'हा सैतान बाटलीत मावणारा नाय'...२०१८ गाजवायला आलाय 'आपला मानूस' !!
अजय देवगण आणि मराठीचं नातं तसं खूपच जवळचं आहे. त्याने लग्न केलं तेही एका मराठी मुलीशी. म्हणजे आपल्या तनुजा समर्थांची लेक राव!! त्याने बाजीराव सिंघम पेश केला तोही मराठी मातीतला. राहतो देखील महाराष्ट्रात. आता एवढं सगळं मराठी असताना त्याने मराठी सिनेमा बनवावा हे काही विशेष वाटत नाही. तरी हा सिनेमा खास आहे राव.

सिनेमाचं नाव आहे ‘आपला मानूस’. मुख्य भूमिकेत नाना पाटेकर, सुमीत राघवन आणि इरावती हर्षे असणार आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांच्यासारख्या भक्कम दिग्दर्शकावर आहे. एकंदरीत टीम एकदम जबरदस्त आहे राव. अजय देवगणची निर्मिती सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन आणि खुद्द नाना मुख्य भूमिकेत आहेत म्हटल्यावर उत्सुकता वाढणारच...
या सिनेमाचा पहिला वाहिला पोस्टर बघून तर ही उत्सुकता आणखी वाढेल. या पोस्टरमध्ये नाना भर पावसात बाईक चालवताना दिसत आहेत. याशिवाय पोस्टरवर लिहिलेलं ‘हा सैतान बाटलीत मावनारा नाय’ हे वाक्य विशेष लक्ष वेधून घेतं.
अजय देवगणचा हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. चित्रपटात नेमकं काय असेल हे ९ फेब्रुवारीला समजेलच. पण सध्या असा प्रश्न पडला आहे की चित्रपटचं नाव ‘आपला माणूस’ नसून ‘आपला मानूस’ का आहे ? याला म्हणतात ‘ण’ चा ‘न’ करणं!!




