computer

वर्दीतल्या दुर्गा: १५ महिन्यांत १६ दहशतवाद्यांना मारणारी लेडी दबंग ऑफिसर 'संजुक्ता पराशर' !

जर तुम्ही आसाममध्ये भेट दिलीत तर संजुक्ता पराशर या महिला अधिकाऱ्याचे नाव खूप लोकप्रिय आहे. संजुक्ता या आसाममध्ये आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या धाडसाने आणि शौर्याने तिथल्या गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडले आहे. केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी १६ दहशतवाद्यांना ठार केलं, तर ६४ पेक्षा अधिक दहशतवाद्यांची तुरूंगात रवानगी केली. हातात एके ४७ घेऊन त्या स्वत: जंगलात घुसून दहशतवाद्यांवर वचक बसवतात. आज ओळख करून घेऊयात या आयर्न लेडी संजुक्ता पराशर विषयी.

संजूक्ता पराशरचा जन्म ३ ऑक्टोबर १९७९ रोजी आसाममध्ये झाला. त्यांचे वडिल दुलाल चंद्र बरुआ हे सिंचन विभागात अभियंता म्हणून काम करतात आणि आई मीना देवी या आरोग्य विभागात कार्यरत आहेत. संजूक्ता यांनी आसाममधील गुवाहाटी आर्मी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत असल्यापासून त्यांना खेळात विशेष आवड होती. त्या शाळेत प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन त्यात जिंकण्यासाठी मेहनत घेत. त्यांना पोहण्याची खूप आवड होती. शालेय शिक्षणानंतर त्या दिल्लीत आल्या. त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जेएनयूमधून इंटरनॅशन रिलेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि यूएस फॉरेन पॉलिसीमध्ये MPhil आणि Ph D केलं. जेएनयूमधून शिक्षण पूर्ण करतानाच त्या युपीएससीचीदेखील तयारी करत होत्या. २००६ मध्ये त्या युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या, त्या परीक्षेत त्यांचा ८५ वा क्रमांक आला. त्यांना एखादा डेस्क जॉब पण करता येणे शक्य होते, पण त्यांच्या धडाडीच्या स्वभावामुळे त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांची आसाम मेघालय कॅडरसाठी निवड झाली. संजुक्ता यांना २००८ मध्ये आसामच्या माकुम जिल्ह्यात असिस्टंट कमाडंट म्हणून पहिली फिल्ड पोस्टींग मिळाली.

त्यांना उदलगिरीमध्ये बोडो आणि बांगलादेशी यांच्यातील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवण्यात आले. संजुक्ता पराशर यांनी बोडो दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. तिथेच त्यांनी केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत १६ दहशतवाद्यांना ठार केलं, तर ६४ पेक्षा अधिक दहशतवाद्यांची तुरूंगात रवानगी केली. हा एक रेकॉर्डच आहे. हाती एके ४७ घेऊन त्या स्वत: जंगलात कोंबिंग ऑपरेशन केले. इतक्या बेधडक कारवाईने त्यांचे सगळीकडे कौतुक झाले. एखाद्या महिला अधिकाऱ्याने दहशतवाद्यांच्या मनात खरोखर धडकी भरवली होती. त्यांना अनेक धमकीचे फोन आले, प्रसंगी घाबरवण्यात आले, पण त्या कोणालाच घाबरल्या नाहीत. देशसेवा आणि निडरपणा त्यांच्या रक्तातच आहे.

वैयक्तिक जीवनात त्या खूप प्रेमळ आहेत. त्या म्हणतात मला गुन्हेगार आणि दहशदवादी यांच्याशिवाय कोणीही घाबरु नये. त्यांचे लग्न आयएएस अधिकारी पुरू गुप्ता यांच्याशी झाले आहे. त्यांना एक लहान मुलगादेखील आहे. बऱ्याचदा दोन महिन्यांतून फक्त एकदाच त्यांना आपल्याला कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. एक आई म्हणून त्यांना याची खंत ही वाटते. पण देशसेवा हाच धर्म मानलेल्या संजूक्ता यांना कर्तव्यही तितकेच महत्वाचे आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात त्या धीराने सामोरे जातात. सध्या त्या नॅशनल इंटलिजस एजंसी (NIA) नवी दिल्लीत पुलिस उपमहानिरीक्षक म्हणजे डीआयजी म्हणून कार्यरत आहेत.

आजही ज्यांचं नावही एकून गुन्हेगार आणि दहतवाद्यांचाही थरकाप उडतो अश्या धाडसी पोलीस अधिकारी संजुक्ता पराशर यांना एक कडक साल्युट तर झालाच पाहिजे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required