computer

मिनिटाला ५० लाख, एका तासात २८ कोटी आणि एका दिवसात ७११ कोटी...कोण छापतोय एवढा पैसा ??

एका मिनिटात ७०,००० डॉलर्स (५० लाख), एका तासात ४ मिलियन (२८ कोटी) आणि एका दिवसात १०० मिलियन म्हणजे ७११ कोटी रुपये. ही काय नोटा छापण्याची मशीन आहे काय ? असाच प्रश्न पडला ना?

मंडळी, हे आकडे वॉलमार्ट कंपनीचे मालक असलेल्या वॉल्टन कुटुंबाची रोजची कमाई दाखवत आहेत. रोज या गतीने वॉल्टन कुटुंबाच्या संपत्तीत वाढ होत असते. आज वॉलमार्ट जगातल्या २७ देशांमध्ये पोहोचलेलं आहे. जगभरात वॉलमार्टची तब्बल ११,३६८ दुकाने आणि क्लब्स आहेत. एवढंच काय आपल्याकडच्या फ्लिपकार्टच्या व्यवसायातला ७० टक्के वाटा विकत घेऊन वॉलमार्ट भारतातल्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये पण उतरलं आहे.

वॉलमार्टच्या व्यवसायातून येणारा पैसा वॉल्टन कुटुंबाला एवढी संपत्ती मिळवून देतो. पण वॉलमार्टमध्ये काम करणाऱ्यांच्या संपत्तीचं काय? ब्लूमबर्ग वेबसाईटच्या अहवालानुसार वॉलमार्टमध्ये काम करणाऱ्या अगदी खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यालासुद्धा  दर तासाला ११ डॉलर्स (७८४ रुपये) मिळतात.

वॉल्टन कुटुंबाच्या संपत्तीत मागच्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. जून २०१८ साली जगातल्या सर्वाधिक श्रीमंत कुटुंबाच्या यादीत या कुटुंबाचं नाव टॉपला होतं. त्यांची एकूण संपत्ती ३९ बिलियन डॉलर्सवरून १९१ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढली आहे. हे आकडे भारतीय चलनाप्रमाणे किती होतात ते तुम्हीच शोधा.

मंडळी, संपत्ती जमवण्याच्या रेसमध्ये अमेरिकेतील इतर श्रीमंत कुटुंबं पण आहेत. अमेरिकेतील मार्स कंपनी चालवणाऱ्या मार्स कुटुंबीयांनी आपल्या संपत्तीत ३७ बिलियन डॉलर्स एवढी वाढ करून एकूण संपत्ती १२७ बिलियन डॉलर्स एवढी वाढवली आहे. ‘दि कॉचस’ नावाने ओळखले जाणारे व्यावसायिक आणि राजकारणी कुटुंबाची सध्याची संपत्ती ही १२५ बिलियन डॉलर्स इतकी आहे.

हे वाढणारे आकडे डोळे दिपवणारे असले तरी गरीब श्रीमंतातला फरक वाढवणारे आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की भांडवलशाहीला सध्या आहे त्यापेक्षा योग्य व्यवस्थेची गरज आहे. असं आम्ही नाही तर हा अहवाल सादर करणारे ब्लूमबर्ग वेबसाईटचं म्हणणं आहे.

सध्यातरी या कुटुंबाकडे अतिप्रचंड प्रमाणात पैसा आहे. आणि आता हे फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात येत आहेत . आपल्या सर्वांची खरेदीची भूक त्यांना आणखी कितीतरी पटीने श्रीमंत बनवणार आहे यात काही शंकाच नाही..

सबस्क्राईब करा

* indicates required