...आणि शेरवानीने घात केला !! वाचा दोन लग्नात एकच कपडे वापरून कसा अडकला नवरदेव !!

लग्नात कोणते कपडे घालावे यावर संपूर्ण ग्रंथ लिहिला जाऊ शकतो राव. कारण या दिवशी घातलेल्या कपड्यांवर आपल्या लग्नाचे यादगार फोटो काढले जाणार असतात आणि या महत्वाच्या क्षणी आपण चांगलं दिसलंच पाहिजे. आयुष्यात एकदाच सेलिब्रिटी होता येतं आणि ते म्हणजे आपल्या लग्नात मग आपण हिरो दिसलोच पाहिजे ना भाऊ ?

तर, आज आपण एका नवरदेवाची गोष्ट वाचूयात. या माणसाच्या लग्नाच्या शेरवानीने त्याच्या अनमोल क्षणांवर पाणी ओतलं.

मालाडमधल्या मालवणी भागात राहणाऱ्या सोहेल सय्यद नावाच्या तरुणाचं नुकतंच लग्न झालं. लग्न पार पडून सगळे आपापल्या घरी गेले. सगळं शांत झालेलं असताना रात्री २च्या सुमारास त्याच्या घराचं दार ठोठावण्यात आलं. बाहेर त्याचे नवे सासरे उभे होते. सासऱ्यांनी त्याला आपल्या मोबाईलवर एका ‘अनोळखी’ माणसाने पाठवलेला फोटो दाखवला. त्या फोटोमध्ये सोहेल एका मुलीबरोबर उभा होता. फोटोत त्याच्या अंगावर असलेली शेरवानी आणि आजच्या लग्नात त्याने घातलेली शेरवानी सारखीच होती.

स्रोत

यामागची कहाणी अशी की, सोहेल सय्यदने ६ महिन्यांपूर्वी आपल्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न उरकलं होतं, पण याबाबतीत त्याने आई वडिलांना खबर लागू दिली नव्हती.  कारण अर्थातच त्यांचा या लग्नाला विरोध होता. आश्चर्य म्हणजे जेव्हा आई वडिलांनी अधिकृतरीत्या त्याचं लग्न लावण्याचं ठरवलं, तेव्हा त्याने आपल्या आधीच्या लग्नाबद्दल चकार शब्द काढले नाहीत. अश्या प्रकारे त्याचं दुसरं लग्न झालं.
सोहेलचे सासरे मुलीला सासरी पाठवून घरी येत असताना त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शुभेच्छांचे मेसेजेस बघितले. यात एका अनोळखी माणसाकडून आलेला एक फोटो होता ज्यात त्यांचा जावई दुसऱ्याच मुलीबरोबर उभा असलेला दिसला आणि तेही त्याच कपड्यांमध्ये. यानंतर त्यांनी आपल्या जावयाला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं.

पोलिसांनी यावर कार्यवाही न करता हा अदखलपात्र गुन्हा असल्याचं ठरवून सोहेलला मोकळं केलं. यावर सासऱ्यांनी स्थानिक भाजप नेत्याच्या मदतीने पोलिसांकडून सोहेलविरुद्ध एफआयआर नोंदवून घेतला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. एफआयआर नोंदवून कार्यवाही होईपर्यंत सोहेल आणि त्याचे कुटुंबीय पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

सध्या सोहेल सय्यद आणि त्याच्या कुटुंबियांचा शोध सुरु आहे.

यातून काय शिकलो ? लग्न कितीही वेळा केलं तरी कपडे वेगवेगळे घाला राव.....खिक !!

सबस्क्राईब करा

* indicates required