लेडी सचिन तेंडूलकर : वाचा कोण आहे स्मृती मानधना!!!
राव आपण वीमन्स क्रिकेट मॅच कधी बघत नाही.. मग ‘वीमन्स वर्ल्ड कप’ तर फार दूरची गोष्ट. त्यातही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तोंडावर आपटल्यानंतर क्रिकेटपासून मन उडालं होतं. पण मध्येच एक बातमी फिरू लागली की वीमन्स क्रिकेट मध्ये ‘फिमेल’ सचिन तयार झाली आहे. या बातमीचा पिच्छा करत असताना आम्हाला कळलं, अरेच्चा ही तर आपल्या सांगलीची पोरगी!!
नाव – स्मृती मानधना
वय – २० वर्ष
कामगिरी – वर्ल्डकपच्या पहिल्या मॅच मध्ये ९० रन्स, दुसऱ्या सामन्यात १०६ रन्सच्या खेळीत १३ चौकार आणि २ षटकार.
ज्या मुलीला काही महिन्यांपर्यंत आपण वर्ल्डकप फायनल मध्ये खेळू की नाही याबद्दल शंका होती, तीच मुलगी आज इंडियन वीमन्स क्रिकेट टीमचा चेहरा होऊ पाहत आहे. स्मृती हि मूळची मुंबईची. ती ४ वर्षांची असताना तिचे कुटुंब सांगलीत आलं. स्मृतीचे वडील श्रीनिवास हे स्वतः क्रिकेटपटू असल्यानं त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटची ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. त्या दरम्यान स्मृतीला या खेळात नकळत रस येऊ लागला. क्रिकेटबद्दल तिची आवड वडिलांनी ओळखली आणि अवघ्या ९ वर्षापासूनच स्मृतीला क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली. ११ व्या वर्षीेच तिची चक्क १९ वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली. स्मृती उजव्या हाताने लिहिते, पण ट्रेनरने आणि तिच्या वडिलांनी तिला जाणीवपूर्वक डावखुरी फलंदाज केलं. आणि यामुळेच तिने एवढी भन्नाट कामगिरी करून दाखवल्याचं म्हटलं जातंय.
यावर्षी जानेवारीत वीमन्स बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना स्मृतीला गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर तिला ५ महिने क्रिकेटपासून लांब जावं लागलं. यानंतरही तिनं हार न मानता टीममध्ये दमदार पदार्पण केलं आणि वर्ल्डकप टीम मध्ये धडाकेबाज कामगिरी करून दाखवली. ओपनिंगला खेळत असताना आधीच तिने चौकार षटकार मारून सामना खिश्यात घातल्याने मॅच जिंकणं अगदी सोप्प झालं.
मंडळी स्मृतीच्या हा कामगिरीबद्दल आपल्या सर्वांनाच तिचा अभिमान वाटतोय. भविष्यात तिच्याकडून याहूनही मोठ्या कामगिरीची अशा आहे.
टीप : एक आतली बात बोलू ? स्मृती दिसायलाही ‘क्युट’ असल्यानं क्रिकेटला नावं ठेवणारे लोकही आता क्रिकेट बघतील असं वाटतंय...असो.







