सैराट हा शब्द तुम्हाला नवीन वाटतो? मग तुम्ही तुकारामांचे अभंग नक्कीच वाचले नाहीत..

सध्या सैराट सिनेमाची झिंग संपूर्ण महाराष्ट्रावर दिसून येत आहे. कोटींची उड्डाणे घेणारा हा सिनेमा चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कारणांनी गाजला. त्यातील आर्ची आणि परश्या तर अनेकांना जवळचे वाटलेच पण सैराट या नावाने सुद्धा माणसांच्या मनावर जादू केलेली दिसून येते. ’सैराट’ शब्दाचा अर्थ होतो सुसाट, बेभान, सैरभैर. अनेकांच्या मते हा शब्द त्यांनी पहिल्यांदाच वाचला आहे पण सैराट या शब्दाचे संदर्भ आपल्याला थेट तुकारामांच्या अभंगांपर्यंत घेऊन जातात. तुकोबांनी आपल्या अनेक अभंगांमधून या शब्दाचा वापर केलेला दिसून येतो. त्यातीलच एक अभंग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

गाथा अभंग ४२३

पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥

दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी ।अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥

हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी । कीर्ति हे संतां मुखीं । तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥२॥

या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय । भीक नाहीं खंडणा । पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥३॥

काय मी चुकलों गा । मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं । मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥४॥

दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी होतें । हें चि कारण । दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥५॥

 

अर्थ :- देवा, मी अपंग झालो आहे. मला हातपायही नाहीत.  मी ज्यावर  विसंबून आहे ते मन सैरावैरा धावत आहे.  ते सैराट मन कुंपणाला, काटयाला खेटत आहे. खूंट-दरडी यांचाही विचार ते करीत नाही. अशा परिस्थितीत मला आई-बापांसह कोणाचाच आधार नाही ।।1।।

पंढरीला जाणाऱ्या दात्यांनो,  मला मदत करा. मला पंढरपुरापर्यंत न्या.  तिथे सार्‍या अक्षम दीनदुबळ्यांचा सोयरा बसला आहे.   ।।ध्रु।।

मी दारोदारी आणि गव्हाणींचे हेलपाटे घालून शिणलो आहे. पण मदत करणारा आणि जन्मभराचे दु:ख निवारणारा कुणी दाता  भेटला नाही. मी संतांच्या मुखाने ज्याची किर्ती ऐकली आहे, तो हरी मला भेटवा. अंपगासही पाय देणारा तो देव पंढरपुरात वसत आहे. ॥२॥  म्हणूनच पंढरीला जाणाऱ्या दात्यांनो,  मला मदत करा. मला पंढरपुरापर्यंत न्या.  तिथे सार्‍या अक्षम दीनदुबळ्यांचा सोयरा बसला आहे.   ।।ध्रु।।

या पोटापायी माझ्या भीक मागण्यास खंड पडत नाही. पण त्यामुळे सारे लोक माझ्यापासून पांगत आहेत. पुढारी नुसती आश्वासने देतात पण त्यांना माझी दया येत नाही. बरेचदा कुत्रीही माझ्या मागे लागतात. असे असूनही मला  ( हे सारे संपेल अशी) उदंड आशा  आहे. ॥३॥ म्हणूनच, पंढरीला जाणाऱ्या दात्यांनो,  मला मदत करा. मला पंढरपुरापर्यंत न्या.  तिथे सार्‍या अक्षम दीनदुबळ्यांचा सोयरा बसला आहे.   ।।ध्रु।।

मी चुकलो माकलो असेन, माझ्यामध्ये न्यूनही असेल. मला पापपुण्याचा व्यवहार कळत नाही, तेव्हा त्याची आठवणही कशी राहावी? दिव्यावरच्या पतंगासारखा मी भौतिक सुखाला भुलून गेलो. माझी चूक पदरात घेऊन संतमहंतांनी मला जीवदान द्यावे. ॥४॥ आणि त्यासाठीच पंढरीला जाणाऱ्या दात्यांनो,  मला मदत करा. मला पंढरपुरापर्यंत न्या.  तिथे सार्‍या अक्षम दीनदुबळ्यांचा सोयरा बसला आहे.   ।।ध्रु।।

तुकोबा म्हणतात, मी इथवर खूप दुरून आलो आहे. जगण्याचे मला अतीव दु:ख झाले आहे. इथवर येण्याचे हेच कारण होते. तुमच्या (संतमहंत, दानी) लोकांच्या भेटीगाठी होणं हे खूप दुर्लभ आहे. पण आता तुमचे चरण मला दिसले आहेत.॥५॥ मी तुम्हाला विनंती करत आहे, की पंढरीला जाणाऱ्या दात्यांनो,  मला मदत करा. मला पंढरपुरापर्यंत न्या.  तिथे सार्‍या अक्षम दीनदुबळ्यांचा सोयरा बसला आहे.   ।।ध्रु।।

सबस्क्राईब करा

* indicates required