computer

सिलिकॉन व्हॅली सोडून तमिळनाडूच्या गावात शिकवायला आलेल्या उद्योजकाला पद्मश्री जाहीर झालाय...कोण आहेत हे उद्योजक?

काही दिवसांपूर्वी १८ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असूनही एका खेड्यात राहून मुलांची शिकवणी घेणाऱ्या तामिळनाडूतल्या उद्योजकाची गोष्ट वायरल झाली होती. श्रीधर वेम्बू हे त्यांचे नाव!

झोहो कॉर्पोरेशन या आयटी कंपनीचे ते संस्थापक आहेत. तामिळनाडूच्या एका खेड्यातून शिकून त्यांनी सिलिकॉन व्हॅलीत आयटी कंपनी थाटली. एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक असूनदेखील ते लॉकडाऊनमध्ये तमिळनाडू येथील लहान मुलांना शिकविताना दिसत होते. ज्यामुळे त्यांची चर्चा देशभर झाली. आता या श्रीधर वेम्बू यांचा गौरव भारत सरकारने देखील केला आहे. त्यांना पद्मश्री हा देशातल्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक समजला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. सरकारी शाळेत शिकून मोठ्या झालेल्या उद्योजकाचा हा सन्मान निश्चितच इतरांना देखील प्रेरणा देणारा आहे. 

श्रीधर वेम्बू हे एका साधारण कुटुंबात वाढले. त्यांनी प्रचंड अभ्यास आणि मेहनत करून आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळवला. पुढे ते अमेरिकेत नोकरी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी एडव्हेंट नेट ही कंपनी स्थापन केली. या कंपनीला यश मिळाल्यावर इथेच न थांबता त्यांनी काहीतरी वेगळे करायचे ठरवले. 

२००९ साली एडव्हेंट नेटचे रूपांतर झोहो आयटी कॉर्पोरेशनमध्ये करत त्यांनी हळूहळू या कंपनीची किंमत १८ हजार कोटी एवढी वाढवली. आता त्यांचं स्वप्न आहे की तरुणांनी देशात तंत्रज्ञानावर आधारित उद्योग निर्माण करावेत. यासाठी ते त्याच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहेत.

नेहमी दिल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा मुलांना वेगळे मूलभूत शिक्षण मिळावे असा त्यांचा मानस आहे. भारतात ते एज्युकेशन स्टार्टअप सुरू करू पाहत आहेत. कुठल्याही शैक्षणिक बोर्डशी निगडित न होता, आधुनिक शिक्षण विनामूल्य मुलांना दिले जावे यासाठी ते सगळी प्लॅनिंग करत आहेत. 

श्रीधर वेम्बू यांच्यासारखे आधी स्वतः यशस्वी होऊन तिथेच न थांबता सर्वसामान्य घरातील मुलांना देखील मोठे होण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करणारे उद्योजकांचा सन्मान होणे हे खऱ्या अर्थाने इतरांना देखील प्रोत्साहन देणारे ठरू शकेल.
 

सबस्क्राईब करा

* indicates required