आठवडी बाजारातल्या बुरुड समाजाबद्दल या गोष्टी तुम्हांला नक्कीच माहित नसणार...
उस्मानाबादच्या आठवडी बाजारात प्रवेश केलात, तर पहिल्या दक्षिणोत्तर रस्त्यावर टोपली, सूप, दुरडी, नैवेद्याचे द्रोण, रुखवताच्या लहान दुरड्या विकणारी बुरुड समाजाची अनेक दुकाने तुम्हांला दिसतील. बुरडांची दुकानं म्हणजे टोपल्या, सुप वगैरे वस्तू विकणारी हो.. तर, संस्कृतमधल्या 'बुरड' म्हणजे 'टोपली' यावरून टोपली बनवणारा समाज म्हणजे 'बुरूड समाज' अशी भाषाशास्त्रीय उकल केली जाते! आणि तुम्हांला माहित आहेच, समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या दैनंदिन जीवनात बुरुडांच्या या वस्तूंनी किती महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे ते!
आज बोभाटा घेऊन आले आहे उस्मानाबादच्या त्या बाजारातल्या एका बुरुड कुटुंबानं दिलेली त्यांच्या व्यवसायाबद्दलची माहिती!! हे आहे पवार कुटुंब. श्याम मारुती पवार यांच्यासह, त्यांच्या आई कस्तुरबाई पवार, भावजय पद्मावती पवार यांची उस्मानाबादच्या आठवडी बाजारात दुकाने आहेत. श्याम पवार यांचे वडील मारुती पवार यांचा या वस्तू बनविण्याचा-विक्री करण्याचा परंपरागत व्यवसाय! त्यांच्या हयातीतच श्याम यांनी या वस्तू बनविण्याचे कौशल्य शिकून घेतले आणि आता तेच हा पारंपारिक व्यवसाय सांभाळतात. तसं इथे हे एकच दुकान नाही बरं.. पवारांच्या दुकानाशिवाय सुभाष वडतिले आणि सावंत यांचेही दुकान याच बाजारात आहे. वर्षभर बुरुडांच्या या वस्तूंना प्रचंड मागणी असते. यातील बहुतांश जणांची घरे उस्मानाबादच्या झोरे गल्लीत आहेत आणि आता अनेकांनी गावाच्या इतर भागात देखील घरे बांधली आहेत.

सूप आणि दुरडीचं रोजच्या आयुष्यातलं स्थान..
प्रत्येकाच्या घरात धान्य पाखडून स्वच्छ करण्यासाठी सूप लागतेच लागते! अन्नधान्याच्या स्वच्छतेशी संबधित असलेल्या सुपाशिवाय घर ही संकल्पनाच पूर्ण होत नाही. हल्ली पूर्वीसारखे शेतातून थेट धान्य आणले जात नसले आणि दुकानातून मिळणारा माल कितीही स्वच्छ म्हटला, तरी त्याला पाखडून घ्यावेच लागते. बांबूच्या पट्ट्यापासून बनवलेले सूप वजनाने हलके असते, त्यामुळे सफाईदारपणे हाताळता येते! कदाचित या हलकेपणामुळे 'भरल्या गाडीला सुपाच ओझं नसतं' हा वाक्यप्रचार रूढ झाला असावा!
सुपाचे धार्मिक महत्व देखील आहे! अनेक पूजाअर्चांच्या वेळी पूजेचे समान सुपातच ठेवले जाते. संक्रांत, दिवाळी, पाडवा अशा सणाच्या वेळी पूजेच्या वस्तू सुपातूनच आवर्जून नेल्या जातात. सूप हे धान्य स्वच्छ करण्याचे काम करत असल्यामुळे त्याला एक विशेष पावित्र्य आणि मांगल्य प्राप्त झालेले आहे, ते निव्वळ धार्मिक नाही, तर अन्नधान्य या स्वरूपात सांस्कृतिक ईहवाद ही अधोरेखित करणारे आहे. घरात एखादा वासुदेव, आराधी, नंदी बैलवाला किंवा मागतकरी आला की, त्याला धान्य वाढताना ते सुपातून वाढावे अशी प्रथा रूढ आहे. त्याला वाढलेल्या धान्यातला काही धान्य तो सुपात शिल्लक ठेवतो आणि ते धान्य पुन्हा आपल्या धान्याच्या साठ्यात टाकावे लागते! यामुळे धान्य वृद्धी होते असा एक समज प्रचलित आहे! एकंदर दातृत्वास महान मानलेल्या आपल्या प्राचीन संस्कृतीच्या प्रथा परंपरा आजही ग्रामीण भागात पाळल्या जातात , म्हणूनच सूप महत्वाचे मानले जाते!
सुपासोबत असते ती दुरडी अथवा लहान टोपली! आज प्रत्येक स्वयंपाक घरात चपात्या अथवा पोळ्या ठेवण्यासाठी पसरट डबा वापरला जतो. पण तुम्हांला माहित आहे, भाकरी ठेवण्यासाठी दुरडीसारखी कोणतीही इतर गृहोपयोगी वस्तू नाही. कारण दुरडीच्या साच्छिद्रतेमुळे भाकरीचा खरपूसपणा टिकून राहतो. शिवाय लग्नातील आहेर वा रुखवतात लाडू, कुरवड्या, वळवट, शेवया बुंदी ठेवण्यासाठी या टोपल्या अथवा मोठ्या दुरड्या वापरल्या जातात.

या वस्तूंच्या साधारण किंमती काय असतात?
श्याम पवार यांच्या दुकानातील दुरडी रु.३०/- सूप रु ८०/-त्यात रंगवलेले असेल तर रू १००/- , टोपली रू ५०/- रुपायला मिळते. ग्रामीण भागात सूप विकत घेवून ते शेणाने सारवून मगच वापरासाठी उपयोगात आणले जाते. आज बजारात प्लास्टिक चे सूप मिळतात मात्र वजनाने एकदम हलके असणा-या बांबूपासून तयार केलेल्या सुपातून धान्य जेवढे लवकर स्वच्छ होते, तेवढे प्लास्टिकच्या सुपातून होत नाही, हा अगदी माझ्या आईचा अनुभव आहे.
कसे बनतात सूप आणि दुरड्या ?
बांबू पासून सूप, दुरडी, टोपले बनविणे मोठे कष्टाचे काम आहे! कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी बांबूची बने आहेत. तिथून हे बांबू सोलापूरला येतात आणि मग त्यांची खरेदी होते. साधारणपणे एक बांबू १५० ते २०० रुपयांना मिळतो. ही किंमत प्रतवारीवर अवलंबून असते. सर्वप्रथम बांबूला तासून त्याच्या विविध आकाराच्या पट्टया तयार कराव्या लागतात. चटई बनविण्यासाठी मोठी पट्टी काढावी लागते, त्यासाठी वाळलेला बांबू चालतो. तर लहान वस्तू, दुरड्या, द्रोण, टोपल्या बनविण्यासाठी मऊ बांबू लागतो! कधी कधी बांबू खूप वळलेला असेल, तर त्याची पट्टी काढणे खूप अवघड असते. अशा वेळेला बांबू भिजत ठेवावा लागतो आणि मगच त्याच्या लहान मोठ्या पट्ट्या तयार करता येतात. बांबूंपासून विशिष्ट कोयत्याच्या सहाय्याने पट्टी बनविणे खूप कष्टाचे आणि जिकिरीचे काम असते. बांबूच्या पट्टीने कधी कधी हात चिरतो, बांबूच्या काड्या हातात घुसतात, दुखापतदेखील होते. हे सांगताना कस्तुरबाई पवार त्यांचा कष्टाने रापलेला हात दाखवत सांगतात, “सायब, पोटापाण्यासाठी हात चिरला काय अन् हातात काय घुसले तरीबी काम करावाच लागणार की! एकेक वस्तू बनवताना वेगवेगळ्या चार जनाच्या हातीतून जातीया, लई अवघड काम हाय हे" कस्तुरबाईंच्या घरातील सर्वच जण या वस्तुनिर्मितीच्या कामात व्यग्र असतात.
लहान मोठ्या पट्ट्या तयार केल्यावर त्याची विशिष्ट पद्धतीने गुंफण करून त्यापासून वस्तू बनविणे ही कला आहे आणि ती या समाजाने पारंपारिक पद्धतीने पिढी दर पिढी जपली आहे.

उस्मानाबादच्या आठवडी बाजारातील ७ ते ८ दुकानदारांपैकी श्याम पवार आणि आणखी दोघे तिघेजण आजूबाजूच्या शहरातील आठवडी बाजारात देखील आपले दुकान मांडतात. शिवाय झोरे गल्ली, नेहरू चौकात देखील नेहमी दुकान थाटलेले असते. आठवडी बाजारात एका दिवसाला अंदाजे १००० ते ११०० रुपयाची विक्री होते, त्यातले ६०० ते ७०० रुपये आम्हाला मिळतात, अशी माहिती श्याम पवार यांनी सांगितली. काहीजणांना या वस्तू बनवता येत नाहीत, ते लोक इतर बुरुड लोकांकडून अशा वस्तू विकत घेतात आणि गावोगावी बाजारात जावून विकतात. पद्मावती पवार यांचे दुकान असेच आहे. त्या वस्तू खरेदी करून विकतात.
बुरूड समाजाचं समाजजीवन-
बुरुड समाजाची प्रमुख देवता तुळजाभवानी आहे. मात्र अनेकजण खंडोबा या लोकदेवतेसही पूजतात. हा समाज महात्मा बसवेश्वरांचे सहकारी संत 'केतय्या स्वामी' यांना पूज्य आणि वंद्य मानतो. दरवर्षी त्यांची जयंती १० डिसेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.
कर्नाटकात आणि महाराष्ट्रात-सोलापूर भागात या समाजाची मोठी संख्या आहे. पण समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. "जुन्या पिढीत ते अत्यंत कमी होते, मात्र आमची पिढी दहावी-अकरावीपर्यंत शिकली आणि पुन्हा याच कामात गुंतली " अशी खंत श्याम पवार यांनी व्यक्त केली. पण ते पुढे म्हणाले की “पण आता आमच्या समाजाला शिक्षणाचे महत्व कळले आहे, समाज शिकतोय! माझा मुलगा, मुलगी दोघेही शाळेत जातात अन् त्यांना खूप शिकवणार आहे! "

बुरुड समाजास घांचे, बांसफोड या नावानेही ओळखले जाते. यांच्यात मराठी भाषा बोलणारे बुरुड आणि 'मेडर' किंवा 'लिंगायत बुरुड' असे प्रमुख दोन भेद मानले जातात. महाराष्ट्रात या समाजातील आडनावे मात्र पूर्णतः मराठा समाजातील आडनावाप्रमाणे आहेत. पवार, सुपेकर, सुरवसे, मोरे, सावंत, मोहिते या नावासोबातच वडतिले, घोणे ही देखील नावे आढळतात.
भारतीय संस्कृतीकोशातील माहितीनुसार बुरुड समाज हा मुळात मराठा समाजाचाच भाग आहे. या समाजाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते- शिव पार्वती यांच्या लग्नात शिवशंकराने पाच वेगवेगळ्या बांबूपासून पार्वतीच्या पुजेसाठी सूप बनविण्यासाठी सांगितले होते, ते काम या समाजाने पूर्ण केले नाही म्हणून त्यांना बहिष्कृत केले गेले. अर्थात ही अख्यायिका आहे, मिथकांचा अर्थ लावणे अभ्यासकांची जवाबदारी आहे. बुरुड समाजात आडनाव हेच कुल समजले जाते, म्हणजे पवार-पवार, मोरे-मोरे यांच्यात विवाह होत नाही!
एकंदर निरीक्षणातून असे आढळून आले की, बुरूड समाजातील केतय्या स्वांमीची भक्ती ही कालौघात इतर वंद्य पुरूषाच्या अभावामुळे स्वीकारलेली आढळून येते. कारण या समाजात लिंगायत संप्रदायातल्या प्रथा व परंपरांचा अभाव जाणवतो. विवाह पद्धती आणि त्यातील विधी, इतर रूढी महाराष्ट्रातील इतर समाजाप्रमाणेच असून उस्मानाबादमधील बुरूड समाजात मृत्युनंतर दहन केले जाते.

बुरुड समाज अनुसूचित जाती या प्रवर्गात येतो. मात्र आजपर्यंत या सुविधेचा वापर या समाजाने कधीच करून घेतलेला नाही असे दिसते. कारण सरकारी शिक्षणात आणि स्वाभाविकपणे नोकऱ्यांत यांचे प्रमाण अत्यल्प आहे. पारंपारिक व्यवसायात मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे आणि त्यातच समाधानी होवून राहिल्यामुळे शिक्षणाची निकड निर्माण झाली नाही. हे अनेक समाजाचे वास्तव आहे, त्यास बुरुड समाज अपवाद नाही. उस्मानाबादसारख्या निम्न शहरी वा ग्रामीण भागातील बुरूड समाजाची ही अवस्था असली तरी शहरी भागातील बुरूड समाज सुधारलेला असून त्यांनी बुरूड समाजाच्या वेबसाईट आणि फेसबुक ग्रुपही स्थापन केले आहेत.
बुरुड, हा अतिशय प्रामाणिक आणि कष्टकरी समाज म्हणून ओळखला जातो. सुपे, दुरड्या, टोपली, सोबत कांही ठिकाणी चटई, तात्पुरत्या निवा-यासाठी लागणारे छत अथवा कुंपण, बांबूच्या खुर्च्या, पंखे देखील हे लोक बनवतात आणि विक्री करतात! शिवाय उन्हाळ्याच्या काळात लोणच्याचे आंबे फोडून देण्याचे देखील काम करतात. या वस्तूंसोबतच गुढी उभारणीसाठी सरळ बांबू, मोठ्या बांबूपासून शिडी बनविणे, अंत्यविधीच्या वेळी लागणाऱ्या बांबू, कामट्या, आणि पट्ट्या यांची विक्री करणे अशी कामे केली जातात !
हा समाज आपली सांस्कृतीक ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून शिक्षित देखील होत आहे. नुकतेच उस्मानाबादेत या समाजाने स्वतःच्या समाजाच्या उन्नतीसाठी 'बुरुड समाज मंडळ' स्थापन केले आहे. शिवाजी घोणे हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत तर माझे स्नेही तानाजी सावंत यांचे पुतणे सतिष सावंत हे शहराध्यक्ष आहेत. समाज मेळावा, रक्तदान शिबीर या सारखे उपक्रम राबवले जात आहेत. महाराष्ट्रातील सर्वच जातींप्रमाणे बुरुड समाजदेखील विविध माध्यमातून आपली जातीय अस्मिता प्रदर्शित करत आहे. प्रचलित समाजव्यवस्थेचे लाभ घेणारे उच्चवर्गीय-वर्णीय जातीचे लोक आपल्या अस्मितांना प्रदर्शित करत असताना , बुरूडांसारख्या उपेक्षित समाजाने स्वत:च्या उन्नतीसाठी संघटीत होणे सकारात्मक म्हणावे लागेल!
लेखक : राज कुलकर्णी.




