बाबो हे काय, चक्क वाळवंटात बर्फ पडतोय....फोटो बघून घ्या राव !!
याला म्हणतात ग्लोबल वॉर्मिंगचा फटका आणि निसर्गाचा झटका. मंडळी, आपल्याकडे दिवाळीत पाऊस पडला, डिसेंबर मध्ये पाऊस पडला, मग वर्ष सरल्यावर लोक म्हणू लागले ‘या वर्षातली थंडी लय भयानक हाय ?’...पण हे सगळं का ? तर जागतिक तापमानवाढीमुळे. हे इथवर ठीक होतं पण आता तर कहरच झाला राव. चक्क सहारा सारख्या जगातील सर्वात मोठ्या वाळवंटात बर्फ पडत आहे.
तुम्हाला माहित असेलच सहारा हे जगातील सर्वात मोठं उष्ण वाळवंट आहे. तिथलं साधारण तापमान हे ३८ अंश डिग्री एवढं असतं आणि काहीवेळा ते ४० ते ४५ डिग्री एवढं प्रचंड वाढतं. हे वाळवंट आफ्रिकेतील १० देशांमध्ये पसरलं आहे. त्यातील अल्जेरिया या देशातल्या एन-सेफ्री या भागात तब्बल ४० वर्षात चौथ्यांदा पुन्हा बर्फवृष्टी झाली आहे. १९७९ मध्ये पहिल्यांदा बर्फवृष्टी झाली त्यानंतर २०१६, २०१७, २०१८ असे ३ वर्ष इथे अधून मधून बर्फ पडतोय पण यावेळी झालेल्या बर्फवृष्टीमुळे तब्बल १६ इंच बर्फाचा थर जमा झाला आहे. साधारणपणे जगातल्या ज्या भागात दरवर्षी बर्फ पडतो त्याच प्रमाणात या भागात बर्फ पडला आहे.
तर, आता प्रश्न असा आहे की जागतिक तापमानवाढ निसर्गाचे नियमच बदलून ठेवेल का ? खरं तर ही धोक्याची घंटा अनेक वर्षापासून वाजत आहे. काही वर्षांपासून अंटार्क्टिका खंडावरचं बर्फ वितळत असल्याचं सांगितलं जात होतं आणि आता चक्क वाळवंटात बर्फ पडत आहे. याचा अर्थ काय ?
मंडळी जास्त चिंता करू नका, भविष्याच्या चिंतेने आजचा दिवस खराब व्हायचा. त्यापेक्षा तुम्ही खालील फोटो बघून घ्या. या वाळवंटातील बर्फाने काही अफलातून दृश्ये दिली आहेत राव.











