भेटा या दोन शेरपांना, ज्यांनी विश्वविक्रम रचलाय सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा

वरून कोसळणारा बर्फ, रक्त गोठवणारी थंडी, विरळ होत जाणारं अॉक्सिजनचं प्रमाण, झोंबणारा जोराचा वारा, आणि मती गुंग करणारी भयानक उंची... अशा एक ना अनेक धोक्यांशी मैत्री करत कामी रिता शेरपा नावाच्या ४८ वर्षीय नेपाळी गिर्यारोहकानं आपल्या नावावर विश्वविक्रम नोंदवलाय तो तब्बल २२ वेळा माऊंट एव्हरेस्ट चढून जाण्याचा! बुधवारी हे ८८४५ मीटर उंचीचं शिखर त्यानं १३ जणांच्या टिम सोबत दक्षिण-पुर्वेच्या रिज रूट मार्गानं सर केलं. हा तोच रिज रूट आहे जिथून १९५३ मध्ये तेनसिंग नोर्गे आणि सर एडमंड हिलरी यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला होता. मंडळी, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कठीण परिस्थितीवर मात करत माणूस यशाची सर्वोच्च शिखरं पादाक्रांत करू शकतो, याचं हे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण...

स्त्रोत

याआधी सर्वाधिक २१ वेळा एव्हरेस्ट चढून जाण्याचा विश्वविक्रमही कामी शेरपाच्याच नावावर आहे जो त्याने आपले दोन साथीदार फुरबा ताशी शेरपा आणि अप्पा शेरपा यांच्यासोबत बनवला होता. नेपाळमधल्या थामी गावात राहणारा हा कामी रिता शेरपा अत्यंत अनुभवी गिर्यारोहक म्हणून ओळखला जातो. ८००० मीटर पेक्षा जास्त उंची असणार्‍या अनेक पर्वतशिखरांवर कामी शेरपाने चढाई केलीये. १९९४ मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट सर करणार्‍या कामी शेरपाचं ध्येय आणखी ३ वेळा एव्हरेस्ट चढून हा आकडा २५ पर्यंत नेण्याचं आहे. कामी शेरपाच्या कुटूंबासाठी पर्वतारोहन ही एक परंपरा बनली आहे.

दुसरीकडे याच दिवशी सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करणारी महिला गिर्यारोहक बनण्याचा मान मिळवला तो ल्हाक्पा शेरपा या ४४ वर्षीय महिलेने. बुधवारच्या दिवशीच चिनकडील बाजूने एव्हरेस्ट सर करत या पराक्रमी महिलेनेही सर्वाधिक ९ वेळा एव्हरेस्ट चढण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. अमेरीकेत राहणारी ल्हाक्पा शेरपा तीन मुलांची आई आहे.

स्त्रोत

दोघांच्याही वयाचा विचार करता त्यांची ही कामगीरी अत्यंत महत्वपूर्ण ठरते. सर्वांनाच स्फुर्ती देणार्‍या त्यांच्या या जिद्दी यशाला बोभाटा परिवाराकडून सलाम...

सबस्क्राईब करा

* indicates required