कोण होते 'बाबा आमटे' ? जाणून घेऊया एका सामाजिक कार्यकर्त्याच्या नजरेतून !!

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज पुण्यतिथी. बाबांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी सांगण्यासारखं बरच काही आहे, पण ते जर त्यांच्याच क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीने सांगितलं तर ते अधिक योग्य ठरेल म्हणून आज बाबा आमटे यांच्या बद्दल सांगत आहे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेला आमचा मित्र किशोर.

चला तर जाणून घेऊया बाबा आमटेंना :

स्रोत

2011 सोमनाथ शिबिर, आनंदवन व कुष्ठरोगी पाहिले आणि भारावून गेलो, अस्वस्थ झालो. काय ही किमया !! हात झडलेली बोटं नवनिर्मिती करत होती, पायाने लंगडा असलेला प्रयत्नाने धावताना पाहिला, हात निकामी झालेल्या शकुंतलाला पायाने शुभेच्छा पत्रक बनवताना पाहिलं. कुष्ठरुग्णच नाही तर, अंध अपंग, मूकबधिर, कर्णबधीर सर्वच दिव्यांगाना आनंदात पाहिलं आणि कळलं की हे खऱ्या अर्थाने "आनंदवन" का आहे. बाबांच्या समाधीजवळ गेल्यावर तर त्या आनंदाचा मुख्य स्त्रोत अनुभवला. तिथे वेगळीच ऊर्जा होती.

आज मी थोडक्यात बाबांना तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

आदरणीय लक्ष्मीबाई आमटे आणि देविदास आमटे यांच्या घरात २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका अवलिया लेकराचा जन्म झाला. त्याचं नाव होतं मुरलीधर देविदास आमटे. आताचे आपले बाबा आमटे. देविदास आमटे त्या काळचे मोठे जमीनदार होते. खरंतर असं म्हणतात की जी मुलं श्रीमंतीमधे वाढतात, ती पैशाने माजतात. पण मुरलीधर हा लहानपणापासूनच एक वेगळंच रसायन होतं.

स्रोत

देविदास आमटे म्हणजे बाबांचे वडील त्याच्यांवर चिडत. कारण लहानपणापासूनच ते इतर मुलांपेक्षा वेगळे होते विचारांनी आणि आचाराने पण. आईचा मात्र लाडका होता मुरलीधर. तो आईला  कामात मदत करत असे. मुरलीधरला दिवाळी फार आवडायची. दिवाळीचीच एक घटना त्याचे विचार बदलून टाकणारी ठरली. त्याने त्याच्या बाबांकडून खूप पैसे घेतले आणि फटाके घेण्यास गेला. तो आता दुकानाची पायरी चढणार तोच त्याची नजर तिथंच, दुकानाच्या पायरीजवळ बसलेल्या एका आंधळ्याकडे गेली. तो भिकारी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे दीनवाणेपणाने याचना करत होता. माणसं येत होती, शेकडो रुपयांचे फटाके खरेदी करत होती. पण कुणीही चार पैसे त्या भिकाऱ्याच्या वाडग्यात टाकत नव्हते. मुरलीधरला वाईट वाटलं, त्याला त्या भिकाऱ्याची दया आली. त्याच्यासाठी काहीतरी करावं, असं त्याला अगदी मनापासून वाटलं. त्यानं पटकन खिशात हात घातला.

"नाही तरी फटाके उडवून काय मिळणार आहे मला ? थोडीशी मज्जा; पण नंतर सगळा धूरच. त्यापेक्षा याला पैसे दिले, तर कित्ती बरं वाटेल त्याला,' असा विचार करून त्यानं ते सगळे पैसे त्या आंधळ्याला देऊन टाकले!  हा लहानपणीचा किस्सा ते भविष्यात काय घडवून आणतील याचा जणू छोटासा ट्रेलर होता.

मुरलीधरला लहानपणी वाटत होतं की आपण डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी.  पण वडलांच्या सांगण्यावरून त्यांनी वकिली केली. बाबांना कुस्तीचा खूप शौक होता. तरुणपणी त्यांचं शरीर बळकट होतं. एकदा तर म्हणे कुस्तीत मेडल जिंकले आणि ते चक्क स्वतः च त्यांच्या उघड्या छातीवर टोचून घेतल....असा हा मुरलीधर होता.

स्रोत

एक काळ रात्र अशी आली जी मुरलीधरला महामानव बाबा आमटे बनवून गेली. जोरदार पाऊस होता, विजेचा कडकडाट होत होता. मुरलीधर घराकडे परतत होता. एका कोपऱ्यातून कोणी तरी वेदनेनं विव्हळत होतं. मुरलीधर त्या आवाजाच्या दिशेनं गेला आणि त्याला दिसला हातापायाची बोटं झडलेला विद्रूप शरीराचा एक माणूस. त्याच्या शरीराला वास सुटला होता, दुर्गंधी पसरली होती. हे पाहून मुरली घाबरला, दचकला आणि पळत सुटला. दूरवर जाऊन अचानक थांबला आणि स्वतः च्या मनाशी बडबड करू लागला की तोही एक "माणूस" आहे आणि त्याच्या जागी आपण असतो तर??? त्याला आपली गरज आहे. तो तडक मागे फिरला आणि त्याने त्या माणसाची प्रेमाने विचारपूस केली.

त्या वेळी मुरलीधरला माहीत नव्हतं की हा कुष्ठरोगी आहे आणि ज्या वेळी कळलं तेव्हा बाबांनी कुष्ठरोगाचा अभ्यास सुरू केला आणि इथूनच मुरलीधरचा प्रवास बाबा आमटे बनण्याच्या दिशेने सुरु झाला.
एक लंगडी गाय, बाबांच्या पत्नी साधनाताई आमटे, दोन लहान मुलं विकास आणि प्रकाश आणि सोबत सात कुष्ठरोगी घेऊन बाबांनी वरोराच्या जंगलात 1951 साली एक नवीन विश्व उभारले. त्याचं नाव "आनंदवन" संस्था. "महारोगी सेवा समिती". 14 रुपयेपासून सुरू झालेला हा प्रवास आज खूप मोठ्या टप्प्यावर पोहचला आहे. तरी बाबांच्या स्वप्नांना अजूनही झोप नाही. ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांची दोन अनमोल रत्नं अहोरात्र कष्ट घेत आहेत. एक आदरणीय विकास आमटे ज्यांनी आनंदवनचा भार स्वीकारला आणि दुसरे आदरणीय डॉ. प्रकाश आमटे ज्यांनी हेमलकसामधल्या आदिवासींसाठी आपल जीवन अर्पित केलं आहे.

हा खडतर प्रवास वाचायचा असेल तर आदरणीय साधना ताई आमटेंचं "समिधा"हे पुस्तक वाचावं. बाबांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खूप पुरस्कार मिळाले.  हे बाबांपेक्षा त्या पुरस्कारांचाच मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. कारण बाबांच्या कार्याला तोड नाही. महात्मा गांधीनी बाबांना अभय साधक म्हणून संबोधलं होतं.
लिहावं तितकं कमी आणि बाबांविषयी वाचावं तितकंकमी...

 

लेखक :

किशोर (मानव)

9167759492

सबस्क्राईब करा

* indicates required