दिनविशेष: राज कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची काही गाणी

रणबीरराज पृथ्वीराज कपूर असं भारदस्त नांव असलेल्या अवलियाच्या उल्लेखाशिवाय भारतीय सिनेमाचा इतिहास अपूर्ण आहे. वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी सिनेमात पदार्पण केलं. पण ते हिरो झाले ते १९४७ सालच्या ’नीलकमल’ सिनेमात. एका वर्षातच ’आर. के. फिल्म्स’ची स्थापना करून ते त्या काळचे सर्वात कमी वयाचे दिग्दर्शक बनले. ’शो-मन ऑफ फिल्म इंडस्ट्री’ असं त्यांना ओळखलं जातं.
आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाहूया काही गाणी... काहीच गाणी जरी म्हटलं तरी ती निवडणंही अवघड काम आहे. तुम्ही सांगा तुम्हाला राज कपूर यांची कोणती गाणी तुम्हाला आवडतात ते..
आवारा- १९५१
या सिनेमातलं ’घर आया मेरा परदेसी’ हे पहिलंवहिलं स्वप्नगीत आहे. या सिनेमातली गाणी रशियातही गाजली होती.
दिल का हाल सुने दिलवाला- श्री ४२०(१९५५)
या सिनेमातली सगळीच गाणी गाजली.”रमैय्या वस्तावैय्या’ आणि ’प्यार हुआ इकरार हुआ’ शिवाय गाण्याच्या भेंड्या कधीच पूर्ण होत नाहीत. झालंच तर, ’इचक दाना बिचक दाना’ , 'मेरा जूता है जापानी' आहेच.
जहॉं मैं चली जाती हूं- चोरी चोरी(१९५६)
हा कठपुतळ्यांचा नाच एक वेगळाच प्रयोग होता. ’रोमन हॉलीडे’वरून घेतलेल्या सिनेमातली ’ये रात भीगी भीगी’, ’आजा सनम मधुर चॉंदनी में हम’ ही गाणी ही तितकीच सुमधूर आहेत.
किसीकी मुस्कराहटोंपे हो निसार- अनाडी (१९५९)
राज कपूर यांची गाणी बरेचदा आयुष्याची फिलॉसॉफी सांगतात. मग ते हे गाणं असो वा ’सब कुछ सीखा मैंने’ असो.
रूक जा ओ जानेवाली रूक जा-कन्हैय्या(१९५९)
गाण्याच्या भेंड्यांमध्ये हटकून येणारं हे एक आणखी गाणं. हे गाणं एका दारूच्या बाटलीला उद्देशून आहे हे मात्र खूपच कमी लोकांना माहित असेल.