computer

केल्व्हीन क्ले, प्राडा, जिमी शू.. अशा या १३ या ब्रँडमागील खरे चेहरे कधी पाहिलेत? पाहाच इथे मग..(भाग -१)

फॅशन दुनियेतील अनेक ब्रँडसच्या मोहात बरेचजण असतात. या ब्रँडस मागील डोक्यालीटी कुणाची असेल असा प्रश्नही आपल्याला पडतो. केल्विन क्ले, प्राडा, गुच्ची यांसारखे ब्रँड कितीही फेमस असले तरी या ब्रँडमागील चेहरा अनेकांना अनोळखी आहे. बरं, या यादीत फक्त केल्व्हीन क्ले आणि प्राडाच नाही, तर इतरही अनेक आहेत. आज आपण याच जगप्रसिद्ध ब्रँड्सला आकार देणाऱ्या डिझायनर्सची ओळख करून घेणार आहोत. सुरुवात केल्व्हीन क्लेपासूनच करूया

१) केल्व्हीन क्ले

केल्व्हीनला तारुण्यात पदार्पण केल्यावरच फॅशन डिझायनिंग बद्दल प्रेम निर्माण झाले. सुरुवातीला त्यांनी इतर छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले. पण आता स्वतःचे काहीतरी करायला हवे, या विचाराने त्यांनी आपला एक मित्र Barry Schwartz यांना सोबत घेत केल्व्हीन क्ले याच नावाने न्यूयॉर्कला स्वतःचे स्वतंत्र काम सुरु केले. सुरुवातीला पुरुषी पोशाखांसाठी ओळखला जाणारा हा ब्रँड खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला तो महिलांचा पोशाख डिझाईन करायला सुरुवात केल्यावर. आज ७९ वर्षांचे केल्व्हीन क्ले यांच्याबद्दल जरी लोकांना विशेष माहिती नसली तरी त्यांच्या ब्रँडचे अंडरगारमेंट्स्, परफ्युम, बॅग्ज आणि सगळंच काही प्रसिद्ध आहे..

२) ख्रिस्चीयन लाक्रोईक्स

२२ वर्षांच्या वयात ख्रिस्चीयन खरेतर पॅरिस येथे इतिहास हा विषय शिकण्यासाठी आले होते. पण त्यांना एका टप्प्यावर कळून चुकले की आपले खरे प्रेम हे फॅशन डिझायनिंग आहे. २४ व्या वर्षी त्यांनी स्वतःची फॅशन डिझायनिंग कंपनी सुरू केली. आज ख्रिस्चीयन ७० वर्षांचे आहेत आणि त्यांचा ब्रँड जगात नावाजलेला आहे.

३) ख्रिस्चीयन लाऊबोटीन

ख्रिस्चीयन सुरुवातीला महिलांसाठी शूज डिझाईन करण्याचे काम करत. पुढे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कधी काळी प्रचंड प्रसिद्ध झालेले लाल तळ असलेले उंच टाचांचे शूज जगात फॅशन ट्रेंड ठरले होते. त्यांनी अनेक हॉलीवूड स्टार्स आणि अनेक राजघराण्यातील महिलांसाठी शूज तयार केले आहेत.

४) जिमी शू

जिमी शू आज ७३ वर्षांचे आहेत. पण या वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी शूजचा पहिला जोड तयार केला. लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करून मग त्यांनी एका डिझाईन कंपनीत काम सुरू केले होते. तिथे पुरेसा अनुभव गोळा झाल्यावर त्यांनी स्वतःचे फॅशन स्टोअर उघडले. लंडन फॅशन वीकमध्ये त्यांचे काम जगभर नावाजले गेले. पुढे त्यांची घोडदौड सुरू झाली ती आजही थांबलेली नाही.

५) ल्यूसीयानो बेनेटन

ल्यूसीयानो यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले. म्हणून त्यांना घर चालवण्यासाठी कपड्यांच्या दुकानात कामास सुरुवात करावी लागली. पुढे त्यांनी पुरेसे पैसे गाठीशी जमा केले आणि स्वतःचे वायब्रंट स्वेटर तयार केले. जे चांगलेच गाजले. त्यांनी मग आपल्या भावंडांना सोबत घेत बेनेटन ग्रुपची सुरुवात केली.

६) मानोलो ब्लाहनिक

वोग हे जगप्रसिद्ध मॅग्झिन आहे. या मॅग्झिनमध्ये फुटवेअर संबंधित लेखन करत असताना मानोलो यांना आपण स्वतःचे फॅशन स्टोअर सुरू करायला हवे असे वाटले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. ज्या वोगसाठी ते लिहित होते त्याच वोगच्या कव्हर फोटोवर झळकण्याची त्यांनी कामगिरी केली. इतिहासातील वोगच्या कव्हरवर झळकणारे दुसरे व्यक्ती म्हणून त्यांनी विक्रम केला

सबस्क्राईब करा

* indicates required