हळदणकर, त्यांची कन्या आणि अजरामर पेंटिंग!! यामागची कथा वाचायलाच हवी!!

वरील जगप्रसिद्ध चित्र अनेक वर्षांपासून राजा रविवर्मा यांच्या नावावर खपवलं जात आहे. खरी गोष्ट अशी आहे की हे चित्र ‘एस एल हळदणकर’ या चित्रकाराने १९३२ साली काढलं होतं. आज या चित्राची आठवण होण्यामागचं कारण म्हणजे चित्रात दिसणारी चित्राची नायिका आज वयाच्या १०२ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेली आहे. या नायिकेचं नाव आहे ‘गीता उपळेकर’. आपल्यातील अनेकांना ही नायिका जिवंत होती का ? असा प्रश्न पडेल. हा प्रश्न साहजिक आहे कारण १०२ वर्षांच्या वयात त्या फारशा प्रकाशात आल्या नाहीत. आज आपण या अज्ञात नायिकेबद्दल आणि तिच्या जगप्रसिद्ध चित्राबद्दल जाणून घेणार आहोत.

या चित्राला ‘ग्लो ऑफ होप’ म्हणतात. चित्राची कथा अशी :

स्रोत

एस एल हळदणकर हे गीता उपळेकर यांचे वडील. साल होतं १९३२. दिवाळीचे दिवस होते. घरात दिवाळीची लगबग सुरु होती. अवघी १६ वर्षांची गीता आईची साडी नेसून घरात पणत्या लावत होती.  मेणबत्ती विझू नये म्हणून तिने मेणबत्तीच्या पुढे हात धरला होता. हे दृश्य हळदणकरांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांना चित्राची कल्पना सुचली. त्यांनी लगेच गीताला बोलावून समोर उभं केलं. पुढील ३ दिवस, दिवसातून ३ तास ती चित्रातल्या पोज मध्ये उभी राहिली. या ३ दिवसांच्या मेहनतीनंतर साकारलं गेलं जगातलं एक मास्टरपीस. हे चित्र जलरंग’ पद्धतीने साकारलं गेलंय. चित्र काढण्याची ही अत्यंत कठीण पद्धत समजली जाते.

स्रोत

चित्र तयार झाल्यानंतर हळदणकरांनी चित्राला अनेक प्रदर्शनांमध्ये ठेवलं. लोक या अप्रतिम चित्राच्या प्रेमात पडले नसते तरच नवल. अनेक बड्या लोकांनी चित्राला मागणी घातली पण हळदणकरांनी चित्र विकण्यास नकार दिला. याचं एक कारण असंही होतं की चित्रातली नायिका ही त्यांचीच मुलगी होती. अनेकांना नकार दिल्यावर शेवटी मैसूरच्या राजाने चित्र विकत घेतलं. त्याकाळी हळदणकरांनी चित्राला केवळ ३०० रुपयांना विकलं होतं. आज या ‘ग्लो ऑफ होप’ची किंमत कोटीच्या घरात आहे.

स्रोत

आज हे चित्र मैसूरच्या जगन्मोहन पॅलेसच्या ‘जयचमा राजेंद्र आर्ट गॅलरी’ मध्ये राजा रविवर्मा यांच्या चित्रांसमवेत आहे. अनेकजण या चित्राला पाहण्यासाठी जगन्मोहन पॅलेसला भेट देतात. कदाचित राजा रविवर्मा यांच्या चित्रांसमवेत ठेवलेलं असल्याने तज्ञांना सुद्धा हे चित्र राजा रविवर्मा यांचच असल्याचा समज झाला असावा.

चित्र जगप्रसिद्ध झालं पण चित्रातली नायिका मात्र अनेक वर्ष अज्ञातच राहिली. गीता उपळेकर यांनी त्यांच्या १०० व्या वाढदिवशी एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा त्यांनी चित्राच्या जन्मकथेबद्दल स्वतः माहिती दिली होती. आज त्या आपल्यात नाहीत पण या चित्राच्या रूपाने त्या अजरामर झाल्या आहेत.

स्रोत

या अज्ञात नायिकेला आणि एस एल हळदणकरांना बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required