किमतराय गुप्ता - शून्यापासून अब्जापर्यंतचा प्रवास!
किमतराय गुप्ता, तुम्ही हे नाव कधी ऐकलं आहे का ? कदाचित नसेल ऐकलं, तर आज आम्ही तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देतो. भारतातील यशस्वी उद्योजकांच्या यादीमधलं हे एक नाव. एका साध्या इलेक्ट्रिक कंपनीचा मालक ते हॅवेल्स कंपनीचे मालक असा यांचा प्रवास आहे. एकेकाळी डबघाईला आलेल्या हॅवेल्स कंपनीला किमतराय यांनी कसं वर काढलं आणि त्या कंपनीला अग्रणी स्थान कसं मिळून दिलं याचीच ही कहाणी.
गुप्ताजी अँड कंपनी
किमतराय गुप्ता यांचा जन्म १९३७ साली ब्रिटीश इंडियातील पंजाब मध्ये झाला. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांन शिक्षण पूर्ण करता आलं नाही. १९५८ साली शाळा मध्येच सोडून त्यांनी दिल्लीत काम करायला सुरुवात केली. काही काळाने हातात काही पैसे आल्यानंतर त्यांनी स्वतःचा उद्योग सुरु करण्याचं ठरवलं आणि ‘गुप्ताजी अँड कंपनी’ नामक इलेक्ट्रिक ट्रेडिंग कंपनीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे अवघं १०,००० भांडवल होतं.
हॅवेल्सचे मालक
उद्योगात मजल मारत किमतराय हे हॅवेल्सचे डिस्ट्रीब्युटर झाले. १९७१ साली त्यांच्या नशिबाने अचानक उचल खाल्ली. हॅवेल्स कंपनी ही त्यावेळी हवेली राम गांधी यांची होती. काही आर्थिक कारणांनी कंपनी तोट्यात जात असल्याने कंपनी विकण्याचं ठरलं. स्वतः त्याच कंपनीचे डिस्ट्रीब्युटर असल्याने किमतराय गुप्तांनी कंपनीला विकत घ्यायचं ठरवलं आणि हॅवेल्स ७ लाख किमतीला विकत घेतली. ही खरं तर मोठीच रिस्क होती, पण त्यांना स्वतःवर विश्वास होता.
कंपनीचा कायापालट
कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांनी बिझनस वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या माध्यमातून वाढवायला सुरुवात केली. केबल्स, लाईटिंग्स, उपकरणे, पंखे आणि गीझर असे काही नवीन प्रोडक्ट्स हॅवेल्सने बाजारात आणले. फिलिप्स, ओसराम लाईट्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हज्, ओरिएंट, पोलर आणि खेतान तसेच केबलल्स मध्ये Finolex अश्या काही बड्या कंपन्यांबरोबर स्पर्धा असल्याने त्यांनी ब्रँड प्रमोशनवर मोठा पैसा लावायचे ठरवले. वार्षिक मिळकतीतून फक्त एक किंवा २ टक्के पैसा जाहिरातींवर खर्च करण्याच्या काळात हा निर्णय थोडा हटके होता.
आपल्या दूरदृष्टीने किमतराय यांनी हरियाणातील फरीदाबाद मध्ये कण्ट्रोल गियर प्रोडक्ट्स बनवण्याचा प्लांट सुरु केला. तसेच राजस्थानातील अलवार मध्ये पॉवर केबल आणि वायर बनवण्याच्या प्लांटची स्थापना केली.
किमतराय गुप्तांच्या महत्वाकांक्षी व्यक्तिमत्वाची खरी ओळख २००७ मध्ये पटली जेव्हा त्यांनी सिल्वानिया नावाची कंपनी विकत घेण्याचं ठरवलं. त्यांची धडाडी हे ७० व्या वर्षीसुद्धा टिकून होतं हे यातून दिसतं. सिल्वानिया ही हॅवेल्सपेक्षा मोठी होती पण फार तोट्यात असलेली कंपनी होती. हा निर्णय जड जाणार होता त्यामुळे अनेकांनी याचा विरोध केला.
सिल्वानिया २३ कोटी युरो ला विकत घेतल्यानंतर हॅवेल्सच्या शेअर्स मध्ये घसरण आली आणि गुप्तांवर आर्थिक दबाव वाढू लागला. काहींनी सल्ला दिला की सिल्वानिया जशी घेतली होती तशीच विकून टाका, काहींनी तर टोकाचं जात असंही म्हटलं की नोएडा मधलं तुमचं ऑफिस हे अपशकुनी आहे. या सगळ्यातून त्यांनी मागे न हटण्याचा निर्णय घेतला.
‘यावेळी जर आपण माघार घेतली तर पुढे कोणत्याच कंपनीचं अधिग्रहण करता येणार नाही आणि आपण विश्वास गमवून बसू, हीच वेळ आहे आपल्याला सिद्ध करण्यासाठी.’ असा पवित्र किमतराय यांनी घेतला आणि आव्हान स्वीकारलं. पुढे २०१० पर्यंत सिल्वानिया बाजारत पुन्हा वधारली आणि हॅवेल्सची पत वाढली.
मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर किमतराय यांनी हॅवेल्सला आज एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आज हॅवेल्स ही एक अब्जावधीची कंपनी असून कार्बट्री, सिवानिया, कॉन्कर्ड, लुमिनस,आणि असेच ९१ उद्योगसमूह हे हॅवेल्सच्या अखत्यारीत आहेत. कमाल म्हणजे हे ब्रँड आज ५१ देशात यशस्वीरीत्या आपले पाय रोवून आहेत.
भारतातील उत्पादन उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा आर्थिक कारणांनी सर्वांनाच या क्षेत्रात प्रवेश नव्हता त्याकाळात किमतराय गुप्तांनी मोठी मुसंडी मारली. वयाच्या ७७ व्या वर्षी हृदयविकाराने ७ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याचं निधन झालं. मुळात गरिबीतून आलेले किमतराय हे १०० महत्वाच्या भारतीय व्यक्तींमध्ये गणले जात होते, त्याच बरोबर फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या पंक्तीतही ते होते. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा अनिल गुप्ता आता बिझनेस सांभाळत आहे.
किमतराय गुप्तांचा शून्यापासून अब्जापर्यंतचा प्रवास नवीन उद्योजकांना नेहमीच प्रेरणा देत राहील.





