धुळ्याचा राहिल शेख : तब्बल ६ विश्वविक्रम रचणारा मराठी तरुण..

विश्वविक्रम... शब्द बोलायला सोपा असला तरी तो तितकाच भव्य आहे. विक्रम काय सगळ्यांच्याच हातून घडत नसतो, आणि घडला तरी तो विश्वविक्रम नसतो. पण मंडळी, धुळ्याच्या राहिल शेख या मराठमोळ्या तरूणानं कॉप्म्प्यूटर टेक्नॉलॉजी अॅन्ड इनोव्हेशन या क्षेत्रात एक दोन नव्हे तर तब्बल ६ विश्वविक्रम रचलेत! आणि हे सारे विश्वविक्रम थोडे हटके आणि फक्त माऊसचा वापर करून करण्यात आलेत.

१. जलदगतीने फोल्डर तयार करणे

राहिलचा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड आहे कॉप्म्प्यूटर डेस्कटॉपवर १ तासात २४५३ फोल्डर्स तयार करण्याचा. हा विक्रम जगात पहिल्यांदाच रचला गेलाय.

२. सर्वात लांबलचक इमेल आयडी

आपल्या इमेल आयडीमध्ये असून असून किती अक्षरं असतात? फारतर १५-२०! पण राहिलनं चक्क १०० अक्षरांचा इमेल आयडी बनवलाय. त्यामुळे सर्वाधिक अक्षरांचा इमेल आयडी बनवण्याचा विश्वविक्रम राहिलच्या नावावर आहे.

३. सर्वात लहान इमेल आयडी

सर्वात लांबलचक इमेल आयडीसोबतच जगातील सर्वात लहान इमेल आयडीसुध्दा राहिलनंच बनवलाय. या आयडीमध्ये डोमेन धरून फक्त ८ अक्षरं आहेत.

४. कॉम्प्युटर रिफ्रेश

राहिल शेखनं ३० सेकंदात ५८ वेळा कॉप्म्प्यूटर रिफ्रेश करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. याआधी श्रीनिवास नावाच्या व्यक्तीने ३० सेकंदात ३४ वेळा कॉप्म्प्यूटर रिफ्रेश केला होता.

५. विन्डोज बंद करण्याचा विक्रम

२० सेकंदात ३९ मायक्रोसॉफ्ट विन्डोज क्लोज करून राहिलनं कमी वेळेत सर्वाधिक विन्डोज क्लोज करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

६. विन्डोज उघडण्याचा विक्रम

एकाच वेळी सर्वाधिक ६० मायक्रोसॉफ्ट विन्डोज उघडण्याचा विश्वविक्रमही राहिलनंच केला आहे.

राहिलच्या या सर्व विक्रमांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, वंडर बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्ड (युनायटेड किंगडम्स), रेकॉर्ड सेटर (न्यूयॉर्क), गोल्डन बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्ड (अमेरिका), युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड, इंडिया स्टार बुक अॉफ रेकॉर्ड, अशा अनेक संस्थाकडून मान्यता मिळालीय. विविध देशांतल्या संस्थांकडून त्याला १७ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे २०१६-१७ च्या पद्मश्री पुरस्कारासाठी राहिलच्या नावाची शिफारस झाली होती. 

"आपल्यात काही वेगळं करण्याची आवड असेल तर आपण प्रत्येक क्षेत्रात विश्वविक्रम करू शकतो." असं राहिल सांगतो. या क्षेत्रात आणखी भरीव कार्य करण्याची राहिलची इच्छा आहे. 

बघायला गेलं तर हे सगळे विक्रम खूपच साधेसोपे वाटतात. पण राहिलचा लहानात लहान कृतीतून काहीतरी वेगळं आणि ठळक करण्याचा दृष्टीकोन त्याला इतरांपासून वेगळं बनवतो.

राहिलच्या या आगळ्यावेगळ्या विश्वविक्रमांना बोभाटा कडून हार्दिक शुभेच्छा !!

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required