computer

लॉटरीचे पैसे मित्र आणि आप्तेष्टांत वाटून टाकलेल्या दानशूर जोडप्याची गोष्ट कधी वाचलीय?

मला लॉटरी लागली तर? असे स्वप्न आयुष्यात प्रत्येकाने बघितले असेल. शाळेत निबंधही लिहिले असतील. यातला विनोदाचा भाग सोडला तर आयुष्यात झटपट पैसा मिळवण्यासाठी अनेकजण लॉटरीच्या तिकटाकडे वळतात. ही नशीब पलटवणारी लॉटरी एकदा तरी लागू दे म्हणून कितीतरी जण रोज तिकीट घेतात. त्यात एखाद्या भाग्यवंताला खरच लॉटरी लागली तर तो आधी काय विचार करेल? स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सर्व पैसे खर्च करेल, आलिशान घर घेईल,गाडी, बंगला, ट्रिप असा प्लॅन करेल. पण मँचेस्टरच्या एका जोडप्याने लॉटरीचे पैसे चक्क मित्र आणि नातेवाईकांना वाटले! त्यांनी ३० चेक आपल्या जवळच्या आप्तेष्टांना कोणताही आव न आणता गुपचूप दिले.

या आगळ्यावेगळ्या जोडीचे नाव आहे, शेरॉन आणि निगेल माथेर. यांनी २०१० मध्ये अंदाजे १०४ कोटी रुपये किंमतीची युरोमिलियन्स लॉटरी जिंकली. त्यांना अनपेक्षित लॉटरी लागल्यावर त्यांनी गाजावाजा न करता शांत राहायचा निर्णय घेतला. त्यांनी मोठे घर घेतले. त्यांच्या जीवनात अनेक मोठे बदल घडणार होते, म्हणून त्यांनी या पैशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता सगळ्यांना ते वाटायचे असा निर्णय घेतला. हॉटेल मॅनेजर निगेल आणि कौन्सिल कार्यकर्ता शेरोन यांनी त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींच्या नावांनी भरलेली यादीच तयार केली. त्या यादीनुसार त्यांनी चेक वितरित केले. त्यात ३०जणांची नावे होती. त्यांच्या नातेवाईकांना चेक देताना त्यांनी त्यात एक संदेश ही दिला. ज्यात लिहिले होते, " कृपया आम्ही जे जिंकलो तिची तुलना म्हणून ही रक्कम पाहू नका. फक्त असा विचार करा की या पैशाने तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल." त्यांच्या मित्र नातेवाइकांना ही अनपेक्षित भेट खूप आवडली.

नातेवाईकांना चेक मिळाले तेव्हा त्यांना हे काहीतरी ''द सिक्रेट मिलियनेअर' रिऍलिटी शो मध्ये असते तसे असावेसे वाटले. या रिऍलिटी शोमध्ये कोणी अब्जाधीश गुप्तपणे जो गरजू भेटेल त्याला पैसे देतो. ३० जणांची यादी संपल्यावर शेरॉन आणि निगेल यांनी खूप मोठी रक्कम मँचेस्टरच्या फ्रान्सिस हाऊस हॉस्पिसला म्हणजे एका एनजीओला देणगी म्हणून ही दिली.

पैशांची या जोडप्याला अगदीच गरज नव्हती असेही नव्हते. लॉटरी जिंकली तेव्हा यांची स्वत:ची दोन मुलं १ आणि ३ वर्षांची होती. आता ते १३ आणि १५ वर्षांची आहेत . त्यांना शाळेतल्या मित्रांनी सांगितले तेव्हा मुलांनी घरी येऊन विचारले की आई आपण लॉटरी जिंकलो होतो का? तेव्हा मुलांना सत्य सांगितले. या जोडप्याचे विचार फार वेगळे आहेत. त्यांचे म्हणणे आहे की मुलांनी बढाई मारू नये, त्यांची पावले जमिनीवरच रहावीत. जे काही आहे त्याची जबाबदारी व्यवस्थित स्वीकारतील. पुढे मोठे होऊनही ते पैसे चुकीच्या ठिकाणी न उडवता त्याचा उपयोग योग्य प्रकारे करतील. गर्व करून पैसे वाया घालवणे त्यांना पटत नाही.

लॉटरी मिळाली म्हणून हुरळून न जाता त्या पैशांचा विचारपूर्वक विनियोग करणारे लोक फार कमी असतात. गाजावाजा न करता स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांचा विचार करणे हे नक्कीच सोपे नाही. या दानशूर जोडप्याने एक आदर्श घालून दिला आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required