युगांडातल्या या महिलेने का केले स्वतःशी लग्न?

लग्नाचं वय झाल्यावर मुलगा असो की मुलगी, प्रत्येकाच्यामागे लग्नाची भुणभुण लागतेच. आता हे फक्त भारतात आहे का? तर नाही. हे तर जगभरात सगळीकडे आहे राव. देश कोणताही असो, आईवडील सारखेच. आता हेच बघा ना, ऑक्सफर्डमध्ये शिकणाऱ्या ‘लुलू जमिमा’ (वय वर्ष ३२) या मुलीवर तिचे आईवडील लग्नासाठी दबाव आणत होते. आपण तिच्या जागी असतो तर लग्नच केलं नसतं किंवा आईवडिलांची मर्जी म्हणून केलंही असतं.
पण लुलुने भलतंच केलं. तिने लग्न तर केलं पण स्वतःशीच!!
राव, ती लग्नस्थळी नवरीच्या वेशात आली आणि तिने आमंत्रितांसमोर सांगितलं की ती स्वतःशीच लग्न करणार आहे. या आगळ्यावेगळ्या लग्नासाठी तिने मित्रांना व नातेवाईकांना बोलावलं होतं. तिच्या मित्रांना तिचा स्वतःशीच होणारा विवाह चक्क मान्यदेखील होता. तिचे आईवडील मात्र या लग्नाला हजार नव्हते राव.
मंडळी, लुलूला या लग्नाचा खर्च फक्त २ पाउंड आला आहे. हा’ तब्बल’ २ पाउंडचा खर्च तिच्या टॅक्सीचं भाडं होतं राव. बाकी सगळा खर्च तिच्या मित्रांनी केला होता.
मंडळी, ‘लुलू जमिमा’ला ऑक्सफर्डमध्ये ‘क्रियेटीव्ह रायटिंग’ शिकायचं आहे. शिवाय तिला तिची स्वप्नं पण पूर्ण करायची आहेत. पण तिच्या आईवडिलांना फक्त तिच्या लग्नाची चिंता होती. लुलूने त्यांची चिंता मिटवली पण आपल्या पद्धतीने. तिच्या आईवडिलांना याबद्दल विचारल्यावर ते दोघेही ‘निशब्द’ झाले आहेत.
आजकाल स्वतःशीच लग्न करण्याची फॅशन युरोपात बोकाळली आहे असं म्हणतात. स्वतःशीच केलेल्या लग्नाला ते सोलोगॅमी असं म्हणतात. ते तिकडे चालेल हो, आपल्याकडचे आईबाबा इतकं इमोशनल ब्लॅकमेल करतील की अशा लोकांना स्वतःशीच काडीमोड घेऊन नीट व्यवस्थित लग्न करावंच लागेल. तुम्हांला काय वाटतं?