computer

तुम्हांला माहित आहे, लिपस्टिक चक्क ५००० वर्ष जुनी आहे. वाचा तिचा इतिहास...

मंडळी ‘कथा जन्माची’ या सिरीजमधल्या नव्या आणि फ्रेश लेखात तुम्ही वाचणार आहात ‘कथा लिपस्टिकची’.

आजच्या काळात स्त्रीच्या सौंदर्यात चार चांद लावण्यासाठी लिपस्टिक वापरली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, लिपस्टिकची कल्पना आली कशी याचा? तिचा वापर कधी सुरु झाला आणि आजच्या काळात जी लिपस्टिक वापरली जाते ती किती वर्षांपूर्वीची आहे? नाही माहित? चला मग जाणून घ्या..

चला तर, आज कथा जन्माचीमध्ये वाचूयात लिपस्टिकबद्दल रंजक माहिती.

सुमेरियन संस्कृती

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सुंदर दिसण्यासाठी ओठ रंगवण्याची सुरुवात जवळजवळ ५००० वर्षांपूर्वी झाली होती. असं म्हणतात की सुमेरियन संस्कृतीतले स्त्री-पुरुषांनी ओठांना रंगाने आकर्षक बनवण्याची सुरुवात केली. डोळ्यांचा भाग आणि ओठ रंगवण्यासाठी ते लोक ‘रत्न’ वापरत. त्या काळी रत्नांचा चुरा करून तो ओठांवर लावण्यात येत असे.

आजच्या काळात जसं लोकांमध्ये उठून दिसण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तसंच त्याकाळातील लोक इतरांमध्ये आपण वेगळे दिसावं म्हणून प्रयत्न करायचे. त्या काळात लिपस्टिक हे प्रतिष्ठेचं प्रतिक होतं.

इजिप्शियन संस्कृती

लिपस्टिकला खरं रूप मिळालं ते इजिप्शियन संस्कृतीमध्ये. जांभळ्या, काळ्या आणि लाल रंगांचा वापर ओठ रंगवण्यासाठी करत आणि त्यासाठी इजिप्शियन लोक वेगवेगळ्या पद्धती वापरत. एका विशिष्ठ प्रकारच्या किटकाला चिरडून त्यापासून लाल रंग तयार करण्यात येत असे. आज आपल्याला किळस वाटू शकते, पण खुद्द इजिप्तची राणी ‘क्लिओपात्रा’ सुद्धा कीटक आणि मुंग्यांपासून तयार करण्यात आलेल्या लिपस्टिकचा वापर करायची. तसंच इजिप्तमध्ये शिसे, ब्रोमिन मॅनसाइट आणि आयोडिन अशा घातक पदार्थांपासून देखील लिपस्टिक तयार करण्यात येई. यांच्या वापरातून अनेकांना यात जीव गमवावा लागला. 

 

इजिप्शियन संस्कृती प्रमाणे इसवीसन पूर्व ३००० ते १५०० काळात सिंधू संस्कृतीतील स्त्रिया देखील सुंदर दिसण्यासाठी ओठांना लाल लाल रंग लावत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.  

लिपस्टिक आणि मध्ययुगीन समजूत

मध्ययुगीन युरोपात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यानंतर लिपस्टिक ही निषिद्ध केली गेली. त्याकाळी अशी समजूत होती की ओठांना लिपस्टिक लावणारी स्त्री ही चेटकीण असते आणि ती सैतानाची पूजा करते. या थोतांडापासून फक्त वेश्या सुटलेल्या होत्या. वेश्यांना वगळता कोणीही लिपस्टिकचा वापर करत नसे.

पण मंडळी, समजूत काहीही असली तरी माणसं त्या गोष्टीला सोडत नाहीत. त्याकाळातील सामान्य स्त्रिया ओठांना लाल रंग यावा म्हणून ओठ रगडत, खरडत किंवा अन्य पर्याय अवलंबवत. त्यामुळे कित्येकदा त्यांना  इजा पोहोचत असे.

आधुनिक जगातील लिपस्टिक

१८८४ साली ‘Guerlain’ या फ्रेंच परफ्यूम कंपनीने पहिल्यांदा लिपस्टिक बाजारात आणली. ही लिपस्टिक बनवण्यासाठी हरणाची चरबी, मेण आणि एरंडेल तेलाचा वापर केला होता. पण आजच्या काळात जशी लिपस्टिक मिळते तशी लिपस्टिक अस्तित्वात यायला अजून बराच काळ लागणार होता.

लिपस्टिकची ट्यूब फिरवली की लिपस्टिकचं आतील टोक बाहेर येतं ही कल्पना पहिल्यांदा मांडली ती ‘मौरीस लेव्ही’ या उद्योजकाने. हे वर्ष होतं १९१५. त्याने धातूच्या नळीत बसवलेली २ इंच आणि ५ सेंटीमीटर आकारातील लिपस्टिक बाजारात आणली. लिपस्टिक वापरण्याची ही साधी सरळ पद्धत स्त्रियांना पसंत पडली. लिपस्टिक खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली ती अभिनेत्री, कलाकार, प्रतिष्ठित स्त्रियांनी वापरल्यामुळे. सिनेमा आणि इतर माध्यमांमधून लिपस्टिकचा अप्रत्यक्षपणे प्रसार झाला. 

तर मंडळी,  अशा पद्धतीने लिपस्टिकच्या मागे तब्बल ५००० वर्षांचा इतिहास आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required