असं तिला वाटायला लागलं. पुढच्या काही वर्षांत तिने अशा प्रकारे भाड्याच्या बाईक्स वापरल्या. २०१८ मध्ये तिचं एक स्वप्न साकार झालं- तिची स्वत:ची बाईक! रॉयल एनफील्ड थंडरबर्ड 350 सीसी!!

मात्र यासाठी लायसन्स मिळवताना तिला अनेक अडचणी आल्या. ती कर्णबधिर असल्याने जास्तच. अगदी लायसन्ससाठी अर्ज करण्यापासून टेस्ट देण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तिला उपेक्षा आणि अनास्थाच जाणवली. वास्तविक, मोटार वाहन अधिनियमामध्ये कर्णबधिर व्यक्तिंचे अर्ज विचारात घेण्याविषयीची तरतूद होती. पण तरीही त्यांना लायसन्स मिळवताना अनेक अडचणी येतात हे तिच्या लक्षात आलं.

बंगळुरू ते लेह क्रॉस कंट्री राईड

तिच्या आतापर्यंतच्या सर्व साहसी मोहिमांमध्ये सर्वाधिक उल्लेखनीय ठरलेली मोहीम म्हणजे बंगळुरू ते लेह ही बाईकवरून केलेली सफर. तब्बल ८४०० किमी अंतर तिने या प्रवासात पार केलं. ३० दिवसांची ही मोहीम तिला समृद्ध करून गेली. लडाखमधल्या खारदुंगला (जगातील सर्वाधिक उंचीवरचा गाडीरस्ता), पॅन्गाँग सरोवर(खार्‍या पाण्याचं सरोवर), चांग ला पास अशा ठिकाणांना तिने भेटी दिल्या. जम्मूमध्ये वास्तव्यादरम्यान तिथली संस्कृती समजून घेणं, स्थानिक लोकांशी संवाद साधणं, तिथल्या स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणं यात १० दिवस सार्थकी लागले.

सायलेन्ट एक्स्पीडिशनची सुरुवात

अर्चनाने आपला सहकारी डॅनियल सुंदरम याच्या सहकार्याने २०१८ मध्ये सायलेन्ट एक्स्पीडिशन हा स्टार्टअप सुरू केला आहे. कर्णबधिरांना पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देण्याचं प्रमुख ध्येय डोळ्यांसमोर ठेवून. याशिवाय चिह्नांच्या भाषेसारखी संवादाची माध्यमं, कला, पर्यटन, रायडिंग यांचा प्रसार करणं हाही यामागचा उद्देश आहे. या स्टार्टअपद्वारे महिलांना आणि कर्णबधिर व्यक्तिंना नव्या वाटा शोधण्याचीही संधी मिळणार आहे.

भविष्यकालीन योजना

अर्चनाला आता वेध लागलेत अजून मोठ्या आव्हानाचे. मोटरसायकलवरून जगभ्रमंती. ७ खंड आणि ७० देश चाकाखालून घालण्यासाठी जवळपास ६५० दिवस म्हणजे अंदाजे 2 वर्षं एवढा कालावधी ठरवण्यात आला आहे. जागतिक स्तरावरच्या विविध संस्थांचे भारतातल्या कर्णबधिर व्यक्तिंकडे लक्ष वेधून घेऊन त्यांना या व्यक्तिंना आर्थिक मदत करण्यासाठी प्रवृत्त करणं हा तिचा यामागचा हेतू आहे. यातून जो संवादाचा सेतू निर्माण होणार आहे, त्यामुळे भारतातल्या दिव्यांगजनांचं आयुष्य सुखकर व्हावं अशी तिची अपेक्षा आहे.

अशक्यप्राय गोष्टी आव्हान म्हणून स्वीकारणं आणि ते पेलण्यासाठी सगळ्या मर्यादा पार करणं हा एक वेगळाच अनुभव आहेे. मग कधी कृत्रिम पायांच्या आधारावर एव्हरेस्टला गवसणी घातली जाते, तर कधी जीवघेण्या आजारातून उठल्यावरही उच्च शारीरिक क्षमतेचा कस पाहणार्‍या स्पर्धेचे वेध लागतात. सामान्यांमधल्या असामान्यतेचा इथेच जन्म होतो. अर्चना तिम्माराजू हिने हेच दाखवून दिलं आहे. गरज आहे धडधाकट लोकांनी तिच्याकडून प्रेरणा घेण्याची!!!

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

 

सबस्क्राईब करा

* indicates required