भोंडल्याला भुलाबाई आणि भुलोजी नांव कसे पडले? वाचा या विदर्भातल्या परंपरेबद्दल...

नवरात्राचे दिवस आले की स्त्रीशक्तीचा जागर सुरु होतो.  त्याचबरोबर  महाराष्ट्राला वेध लागतो  तो भोंडला करायचा.  स्त्रिया, मुली खूप उत्साहाने पारंपरिक वस्त्रे घालून ,पारंपरिक गाणे म्हणून नवरात्रीचा उत्सव साजरा करतात. आपले प्रत्येक सणवार , संस्कृती काही न काही उद्देश्य ल्यायलेली आहे, प्रत्येक सणावाराच्या मागे एक कहाणी आहे आणि ती त्या त्या काळातल्या गरजेप्रमाणे सुरू झालेली असून येणाऱ्या पिढीलादेखिल सुखावणारी आहे.

फ़क्त आता धावत्या काळानुरूप अश्या अनेक सांस्कृतिक कला, परंपरा लोप पावत आहे. पण परंपरेला जोपासणे हे आज महत्वाचे आहे कारण येणाऱ्या पिढीत आपले संस्कार रुजले पाहिजे. आपण म्हणतो की पावला-पावलावर मराठी भाषा बदलते, तसेच काही सणवार करायच्या पद्धती व नियम देखिल बदलतात.  पण शेवटी ते सणवार साजरे करण्याचा मागे उद्देश्य हा एकच असतो.

महाराष्ट्रात भोंडला असतो, तसेच विदर्भ आणि मध्यप्रदेशात व इतर राज्यात असलेले मराठी लोकं " भुलाबाई-भूलोजी" यांच्या मूर्ती स्थापन करून सण साजरा करतात. तुम्ही म्हणाल की भुलाबाई हे काय?  आणि महित आहे, कोणी याला "भुलाबाई -भूलोजी "म्हणतात तर कोणी "गुलाबाई -गुलोजी".

काही वर्षापूर्वी या उत्सवाची कथा एका लेखात वाचली होती. एकदा शंकर पार्वती सारीपाट खेळतात सारीपाटाच्या डावात पार्वती जिंकते आणि शंकर पार्वतीवर रुसून निघून जातात, पार्वती  मग भिल्लीणीचे रूप घेऊन त्यांचा शोध घेते. शंकर भिल्ल रूपात तिला भेटतात. इथल्या या भिल्ल शब्दाचा अपभ्रंश झाला आणि भिल्लीणीची भुलाबाई आणि भिल्लाचे भूलोजी झाले.

 भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यन्त घरोघरी भुलाबाई आणि भूलोजीचा मुक्काम असतो.  आणि त्यांच्या बरोबर असतो हळकुंड बाळा. भुलाबाई आणि भूलोजी म्हणजेच शंकर आणि पार्वती असं म्हणतात आणि हळकुंड म्हणजेच गणपती.  त्यांची स्थापना झाली की मग पुढे छान आरास मांडली जाते.संसाराशी निगडित आरास किंवा लहानमुलींच्या आवडी प्रमाणे सजावट केली जाते.  भुलाबाई देखील माहेरी येतात असं म्हणतात. आधीच्या काळात माहेरी येणाऱ्या माहेरवाशिणी आपल्या मैत्रिणींना आपले सासर कसे आहे?,सासरची मंडळी, त्यांचे स्वभाव, तिथले वर्णन गाण्याच्या माध्यमाने सांगायच्या. कारण त्यावेळी आज सारखे लगेच फोन करून मनातले सांगायची सोय नव्हती ना...

"गुलाबाई गुलाबाई, सासु कशी? सासु कशी?

चुलीवर बसलेली मांजर जशी.

गुलाबाई गुलाबाई,  सासरा कसा?

झाडावर बसलेला माकड जसा.

गुलाबाई गुलाबाई,  जेठ कसे?

रुपायातले आठाणे जसे.

गुलाबाई गुलाबाई जाऊ कशी?

आठाण्यातली चाराणी जशी.".... 

अशा गाण्यातून जाम गम्मत असायची. लहान मुली आणि लग्न झालेल्या मुलींसाठी भुलाबाई हा विशेष  उत्सव करायचे. यातूनच लहानमुलींना खेळीमेळीच्या वातावरणात लग्न व्यवस्थेची  पूर्वकल्पना देता येत असे.

महिनाभर छान गाणी गायची आणि धमाल मज्जा करायची विशेष सूट असायची. एरवी सातच्या आत घरात म्हणणाऱ्या आया देखील महिनाभर मज्जा करू द्यायच्या. लग्न झालेल्या मुलींना सासर बद्दल बोलता यावे, त्यांना होणारा त्रास, घुसमट दूर होऊन थोडा काळ गमती जमतीत  घालवता यावा म्हणून हे सण साजरे होत असतील अशी एक समज आहे.

सासू खूप कामं करवून घेते हे सांगायला ...

"कारल्यांचा वेल लाव गं सुने लाव गं सुने

मग जा आपुल्या माहेरा माहेरा..

कारल्याचा वेल लावला हो सासुबाई, लावला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा??

कारल्याला कारली येऊ दे गं सुने येऊ, दे गं सुने

मग जा आपुल्या माहेरा माहेरा... अश्या गाण्यांनी सासुबद्दलचे गाऱ्हाणे गायले जायचे.

 

मग नवरा रुसला की त्यावर गाणे, रुसलेल्या सुनेला घरच्या मंडळींनी केलेली विनंती म्हणजे हे गाणं

"यादवराया राणी रुसून बसली कैसी?

सासुरवाशीण सून घरासी येईना कैसी?

सासुबाई गेल्या समजावयाला

चला चला सुनबाई आपुल्या घराला

अर्धा संसार देते तुम्हाला..

अर्धा संसार नक्को मला,

मी नाही यायची तुमच्या घराला.

यादवराया राणी रुसून बैसली कैसी…?

मग सासरे, नणंद, दिर, भाऊ…

असे समजावयाला येतात गाण्यात अखेर ती नवऱ्यासोबत जाते..

पूर्वी लहान मुली भुलाबाईच्या दिवसांत खूप मजा करायच्या, गल्लीत जवळ पास राहणाऱ्या समवयस्क मुली एकत्र जमायच्या.  मग भुलाबाईची गाणी म्हटली जायची, त्यांना खाऊ दिला जायचा आणि मग दुसऱ्या घरी गाणी म्हणायला निघायच्या. सर्वांकडे गाणे गाऊन आणि खाऊ खाऊन झाल्यानंतर सगळ्या आपापल्या घरी जायच्या. काहीजणी लाल-हिरव्या रंगाचे टिपऱ्यांचे जोड  वापरून उंच कोनाड्यात आरास करायच्या. मुलांमध्ये जसा गणपतीच्या येण्याचा उत्साह, तसाच मुलींमध्ये विसर्जनानंतर भुलाबाई बसवायचा उत्साह.

या भुलाबाईच्या दिवसात प्रत्येकाच्या घरी जाऊन भुलाबाईची गाणी म्हटली जात. कधी नुसतीच तर कधी टिपऱ्यांच्या तालावरही भुलाबाईची गाणी म्हट्ली जात. दोघी -दोघी मुली  हळकुंड बाळासाठी तळहाताचा पाळणा करतात. सगळी गाणे गाऊन  "निज निज माझ्या बाळा" असा पाळणा म्हणून शेवटी पुष्पांजली म्हटली जाते.  "पुष्पांजली तुला अर्पिते प्रेम गुलाबाई अज्ञानाते दूर करुनी सन्मती मज देई". भुलाबाईची ही मजा कोजागिरी पौर्णिमेपर्यन्त चालते.

गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत भुलाबाई बसवतात.  आता मुलांचे अभ्यास असल्याने आणि वेळ नसल्याने काही भागात शेवटले ५ दिवस भुलाबाई बसवतात.  जेणेकरून संस्कार आणि सण साजरा करायचा वारसा जपता यावा. मनोरंजनाची विपुल साधने आणि करिअर करण्याच्या नादात भुलाबाईची ही सुन्दर प्रथा खंडित झालेली दिसते. तरी देखील काही परंपरा व संस्कृतीचा वारसा जपणारे लोक अजुन ५ किंवा १० दिवस भुलाबाईचा उत्सव साजरा करतात. इंदौरला काही ठिकाणी भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्धा अजूनही असते.

 मग,  आता तुम्हीही घरच्या मुलींना या हरवलेल्या भुलाबाईची आठवण करून द्या. तुम्हांलाही तुमचं बालपण निश्चितच आठवेल.  

सौ. धनश्री संकेत देसाई( तोडेवाले)

सबस्क्राईब करा

* indicates required