computer

चक्क सोन्याची बिर्याणी? जगातल्या सर्वात महागड्या बिर्याणीबद्दल ऐकलं का?

तुम्ही जर बिर्याणीचे शौकीन असाल तर तुम्हाला लखनऊ, कलकत्ता, हैद्राबाद अशा भारतातल्या प्रसिद्ध ठिकाणच्या बिर्याणी माहित असतील, पण तुम्ही कितीही बिर्याणी प्रेमी असलात तरी सोन्याची बिर्याणी ऐकली/पाहिली नसेल. नुकतीच दुबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटने सोन्याची बिर्याणी लॉन्च केली आहे. काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊ या.

DIFC मधील बॉम्बे बॉरो रेस्टॉरंटने ही जगातील सर्वात महागडी बिर्याणी तयार केली आहे. विशेष म्हणजे या शाही बिर्याणीची किंमत तब्बल २० हजार रुपये म्हणजे १००० दिनार आहे. या शाही बिर्याणीचे नाव रॉयल गोल्ड बिर्याणी असून याचे वजन तीन किलो आहे. त्यामुळे अनेक दर्दी खवय्ये या सोन्याच्या बिर्याणीला एकदा तरी खाण्याचा नक्कीच विचार करतील. अर्थात त्यासाठी दुबईला जावे लागेल.

या खास आणि अत्यंत महाग अशा रॉयल गोल्ड बिर्याणी सोन्याच्या ताटात वाढली जाते. त्यावर केसर टाकलेले असते. सोबत कश्मीरी मटन कबाब, दिल्ली मटन, चॉप्स राजपूत, चिकन कबाब, मोगलाई कोफ्ते आणि मलाई चिकन दिले जात आहे. यासोबत अनेक चटण्या आणि सॉसही तुम्ही निवडू शकता. चटण्या आणि सॉसमध्ये निहारी सालन, बदामी सॉस, बदाम आणि डाळिंबाचा रायता तसेच जोधपुरी सालन असते. जेव्हा ही बिर्याणी सजवली जाते तेव्हा या बिर्याणीवर २३ कॅरेट सोन्याचा वर्ख लावला जातो. हा सोन्याचा वर्ख तुम्ही खाऊ शकता. खास सोन्याचे हँड ग्लोव्हज घालून बिर्याणी सर्व्ह केली जाते.

हे बिर्याणीचं ताट सजवायला कमीत कमी ४५ मिनिटे जातात.  त्यामुळे ज्यांना जगातली सर्वात महागडी बिर्याणी खायची आहे त्यांना दुबई गाठावे लागेल. शिवाय सोन्याच्या  बिर्याणीचा आनंद घेण्यासाठी वीस हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेले एका कोलंबियन रेस्टॉरंटचे सोन्याचे बर्गर खूप गाजले होते. आता ही सोन्याची बिर्याणी आलीये. सध्यातरी तिचे फोटो पाहून पोट भरता येईल. तुम्हाला काय वाटतंय, तुमचे बिर्याणीचे आवडीचं रेस्टॉरंट कुठले? नक्की शेयर करा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required