दसऱ्याला आपट्याच्या पानांऐवजी बीजगोळे वाटा!!! 'सेप' व 'भवताल'चा अभिनव असा पर्यावरणफ्रेंडली उपक्रम..
आपण दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकांना वाटतो. महाराष्ट्राच्या काही भागात ज्वारी किंवा मक्याची पानं चांदी म्हणून लुटण्याचीसुद्धा प्रथा आहे. पण हे करताना आपण झाडं ओरबाडतो, पानं तोडतो.. विक्रेते तर थेट झाडांच्या फांद्याच तोडून आणतात. थोडक्यात काय, एका दिवसासाठी झाडांची अपरिमित हानी होते. दुसऱ्या दिवशी ही पानं कचऱ्यातच जातात...
हे टाळण्यासाठी झाडाची पानं वाटण्याऐवजी नवीन रोप लावलं तर? कल्पना चांगली आहे ना?
भवताल आणि सोसायटी फॉर सायन्स एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल (सेप) यांनी एक उपक्रम चालू केलाय. दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांनी झाडांच्या स्थानिक प्रजाती म्हणजेच चिंच, बहावा, आपटा.. अशा झाडांचे बीजगोळे बनवायला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी शेण आणि मातीचा ६०:४० अशा प्रमाणातला चिखल बनवला आणि त्यात या झाडांचे बी टाकले. हा उपक्रम त्यांनी चालू केला राजेंद्रनगरमधल्या इंद्रधनुष पर्यावरण केंद्रात् आणि इतर सोसायट्यांमध्ये. भवताल-सेपचे कार्यकर्ते आणि या सोसायट्यांतल्या कार्यकत्यांनी मिळून दोन-तीन महिन्यांत सुमारे २५,००० बीजगोळे बनवले. हे बीजगोळे ज्या सोसायट्यांनी बनवले, त्यांनी या बीजगोळ्यांपासून् झाडंही लावली आहेत.
या उपक्रमानंतरही काही बीजगोळे शिल्लक आहेत. तेव्हा दसऱ्याचं निमित्त साधून सोसायटी फॉर सायन्स एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल (सेप) व भवताल मॅगझीनतर्फे एक अभिनव संकल्पना मांडण्यात येत आहे. दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याऐवजी बीजगोळे लुटण्याचं आवाहन या दोन संस्थांमार्फत करण्यात आलं आहे. हे बीजगोळे तुम्ही तुमच्या अंगणात, सोसायटीत, कंपनीमध्ये किंवा इतरत्रही जिथं झाड वाढू शकेल अशा ठिकाणी लावू शकता.
दसरा आणि होळीसारख्या सणांच्या निमित्तानं झाडं तोडण्याऐवजी आपण बीजगोळे लावूयात. त्यातून नवीन रोपं अंकुरतील व पर्यावरण संवर्धनास मदत होईल.
आपणांस बीजगोळे हवे असल्यास 'भवताल'च्या सदाशिव पेठेतील कार्यालयात सकाळी ११.३० ते सायंकाळी ७ या वेळेत ते उपलब्ध होतील. दसऱ्याच्या आदल्या दिवसापर्यंत (२९ सप्टेंबर) ते उपलब्ध करून दिले जातील. "आधी येणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य" याप्रमाणे बीजगोळ्यांचे वाटप केले जाईल.
कार्यालयाचा पत्ता - भवताल, पंतांचा गोट, ४६९/४, सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कुलच्या (टिळक रोड) समोरची गल्ली, पुणे ३०
अधिक माहितीसाठी ९५४५३५०८६२ या क्रमांकावर संपर्क साधा..

भवतालबद्दल..
भवताल मॅगझीन हे पाणी, पर्यावरण आणि शाश्वतता याला वाहिलेले दैमासिक आहे. नियकालिकामध्ये पर्यावरणाविषयीचे विविध प्रश्न मांडले जातात. एक ठराविक विषय (theme) घेऊन त्याचा विविध अंगांनी विचार केला जातो. लोकांमध्ये याद्वारे जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. सेप या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्यात येतात. लोकांना उपक्रमांच्या माध्यमातून कृती करण्यास उद्युक्त करणे हा संस्थेचा उद्देश आहे.
फोटो सौजन्य- भवताल




