अति असंस्कारी(?) सिनेमा : लिपस्टिक अंडर माय बुरखा!!!
गेल्या वर्षी उडता पंजाबला भलीमोठी कात्री लावण्याचं प्रकरण चांगलचं पेटलं होतं. पंजाबमधल्या ड्रग्सचं वास्तव दाखवताना पंजाबची बदनामी होत असल्याचा दावा माननीय सेन्सोर बोर्डनं केला होता. त्याच्यातूनच मोठं वादळ उठलं आणि शेवटी एकही कट न लावता सिनेमा रिलीज झाला.
आता यावर्षी आणखी एक सिनेमा प्रचंड वादात अडकलाय, तो म्हणजे अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’. आता या सिनेमाचा विषयच असा आहे की संस्कारी फिल्म तरी कशी बनवणार? चित्रपट एका विशिष्ट गटाबद्दल भाष्य करणारा असल्यानं सेन्सोर बोर्डने सर्टिफिकेट देण्याचं नाकारलं होतं. त्याचबरोबर यातले सीन किंवा पूर्ण सिनेमा म्हणा हा बोल्ड आहे. काही शिव्या यात ऐकायला मिळतील ज्या सेन्सोर बोर्डच्या मते सामान्य नागरिकांनी ऐकू नयेत, नको ती दृश्यं आहेत जी ‘संस्काराच्या’ पातळीवर असभ्य वाटू शकतात. यात ट्रिपल तलाक या पद्धतीवरही बोट ठेवण्यात आलंय.
स्त्रियांच्या अभिव्यक्तीवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर फिल्म बेतलेली आहे. कोणताही आव न आणता सिनेमा साकारलाय आणि आता याला निहलानी यांनी आक्षेपार्ह म्हटलंय. २६ ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होणार होता, पण सेन्सॉर बोर्डने चित्रपटावर बंदी आणल्यानंतर चित्रपट सृष्टीतून याला मोठा विरोध झाला. शेवटी २१ जुलै रोजी सिनेमा रिलीज होतोय.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या सिनेमानं पुरस्कार पटकावले आहेत. तरीही भारतात या सिनेमावर बंदी आणणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. सिनेमात तेच दिसतं जे समाजात असतं मग आपण तरीही चांगुलपणाचा बुरखा घालून का राहतो? आपल्याला ते नागडं सत्य बघण्याची लाज का वाटावी? सेन्सॉर बोर्ड आणि तत्सम संस्कृती रक्षक हे लोकांनी काय बघावं ते कसं ठरवू शकतात? या सर्व थोतांडाला उत्तर म्हणूनच की काय या सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. चित्रपटाला अश्लील म्हणणाऱ्यांसाठी ही मोठीच चपराक आहे.
स्रोत
नवीन ट्रेलर नुकताच रिलीज झालाय आणि तो नको तेवढा असंस्कृत आहे. आता तुम्हीच बघा हा ट्रेलर !!!




