पावसाळ्यातल्या पक्ष्यांची गंमत जंमत, वाचा आपल्या लाडक्या खंड्या आणि सुगरण पक्ष्याबद्दल..
मंडळी, निसर्ग अफलातून आहे. पावसाळ्यात तर त्याचं वेगळंच रूपडं पाहायला मिळतं. या ऋतूच्या निमित्तानं काही पक्षीही आपल्याला त्यांचं दर्शन देतात. आज सुषमा केतकर आणि गिरिश केतकर यांच्या सौजन्यानं आम्ही घेऊन आलो आहोत पावसाळ्यात दिसणाऱ्या खंड्या आणि सुगरण पक्ष्यांची माहिती..
तिबोटी धीवर / ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर
नैऋत्य मौसमी पावसाच्या सुरवातीस म्हणजे जूनपासून सप्टेंबर दरम्यान हा पक्षी महाराष्ट्र कोकण किनारपट्टी जवळ दिसतो. हा त्याचा विणीचा हंगाम आहे. भारतात आढळणारा सर्वात छोटा किंगफिशर आहे - १३ सेमी लांबीचा. एव्हड्याश्या पक्षाच्या अंगावर रंगांची मात्र निसर्गानं लयलूट केलीय . जांभळा, गुलाबी, निळा, काळा, पांढरा या रंगांच्या वेगवेगळ्या छटा त्याच्या अंगावर दिसतात. नारंगी पिवळे पोट आणि प्रवाळासारखी लाल रंगाची मोठी चोच! पायाला मात्र तीनच बोटं असतात. छोटे ओहोळ, ओढे यांच्या आसपास मातीत जमिनीपासून एक ते दीड मीटर उंचावर हा पक्षी बिळासारखं घरटं करतो. ४ सेमी तोंड असलेलं हे घरटं एक मीटर खोल असतं. छोटे कीटक, पाली, मासे हे त्याचं खाद्य.

या देखण्या पक्ष्याबद्दल कवी श्रीधर शनवारे म्हणतात..
तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.
शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.
जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची.
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलांची.
गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा.
कविता वाचताना तुम्हांला नक्कीच चौथीचं बालभारतीचं पुस्तक आठवलं असेल आणि "मेरा दिल ये पुकारे आजा"च्या चालीवर म्हणून पाहिली की नाही?
सुगरण
पावसाची रिमझिम चालू झाली की सुगरण पक्षांची लगबग सुरू झालेली दिसते. मनुष्य वस्तीच्या आसपास एखाद्या झाडावर अनेक घरटी आपल्याला पाहायला मिळतात. इतर वेळी चिमणीसारख्या दिसणाऱ्या नराच्या डोक्यावर सोनेरी पिवळा मुकूट दिसू लागतो. तो घरटं बांधायला सुरू करतो. घरटं अर्धं झालं की मादीला बोलावून घेतो आणि तिची पसंती मिळाली तरच ते घरटं पूर्ण करतो. मादी त्यात अंडी घालून उबवते.

आणि म्हणून बहिणाबाई म्हणतात..
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
लेखिका- डॉ. सुषमा केतकर.
फोटो सौजन्य- गिरिश केतकर्




