अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचे कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अनवाणी आगमन?

सध्या चर्चा चालू आहे कान्स महोत्सवाची. ऐश्वर्या, सोनम, मलिका शेरावतचे लूक्स, कपडे या चर्चाही सगळीकडे दिसत आहेत. अशा या बहुचर्चित आणि  जिथे फॅशनशिवाय पान हलत नाही अशा कार्यक्रमात एक आश्चर्य घडले. या कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचे सुंदर काळा गाऊन आणि पाचूचा नेकलेस घालून आगमन झाले. पण जेव्हा तिने पायर्‍या चढायला सुरूवात केली, तेव्हा तिचे अनवाणी पाय दृष्टीस पडले. 

ज्युलिया रॉबर्ट्सने असे का केले?

कान्स चि‍त्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठीच्या पोषाखांचेही काही संकेत आहेत. स्त्रियांसाठीची नियमावली आणखीच मोठी आहे. पुरूषांनी काळा टक्सिडो , बो टाय आणि शूज तर  स्त्रियांनी उंच टाचांचे बूट व ड्रेस - पाश्चात्य पद्धतीचा पार्टी ड्रेस - घातलेच पाहिजेत असा एक नियम त्यात आहे. त्यातही स्टिलेटोज म्हणजे पेन्सिलसारखी पातळ आणि  किमान साडेतीन इंच उंचीची टाच असणार्‍याच चपला घालणे अनिवार्य आहे. गेल्या वर्षी ’कॅरोल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस जवळजवळ पन्नास स्त्रियांना या कारणासाठी प्रवेश नाकारण्यात आला. त्यातल्या काहीजणींना वयोमानानुसार अशा चपला घालणॆ शक्य नव्हते.  त्यापूर्वीही प्लॅटफॉर्म हिल्स घातल्यामुळे स्त्रीकलाकारांना सुरक्षारक्षकांनी कार्यक्रमात येऊ दिल्या न गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षीच्या घटनेचा मिडियामध्ये खूप निषेध झाला होता.

या नियमांना झुगारून देत ज्युलिया रॉबर्टसने या वर्षी चपलांनाच फाटा देऊन अनवाणी चालणंही किती आरामदायक असतं हेच दाखवून दिलंय. २१व्या शतकातही स्त्रियांकडे एक सुंदर शोभेची बाहुली म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन आहे ही दुर्दैवाची बाब आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required