एसी लोकलमधून विनातिकिट प्रवास करायचाय ? आधी जाणून घ्या किती दंड भरावा लागेल ते...
एसी लोकल ट्रेनच्या निमित्ताने मुंबईकरांना ख्रिसमसचं गिफ्ट मिळालं आहे. एसी लोकलने गारेगार प्रवास करणं सुखकर तर आहेच, पण लोकल आली तेव्हा अनेकांनी वेगवेगळ्या शंका विचारल्या होत्या. या ट्रेनमध्ये पण लोक पान खाऊन थुंकतील का? हिची अवस्था देखील लोकलसारखी होईल का? बाबा बंगाली आणि सगळ्या तसल्या जाहिराती चिकटवणार का? यात सुद्धा लोक विना तिकीट प्रवास करतील का ?
मंडळी यातील शेवटची शंका खरी ठरली आहे. माणसं सुधारणार नाहीत म्हणतात ना, ते हेच. एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणारा पहिला प्रवासी कालच सापडला आहे. त्याचा खरं तर शाल नारळ देऊन सत्कार व्हायला हवा होता, पण त्याच्याकडून ४३५ रुपयांचा दंड घेऊन त्याला सोडून टाकण्यात आलं. हा माणूस चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करत होता.
४३५ पैकी १६५ रुपये रेल्वेचं तिकीट, २५० रुपये दंड, १० रुपये CGST, १० रुपये SGST. अश्या प्रकारे पहिल्या चिटरला दंड बसला आहे.
मंडळी, यावरून नवी शंका अशी येत की थोड्याच दिवसात एसी लोकलमध्ये पानाची पिचकारी पडलेला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल व्हायला वेळ लागणार नाही!!




