दिनविशेष: 'आंतरराष्ट्रीय कॉफी डे' -जाणून घ्या भारतात या सुफी संतांनं कॉफी कशी लपवून आणली...
आज सीसीडी किंवा स्टारबक्समध्ये कॉफी घेत गप्पा मारणार्यांना हे ठाऊक नसेल की आज १ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हांला माहित आहे का, भारतात कॉफी आणली ती एका सूफी संताने. आता संत आणि कॉफी यांचा काय परस्परसंबंध असे जर मनात आले असेल तर कॉफीचा हा किस्सा वाचा!!
साधारण १६ व्या शतकात , भारतातले एक सुफी संत बाबा बुधन "मक्का"च्या तीर्थयात्रेला गेले होते. तिथं त्यांनी त्यांचा महान प्रवास येमेनच्या बंदरगाह शहर "मोचा" येथून सुरु केला आणि लाल समुद्र न ओलांडता ते भारतात परतले. या प्रवासादरम्यान "मोचा" या शहरातल्या मुक्कामात त्यांना हे समजलं की हे शहर कॉफी व्यापाराचा केंद्र तर आहेच, पण त्याचबरोबर हे कॉफीचा चांगला स्रोतही आहे. त्यांनी क्वाहा नावांच्या एका गडद आणि गोड द्रव्याच्या कॉफीचा आस्वाद घेतला. त्यांना हे द्रव्य अत्यंत ताजतंवानं करणारं वाटलं. त्यावेळी कॉफीच्या बिया भाजून मग इतर देशात पाठवल्या जायच्या. कच्चा बिया बाहेर गेल्या तर मक्तेदारी संपेल या भीतीने कॉफीच्या बिया देशाबाहेर नेण्यावर बंदी होती. मग बुधन बाबानी अगदी गुप्तपणे कॉफीच्या ७ बिया आपल्या छातीशी चिकटवून भारतात आणल्या.
( सोळाव्या शतकातलं मोका बंदर- स्रोत)
बाबा बुधन त्यांच्या यात्रेवरून परत आपल्या जन्मगावी म्हणजेच कर्नाटकाच्या चिकमंगळूर इथे आले. तिथं त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या ७ कॉफीच्या बिया लावल्या. याच कॉफीच्या बिया घराबाहेर लावल्या होत्या, त्या हळूहळू सगळीकडे पसरू लागल्या. त्या ज्या टेकड्यांवर पसरल्या, त्या बाबा बुधन टेकडी म्हणून आजही ओळखल्या जातात.
ब्रिटिश राजवटीत कॉफी लागवडीला सुरुवात झाली आणि पुढे वाढतच गेली. डचांच्या वसाहतीत त्यांनी मलबार भागात कॉफीची लागवड केली. पण दक्षिण भारतातल्या टेकड्या आणि तिथले वातावरण ह्या अरेबिक कॉफीच्या लागवडी आणि वाढीसाठी अतिशय योग्य आहेत हे जेव्हा ब्रिटिशाना समजलं, तेव्हा कॉफीचे मोठ्या प्रमाणात भारतात संक्रमण झालं.

(बाबा बुधन -स्रोत)
भारतात कॉफीची व्यावसायिक लागवड जे.एच. जॉली नावाच्या एका महत्वाकांक्षी व उद्योजक ब्रिटीश व्यवस्थापकाने सुरू केली. जॉलीसाहेब 'पॅरी अँड कंपनी ऑफ मद्रास'मध्ये ट्रेडिंगचे काम करत होता. त्यांना असे वाटले कि बाबा बुधन टेकडीमधल्या चंद्रगिरी बागेत वाढणाऱ्या कॉफी बियांमध्ये लागवडीची प्रचंड क्षमता आहे आणि त्याने त्यावेळच्या म्हैसूर सरकारकडे कॉफी लागवडीसाठी ४० एकर जमीन देण्याची विनंती केली. तोपर्यंत कॉफी 'हेटालू कॉफी' म्हणून विकली जात असे. हेटालू कॉफी म्हणजे 'लहान शेतकर्याच्या परसदारात वाढलेली कॉफी'. महाराज कृष्णा राजा वाडियार तिसरा यांनी कॉफी उत्पादनाच्या बदल्यात जमीन देण्यास सुरुवात केली. अधिक लोकांना कॉफीच्या लागवड व्यवसायात उडी घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले आणि संपूर्ण प्रदेशामध्ये कॉफी वृक्षारोपण करण्यात आले.
हळूहळू पण एक सजीव पर्यावरण व्यवस्था देखील विकसित झाली. आजही मंगळूर-माडिकेरी-कूर्ग यांसारख्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात, तर तुम्हांला तिथं कॉफी प्लांटेशन दाखवण्यासाठी आवर्जून नेलं जातं.
लेखिका- स्वप्ना सप्रे-कुलकर्णी



