तारें जमीन पर : या अशिक्षित मुलाला येतात तब्बल डझनभर भाषा !!

ज्याला शिकायचंय तो  माणूस कुठेही शिकतो.  मग शाळेत जाणारा असो वा नसो. शिक्षणापासून लांब असलेल्या मुलांमध्ये अनेक गुण असूनही पुरेसं शिक्षणाच्या आभावी ही मुले आजही सिग्नलवर, रेल्वे स्टेशनवर छोटीमोठी कामे करून पोट भरत असतात.  पण म्हणतात ना, टॅलेंट लपून राहत नाही.  असचं काही घडलंय रवी कुमारच्या आयुष्यात. काय आहे त्याची कहाणी! चला जाणून घेऊया !

या मुलाचं नाव आहे रवी कुमार. मुळचा गुजरातचा असलेला रवी मुंबईच्या ‘हँगिंग गार्डन’ मध्ये ‘मोर पिसांचा पंखा’ विकतो. या पंख्याला तो त्याच्या भाषेत ‘इंडियन एअर कंडिशनर’ म्हणतो. हे पंखे त्याची आजी स्वतः तयार करते तर या विक्रीतून आलेल्या पैशातून त्याचं कुटुंब चालतं. या भागात जगभरातून येणारे टूरिस्ट आणि त्यांची प्रत्येकाची वेगळी भाषा रवी 8 वर्षांचा असल्यापासून ऐकत होता.  त्यातूनच त्याने जवळ जवळ १० भाषा आत्मसात केल्या आणि पर्यटकांना त्यांच्याच भाषेत तो पंखे विकू लागला.

इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच, जपानी, अरबी, रशियन, चीनी, इराणी अशी या भाषांवर त्याची पकड आली. ही पद्धत भन्नाट तर होतीच, पण या अशिक्षित मुलाला एवढ्या भाषा बोलताना बघून माणसांचं कुतूहल जागं झालं. यातूनच एका पर्यटकाने त्याचा एक व्हिडीओ युट्यूबवर टाकला आणि बघता बघता त्याने युट्यूब गाजवलं. त्यावेळी तो अवघा १३ वर्षांचा होता.

रवीच्या या गुणामुळे त्याला ‘लींगो कीड’ अर्थात बहुभाषिक  मुलगा असं नाव पडलं. रवीला येणाऱ्या भाषा तो त्याच भाषेच्या लकबीत आणि ठसक्यात बोलू शकतो याचे  लोकांना आश्चर्य वाटत असे. त्याची लोकप्रियता एवढी वाढली की २०११ मध्ये त्याला साबरमतीच्या TEDx मध्ये बोलावण्यात आलं आणि तिथे त्याने सर्व प्रेक्षकांसमोर त्याच सहजतेने इंग्रजीत संवाद साधला.

दुर्दैवाने त्याच्यातले शिकण्याचे अनेक गुण असूनही त्याला गरिबीमुळे शाळा पूर्ण करता आली नाही. त्याचं कुटुंब त्याच्या मोरपिसाच्या पंख्यांच्या विक्रीतून आलेल्या कमाईवर चालतं. त्याच्या वडलांच वय आता वाढत आहे, त्यामुळे त्याच्यावर जबाबदाऱ्या वाढत आहेत. अशा परिस्थितीतही त्याला शिकण्याची इच्छा आहे असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याचं काम सांभाळून त्याला शिकायचं आहे.  त्याचं घर सांताक्रूझला आहे. त्यामुळं त्याला मलबार हिलच्या ‘हँगिंग गार्डन’ पर्यंत लांबचा प्रवास करायला वेळ लागतो.  प्रवासानंतर रोजच कामाला सुरुवात करून जो वेळ उरेल तो त्याला शिक्षणासाठी द्यायचा आहे असं रवी म्हणाला.

युट्यूबवरती शोधलंत तर त्याचा २०१५साली कुणीतरी घेतलेला एक व्हिडिओ दिसतो. त्यात तो पंखे विकण्याचेच काम करताना दिसतो. आता किमान दोन वर्षांनंतर तरी त्याचं शिक्षणाचं स्वप्न पुरं झालं असावं अशी अपेक्षा आहे. आपल्या देशात आर्थिक, सामाजिक कारणाने अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहतात.  कदाचित त्यांच्यातही अनेक गुण ठासून भरलेले असतील.  पण अनेक दबावामुळे ही मुलं अजून मागे पडत आहेत.  याचं रवी कुमार हे एक मोठं उदाहरण म्हणावं लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required