इस्राएल आणि मराठी कनेक्शन शेकडो वर्षे जूने आहे ! वाचा कसे ते !
एकेकाळी जगात सर्वात श्रीमंत आणि व्यापारात निपुण असलेल्या यहूदी समाजाचा महाराष्ट्रशी फार जुना ऋणानुबंध आहे. सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या दुसर्या शतकात रायगड जिल्ह्यातील नागाव जवळ ज्यू (इस्राएली) येऊन पोहचले. यांच्या पूर्वजांचा व्यवसाय तेल घाणीचा असल्यानं आणि शनिवार हा त्यांचा रजेचा दिवस (ज्याला 'सब्बाथ' असे म्हटले जाते ) असल्यानं महाराष्ट्रात त्यांची ओळख ‘शनिवार तेली’ अशी आहे. महाराष्ट्रात आलेल्या हा ज्यू लोकांचा समुदाय 'बेने इस्राएल' म्हणून ओळखला जातो.
ज्यू लोकांचा स्वभाव स्थानिक संस्कृतीशी मिळतंजुळतं घेण्याचा असल्यामुळं त्यांची आडनावं पण त्यांच्या गावाच्या नावाप्रमाणं असतात. उदाहरणार्थ, रेवदंडेकर, पेणकर, उरणकर वगैरे. नागरी मराठी किंवा प्रमाण भाषेपेक्षा थोडा उच्चाराचा हेल वेगळी असलेली मराठी बोलीभाषा ते बोलतात, ज्याला जुदाव मराठी असं म्हटलं जातं. गणपतीविसर्जना सारख्या अनेक मराठी सांस्कृतीक सोहळ्या मध्ये त्यांचा सहभाग असतो.
![]()
पूना हग्गड (स्रोत)
इस्राएल या त्यांच्या नविन राष्ट्राच्या स्थापनेनंतर बरेचसे मराठी ज्यू इस्राएलमध्ये गेले, पण त्यांची मराठी भाषेशी असलेली नाळ तुटलेली नाही. इस्राएल मध्ये 'मायबोली' हे त्यांचे मराठी मासिक नियमित प्रसिध्द होतं. काही ज्यू धर्मग्रंथ देखील मराठीत तयार गेले होते. काही वर्षांपूर्वी मँचेस्टर युनिव्हर्सिटीतील एका इतिहास तज्ञाने १३७ वर्ष जुने ‘पूना हग्गड’ नामक पुस्तक शोधून काढलं होतं. विशेष म्हणजे हे पुस्तक मराठी-हिब्रूत मिश्रित आहे.
ज्यू लोक भारतात किती सहज मिसळून गेले याचं उदाहरण म्हणजे भारतात नावारूपाला आलेले काही ज्यू व्यक्ती. यातल्या काहींना तुम्ही चेहऱ्याने ओळखत असाल, पण ते ज्यू असण्याबद्दल आपल्याला अजिबात कल्पना येत नाही. त्यातल्या काहींची ओळख अशी :
डेविड अब्राहम

अचंबा वाटला ना ? यांना आपण अनेक जुन्या चित्रपटांमधून पाहिलं असेल. बूट पॉलिश, चुपके चुपके, बातों बातों अशा काही प्रसिद्ध चित्रपटातून डेविड आपल्याला दिसले.
डेविड ससून
![]()
पुण्यातलं ससून हॉस्पिटल आठवलं का मंडळी? हे ससून हॉस्पिटल याच गृहस्थाच्या नावावर आहे. हे मुंबईचे मोठे उद्योगपती होते, तसेच ज्यू समाजाचे त्याकाळातले नेते देखील होते. १७९२ चा त्यांचा जन्म झाला होता. मुंबईतल्या ससून लायब्ररी, ससून डॉक, पुण्यातील ससून हॉस्पिटल या सर्वांची नावे डेविड ससून यांच्याच स्मरणार्थ ठेवण्यात आली आहेत.
जे. एफ. आर. जेकब
![]()
जे॰एफ॰आर या नावाने ओळखले जाणारे जेकब हे भारताचे लेफ्टिनंट जनरल होते. १९७१ च्या भारत-पाक युद्धात बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात यांचा मोठा सहभाग होता.
निसीम इजेकिल

निसीम हे एक प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त आहे. साहित्य क्षेत्रातल्या अमुल्य कामगिरीसाठी ते ओळखले जातात.
डॉ. आशा भेंडे उर्फ लिली इझिकेल
निसीम इजेकिल आणि अशा ताई दोघे बहिणभाऊ होते. अशा ताईना तुम्ही मराठी चित्रपटांत पाहिलं असेल. त्यांना रंगभूमीचीही आवड होती. तीनदा MA आणि त्यानंतर लग्नानंतर 20 वर्षांनी दोन मुलं असताना त्यांनी PhD केली. एकाच वेळी प्रोफेसर, विभागप्रमुख आणि रंगभूमी या आघाड्या त्यांनी सांभाळल्या. पन्नाशीच्या दशकात त्यांनी अभिनेते आत्माराम भेंडे यांच्यासोबत लग्न केलं. हे लग्न तेव्हा आंतरधर्मीय म्हणून तर गाजलंच, पण लिली भेंडयांपेक्षा वयाने मोठ्या होत्या म्हणूनही चर्चेत होतं. या दोघांचा मुलगा नंदू भेंडे यांनी भारतात रॉक संगीताचा पाया घातला.
मॅगेन डेव्हिड सिनागॉग (भायखळा)

मुंबईतील ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ असलेलं मॅगेन डेव्हिड सिनेगॉग हे इस्राईलच्या बाहेर असलेलं आशियातलं सर्वात मोठं सिनेगॉग आहे. १८६४ मध्ये उभारलेलं हे सिनेगॉग ‘डेव्हिड ससून' यांनी व्हिक्टोरियन शैलीत बगदादी ज्यू लोकांच्या वाढत्या लोकसंख्येसाठी भायखळ्यात उभारलं होतं.
गेट ऑफ मर्सि

'गेट ऑफ मर्सी सिनेगॉग’ हे मुंबईतील ज्यू लोकांचे सर्वात जुने प्रार्थना स्थळ म्हणून ओळखले जाते. हे सिनेगॉग सम्युअल स्ट्रीट जवळ असून ज्यू मुलांचे नामकरण आणि बालसंस्कार सारखे विधी इथेच केले जातात. या भागात ज्यू धर्मीयांचा प्रभाव जाणून येतो. मस्जिद बंदरचे नाव मस्जिद हे हिब्रू शब्द ‘माशेद’ वरून घेतलं आहे ज्याचा अर्थ सिनेगॉग असा होतो. काही वर्षांपासून 'गेट ऑफ मर्सीचे रुपांतर पर्यटनस्थळात झाले आहे. इथली वास्तू पाहण्यासाठी माणसे सतत येत असतात.
मंडळी भारताची सर्वांना सामावून घेण्याच्या वृत्तीमुळे जो परका इथे आला त्याला भारताने आपलंस केलं आणि तो कायमचा इथलाच झाला. ज्यू आणि पारसी हे त्यातील अगदी ठळक उदाहरणं आहेत.




