computer

भेटा जगातल्या सर्वात कफल्लक माणसाला...कोण आहे तो आणि त्याच्या नावावर हा विश्वविक्रम का आहे ?

जगातल्या एक नंबर श्रीमंत माणसांच्या स्टोर्‍या तुम्ही बर्‍याच वाचल्या असतील.  पण  आज आम्ही तुम्हाला जगातल्या एक नंबर कफल्लक माणसाची स्टोरी सांगणार आहोत!! आता कफल्ल्क म्हणजे दिवाळं निघालेला, ज्याचा बाजार उठला आहे,  सर्वस्व घालवून बसलेला, असा गरीबात गरीब असा माणूस! पण किती गरीब म्हणजे गरीबातला गरीब हे एक कोडंच आहे नाही का? म्हणून शोधाशोध केल्यावर असं कळलं की ज्याच्या हातात काहीच शिल्ल्क नाही आणि डोक्यावर या जन्मात फिटणार नाही असे कर्ज असणारा माणूस म्हणजे खरा एक नंबर कफल्ल्क! तर मंडळी, वाचा जगातल्या एक नंबर कफल्लक माणसाची स्टोरी! 

या माणसाचं नाव आहे जेरोम कर्वीएल. आपल्यासारखाच सर्वसामान्य -मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला हा मुलगा, थोडंफार शिकला आणि चारचौघांसारखा बँकेत नोकरीला लागला. वार्षिक साठ हजार डॉलरचा पगार आणि बोनस घेणारा माणूस कसा वाहावत गेला आणि दुर्दैवाच्या फेर्‍यात कसा सापडला, सरतेशेवटी फुटकी कवडीही न कमावता एक नंबरचा कफल्ल्क कसा झाला त्याची ही गोष्ट !

फ्रान्समधील सोसीएते-जेनेरल(Société Générale) ही एक मोठी बँक आहे. संपूर्ण युरोपात आणि अमेरिकेत या बँकेचे जाळे पसरलेले आहे. सॉसजेन या नावानेही ही बँक प्रसिध्द  आहे. तर मंडळी, जेरोम कर्वीएल सॉसजेन बँकेच्या 'डेरीव्हेटीव आणि आर्बीट्रेज' खात्यात ट्रेडर म्हणून कामाला लागला होता.

आता पुढे काही सांगण्यापूर्वी आर्बीट्रेज आणि डेरीव्हेटीव म्हणजे काय ते आधी समजून घेऊ या.  डेरीव्हेटीव, एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा भाव अंतर्भूत असलेला करार. हा करार म्हणजे शेअर  घेणे किंवा विकणे असा होत नाही, तर अंतर्भूत असलेल्या शेअरचा भाव जसा वर खाली जाईल तसा करार करणार्‍याचा नफातोटा कमीजास्त होत राहतो. या कराराचे दोन प्रकार असतात.  पहिला प्रकार म्हणजे फ्युचर आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑप्शन!

उदाहरणार्थ तुम्हाला रिलायन्स कंपनीचे २०० शेअर्स घ्यायचे असतील, तर २०० शेअर्सची किंमत भरावी लागेल.  पण २०० शेअर्स फ्यूचर किंवा ऑप्शनचा करार घेतला तर एकूण २०० शेअर्सच्या किमतीपेक्षा अगदी छोटी रक्कम देऊन तुम्हाला करार विकत घेता येतो आणि नफा मिळवता येतो. पण मंडळी अशा प्रकारचे करार अत्यंत अस्थिर स्वरुपाचे असतात.

तेव्हा वाचकांनो, सावधान!! अशी सूचना देऊन आर्बीट्रेज म्हणजे काय ते समजून घेऊ या!! 

फ्यूचर किंवा ऑप्शन एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या शेअर बाजारात विकले किंवा खरेदी केले जातात. उदाहरणार्थ, आपल्याकडे बीएसइ आणि एनएसइ  या दोन वेगवेगळ्या बाजारात एकाच वेळी भावफरक असऊ शकतात. अशा वेळी भाव जास्त असेल तिथे विक्री आणि कमी असेल तिथे खरेदी हे दोन्ही सौदे एकाच वेळी करणे म्हणजे 'आर्बीट्रेज'. पुन्हा एकदा एक धोक्याची सूचना - डेरीव्हेटीव आणि आर्बीट्रेजचे सौदे म्हणजे हातात लक्ष्मी बाँब घेऊन पेटवण्यासारखे असातात, वेळीच हात झटकला नाही तर? तर, बाँब हातातच फुटतो.

तर अशा अस्थिर बाजारात ट्रेडर म्हणून जेरोम कर्वीएल काम करत होता. बँकेत अशा ट्रेडर्सना काही मर्यादा घालून दिलेल्या असतात. त्यामर्यादेपलीकडे जाऊन खरेदी विक्री करणे हे ट्रेडरच्या हातात नसते. ट्रेडरने केलेल्या सौद्यात जेवढा नफा जास्त होईल, त्या प्रमाणात पगाराव्यतिरिक्त बोनस दिला जातो. २००६ साली असे सौदे करणारे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम नव्हते, त्यामुळे ट्रेडर ज्या वेगाने सौदे करेल त्यावर नफा अवलंबून असायचा.

जेरोम कर्वीएल बरीच वर्षे या खात्यात काम करत असल्याने बँकेच्या प्रोग्रॅमच्या काही तृटी त्याच्या लक्षात आल्या होत्या. त्या तृटींचा फायदा घेऊन त्याने सुरुवातीला काही छोटे-छोटे सौदे करायला सुरुवात केली. हे सौदे अर्थातच 'चोरटे' सौदे होते. कारण या सौद्यांची ऑर्डर कुणीच दिली नव्हती. बाजारात अशा सौद्यांना 'रोग ट्रेड्स' असे म्हटले जाते. असे छुपे सौदे किती केले, तर कॉम्प्युटर दखल घेत नाही याची नेमकी अटकळ जेरोम कर्वीएलने बांधून ठेवली असल्यामुळे ते बँकेच्या अधिकार्‍यांच्या लक्षात यायचे नाहीत. याखेरीज एकतर्फी सौदे म्हणजे-फक्त खरेदी किंवा फक्त विक्री-केले, आणि एखाद्या काल्पनिक खात्यावर ते दाखवले तर मोठे सौदे पण कॉम्प्युटरच्या लक्षात येत नाहीत असाही शोध जेरोम कर्वीएलला लागला.

या तंत्राचा फायदा घेऊन त्यानी मोठमोठे सौदे लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला एखाद-दोन सौदे बँकेच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्याने माफी मागून सौदे रद्दपण केले. जेरोम कर्वीएल हा बँकींगच्या विश्वात इतका छोटा माणूस होता की त्याच्याकडे अधिकार्‍यांचे लक्षही जात नसे.  हा सगळा खटाटोप जेरोम कर्वीएल बोनसची रक्कम वाढत जावी यासाठीच करत होता.  कारण त्याने केलेल्या घपलेबाज सौद्याचा नफा बँकेकडेच जमा व्हायचा. पण एका चांगला ट्रेडर म्हणून त्याचे बँकेत नाव मात्र झाले होते. आणि या दरम्यानच एक मोठी समस्या जेरोम कर्वीएल समोर उभी राहीली!!

झाले काय, त्याने केलेले 'रोग ट्रेड्स' जबरदस्त नफ्यात गेले आणि बँकेच्या खात्यात २० कोटी युरोंची भर पडली. इतका मोठा नफा ट्रेझरीत जमा झाल्यावर बँकेचे ऑडीटर्स चौकशी करतील आणि आपले बिंग उघडकीस येईल या भीतीने जेरोम कर्वीएल घाबरला आणि त्यानी उलटे सौदे म्हणजे ज्यातून नुकसान होईल असे सौदे करायला सुरुवात केली. कॉम्प्युटरच्या Risk surveillance system मध्ये त्याची नोंद होऊन घोळ उघडकीस येण्याआधीच निस्तरला जाईल असा त्याचा अंदाज होता. या सर्व घटना जानेवारी २००७/८ च्या दरम्यान घडत असताना बँकेला काही पत्ता लागला नव्हता. या दरम्यान अमेरिकेत 'सब प्राईम ' घोटाळा उघडकीस आला. अमेरिका आणि युरोपचे शेअर बाजार जीव मुठीत धरून आल्या दिवसाला सामोरे जात होते. बाजार मंदीकडे झुकत असताना जेरोम कर्वीएल तेजीचे सौदे करत होता.

शेवटी जे व्हायचं ते झालंच ! बँकेच्या एका अधिकार्‍याच्या, कंप्लायन्स ऑफीसरच्या- नजरेस एक प्रचंड मोठा सौदा आला. हा सौदा जेरोम कर्वीएलचा 'रोग ट्रेड' होता, जो त्याने भलत्याच एका ब्रोकरच्या नावावर टाकला होता. कंप्लायन्स ऑफीसरने ब्रोकरकडे चौकशी केल्यावर त्यांने कानावर हात ठेवले. इथे जेरोम कर्वीएलने केलेला लोचा पहिल्यांदा उघडकीस आला. ही घटना १८ जानेवारी २००८ ची!  कंप्लायन्स ऑफीसरने थेट ब्रोकरकडे चौकशी केल्यामुळे घोटाळा उघडकीस आला खरा, पण बँकेत काहीतरी घोटाळा झाला आहे याची बातमी पण बाजारात पसरली. थोड्याच वेळात सोसजेनचे शेअर गडगडले. जेरोम कर्वीएलने एकूण ७३०कोटी डॉलर्सचे खोटे सौदे तोपर्यंत केलेले होते.

मार्केट या बातमीने धडाधड पडायला सुरुवात झाली. अशा वेळी घाबरलेली मॅनेजमेंट जे करते तीच चूक बँकेने केली. ताबडतोब जेरोम कर्वीएलला कामावरून हाकलून दिले. त्यामुळे नक्की किती सौदे खोटे आहेत याचा पत्ता बँकेला शेवटपर्यंत लागला नाही. पण जे ७३०कोटी डॉलर्सचे खोटे सौदे समोर दिसत होते ते कसे निपटायचे यावर चर्चा सुरु झाल्या. बर्‍याच चर्चेनंतर हे सर्व उलटे सौदे तीन दिवसाच्या आत सुलटे करून सारवासारव संपली, तोपर्यंत एकूण ७२ कोटी डॉलर्स म्हणजे आजच्या तारखेस ५००० कोटी रुपयांची राख झाली होती.

सोसीएत जेनेरलची लाज वेशीवर टांगली गेल्यावर  कायदेशीर कारवाया सुरु झाल्या. जेरोम कर्वीएलच्या घरावर धाड टाकण्यात आली. त्याचा कॉम्प्युटर जप्त करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. त्यानंतरच्या चौकशीत बँकेच्या मूर्खपणाचेच किस्से बाहेर पडले. अब्जावधी  डॉलर्सचा व्यवहार करणार्‍या बँकांची 'सिक्युररिटी' एक छोटा ट्रेडर कसा हवा तसा वळवू शकतो हे जनतेच्या आणि सोसजेनच्या शेअर होल्डरच्या नजरेस आले. 

जेव्हा कोर्टासमोर खटला सुरु झाला तेव्हा हे पण स्पष्ट झाले की बर्‍याच अधिकार्‍यांनी हे रोग ट्रेड्स बघितले होते, पण बँकेचा फायदा होतो आहे या एका विचाराने त्यांनी दुर्लक्ष केले. हे सौदे करण्यात जेरोम कर्वीएलचा वैयक्तिक फाय्दा फारच किंचित स्वरुपाचा होता, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा - त्यापैकी दोन वर्षांची स्थगित शिक्षा आणि बँकेचे संपूर्ण नुकसान भरून देण्याची शिक्षा -अशा शिक्षा ठोठावल्या.

बर्‍याच अपिलांनंतर फक्त पाच महिन्यांची शिक्षा भोगून जेरोम कर्वीएल तुरुंगाबाहेर पडला.  पण तो आता खर्‍या अर्थाने कफल्लक होता. कारण त्याचे सर्वस्व नाहीसे झाले होते आणि डोक्यावर जन्मात कधीच फिटणार नाही असे बॅकेचे कर्ज होते.

जेव्हा जेव्हा तुम्ही जगातला सर्वात गरीब असा सर्च कराल तर उत्तर येते .........जेरोम कर्वीएल  !!!