computer

पावसाळ्यातल्या पक्ष्यांची गंमत जंमत: तणमोर आणि नवरंग पक्षी पाहिले आहेत कधी??

मंडळी, निसर्ग अफलातून आहे. पावसाळ्यात तर त्याचं वेगळंच रूपडं पाहायला मिळतं. या ऋतूच्या निमित्तानं काही पक्षीही आपल्याला त्यांचं दर्शन देतात. आज सुषमा केतकर आणि गिरिश केतकर यांच्या सौजन्यानं आम्ही घेऊन आलो आहोत पावसाळ्यात दिसणाऱ्या तणमोर आणि नवरंग पक्ष्यांची माहिती.. 

तणमोर / खरमोर / लेसर फ्लोरिकन

गवताळ प्रदेशातील दुर्मिळ होत चाललेला लाजराबुजरा असा हा पक्षी. नैऋत्य मौसमी पावसाळ्यात तो चटकन दिसतो. हा त्याचा विणीचा हंगाम. यावेळेस नर   एक ते दोन हेक्टर जागा हेरतो आणि त्या जागेतलं आपलं साम्राज्य स्थापित करण्यासाठी आणि मादीला आकर्षित करण्यासाठी अगदी वैशिष्ट्यपूर्ण उड्या मारतो. एकाच जागी दीड ते दोन मीटर उंच उड्या मारताना तो आपली बाकदार मान मागे टाकतो आणि पाय दुमडून घेतो, त्याचबरोबर पंखांची विशिष्ट फडफड ही करतो. पण दुर्दैवानं असं करण्यानं तो शिकाऱ्यांचे लक्ष्य बनू शकतो.


गवताळ प्रदेशाचा ऱ्हास, शिकार, शेतात कीटकनाशकांचा अतिरेकी वापर यामुळे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
राजस्थानमधल्या अजमेरजवळ सोनखलिया येथील शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या शेतीत अपुरं उत्पन्न येतं म्हणून मुगाची शेती चालू केली. तेव्हा  तणमोरांच्या संख्येत  वाढ झालीय असं आढळलं. मुगाच्या पीकावर कीटकनाशकांची फवारणी कमी पुरते, हा बहुधा त्याचाच परिणाम असावा. आता तिथले शेतकरी आणि वनविभाग तणमोरच्या संवर्धनासाठी सज्ज झाल्येत.

नवरंग / इंडियन पिट्टा

छोट्या शेपटीचा मैनेच्या आकाराचा हा रंगीबेरंगी पक्षी जंगलात दिसतो. हिरवा, निळा, भुरा, काळा, पांढरा, लाल, पिवळा अशा अनेक रंगांची उधळण निसर्गानं त्यावर केली आहे. जून ते ऑगस्ट या विणीच्या हंगामात पश्चिम घाटातील जंगलात त्याचं दर्शन होतं. तामिळ भाषेत त्याला अरूमणी कुरुवी (सिक्स ओ क्लॉक बर्ड) असे नाव आहे. याचं कारण आहे की पहाटे आणि तिन्हीसांजेला त्याची शीळ ऐकू येते. बरेचदा तो जंगलातील दाट झुडुपांच्या खाली वाळकी पाने बाजूला सारून खालच्या ओलसर जमिनीतील किडे उचलून खाताना दिसतो.

 

लेखिका- डॉ. सुषमा केतकर.
फोटो सौजन्य- गिरिश केतकर

सबस्क्राईब करा

* indicates required