computer

तब्बल ५१ वर्षांनी अमेरिकेला हादरवून सोडणाऱ्या झोडियाक किलरच्या सांकेतिक पत्राचं कोडं सोडवण्यात यश आलंय !!

१९६० ते १९७० च्या दरम्यान अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामध्ये एका मारेकऱ्याने पोलिसांची अक्षरशः झोप उडवून टाकली होती. पाच निष्पाप लोकांचा त्याने क्रूरपणे बळी घेतला होता. फक्त दोन लोक त्याच्या तावडीतून वाचले होते. खुद्द मारेकऱ्याने पोलिसांना पत्र लिहून कळवले होते की त्याने ३८ लोकांचा बळी घेतला आहे.

हा मारेकरी वरचेवर सॅनफ्रॅन्सिस्को मधील वृत्तवाहिन्यांकडे पत्र पाठवायचा. ह्या पत्रांमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे देखील बनवून पाठवायचा. म्हणून त्याला झोडियाक किलर हे नाव मिळालं. त्याने पाठवलेली पत्रे सांकेतिक भाषेत असल्याकारणाने हे कोडे सोडवणे खूपच कठीण काम होते.

त्याने पाठवलेलं पहिला कोडं सहज सोडवता आला होता. पण दुसरं आणि सर्वात मोठं कोडं सोडवण्यासाठी २०२० साल उजाडावं लागलं. तब्बल ५१ वर्षांनी हे कोडं सोडवण्यात आलं आहे. 

तर कोणी सोडवलं हे कोडं ?

सॅनफ्रान्सिस्को क्रॉनिकलचे पत्रकार केविन फगान हे मागची २५ वर्ष ह्या केसवर काम करत होते. त्यांनीच डिसेंबर २०२० मध्ये ही बातमी आपल्या वृत्तपत्रातून सर्वांना दिली आहे. व्हर्जिनियामध्ये राहणाऱ्या डेव्हिड ओरन्चक ह्यांनी हे कोडं सोडविला आहे. हे गृहस्थ मागची १४ वर्षे हे कोडं सोडवण्याच्या प्रयत्नात होते.

हा सिफर कोड म्हणजे गूढ सांकेतिक भाषेतील पत्र १९६९ साली सॅन फ्रान्सिस्को क्रोनिकल ह्या वृत्तपत्राच्या कार्यालयात झोडियाक किलरने पाठविला होता.

त्याला पकडण्यासाठी म्हणून असे अजून चार सांकेतिक कोडी त्याने पोलिसांना पत्राद्वारे पाठवून दिले होते. त्यापैकी एकच कोडं पोलिसांना आजवर सोडवता आला होता. म्हणूनच शेवटपर्यंत काही पोलिसांना त्या क्रूर खुनी माणसाला पकडण्यात यश मिळाले न्हवते. २००४ ला ह्या घटनेचा तपास बंद करण्यात आला होता. त्यांनतर पुढे २००७ रोजी पुन्हा ही केस उघडली गेली होती.

तर, ओरानकॅकने ह्या कोडयासंदर्भांत यूट्यूब व्हिडिओज बनवले होते. ह्याचाच परीणाम असा झाला की इतर लोक ह्या गोष्टीकडे आकर्षित होत गेले. ते इतके मोठे काम एकट्या दुकट्याने करणे अजिबात शक्य नव्हते. एकीचे बळ हे नेहमीच वरचढ ठरते. ऑस्ट्रेलियातील गणिततज्ञ सॅम ब्लेक यांनी हा कोड सोडवण्यासाठी ६,५०,००० संभाव्य मार्ग शोधून काढले आणि बेल्जियममधील जर्ल व्हॅन एस्क यांनी ब्रेकिंग सॉफ्टवेअर बनवले.

ह्या तिघांनी २०२० च्या मार्च पासून ह्यावर काम करण्यास सुरुवात केली होती. खूप प्रयत्न आणि अभ्यासानंतर त्यांना खुन्याने पाठवलेल्या कोडचा पॅटर्न लक्षात आला. त्यांना हे देखील कळून चुकले की खुन्याने एका ओळीसाठी बाकीच्या पॅटर्नपेक्षा थोडा वेगळा पॅटर्न वापरला होता. म्हणूनच इतकी वर्षे हे कोडं सोडवण्यात अपयश येत होते.

तर काय आहे नेमका हा मेसेज ?

"I HOPE YOU ARE HAVING LOTS OF FUN IN TRYING TO CATCH ME THAT WASNT ME ON THE TV SHOW WHICH BRINGS UP A POINT ABOUT ME I AM NOT AFRAID OF THE GAS CHAMBER BECAUSE IT WILL SEND ME TO PARADICE ALL THE SOONER BECAUSE I NOW HAVE ENOUGH SLAVES TO WORK FOR ME WHERE EVERYONE ELSE HAS NOTHING WHEN THEY REACH PARADICE SO THEY ARE AFRAID OF DEATH I AM NOT AFRAID BECAUSE I KNOW THAT MY NEW LIFE IS LIFE WILL BE AN EASY ONE IN PARADICE DEATH”

मराठीत थोडक्यात सांगायचं झालं तर, हा मजकूर पुढील प्रमाणे असेल.

“मला वाटतंय की तुम्हा लोकांना मला पकडण्यात खुप मजा येत असावी. मला कोणत्याही गॅस चेंबर ची भीती नाहीये कारण लवकरच मी स्वर्गात असेन. आता त्या स्वर्गातदेखील माझ्यासाठी काम करणारे गुलाम तयार आहेत. पण तुमच्यापैकी कोणाकडेही तुमच्यासाठी काम करणारे गुलाम नाहीयेत. मला मरणाची भीती अजिबात नाहीये. कारण मला माहितेय की माझं नवीन आयुष्य स्वर्गात खूप सोपं असेल.”

FBI कडूनही ह्या संदर्भात माहिती मिळाली आहे, पण केसची पुढील कारवाई पूर्ण होण्याआधी इतर कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

तर, कोडं सोडवण्यात यश आलेलं आहे पण तो खुनी पकडला जाईल का आणि मुळात तो अजून जिवंत असेल का, काय झालं असावं त्याचं? ही उत्तरं मिळतील की नाही हे आता भविष्याच ठरवेल.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required