जखमी चपलांच्या हॉस्पिटलमध्ये आनंद महिंद्रा का गुंतवणूक करत आहेत?

काही वर्षांपासून एक फोटो सोशल मिडीयावर फिरतोय. त्या फोटो मध्ये एक चप्पल शिवणाऱ्या माणसाच्या मागे “जखमी जुतों का हस्पताल.” लिहिलेलं दिसत आहे. हा फोटो इंटरनेटवर फिरत असताना तो जाऊन पोहोचला आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत.
या भन्नाट जाहिरातीवर ते म्हणाले, “हे डोकं एखाद्या मॅनेजमेंट शिकवणाऱ्या व्यक्तीचं असावं.” ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी चक्क या फोटोमधल्या माणसाला शोधून काढलं. पुढे काय झालं ते पाहूया.
या व्यक्तीचं नाव आहे नरसिराम. त्यांनी स्वतःच्या दुकानाला हॉस्पिटल ठरवण्याबरोबरच स्वतःच्या नावापुढे डॉक्टर सुद्धा जोडलं आहे. पुढे त्यांनी लिहिलंय, ‘हे दुकान २ ते ६ पर्यंत उघडं राहील आणि इथे जर्मन पद्धतीने चपलांवर इलाज केला जाईल.’
या भन्नाट जाहिरातीमुळेच त्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. आनंद महिंद्र यांनी हा फोटो पाहिल्यानंतर आपल्या टीमला नरसिरामच्या शोध मोहिमेवर पाठवलं. त्यांनी इतरांना देखील नरसिरामबद्दल माहिती सांगण्याची विनंती केली होती. ट्विटरवरून नरसिराम यांना मदत करण्याची इच्छा आनंद महिंद्र यांनी बोलून दाखवली.
थोड्याच दिवसात नरसिराम यांचा पत्ता लागला. महिंद्रा कंपनीची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली. आनंद महिंद्रा यांनी स्वतः सांगितल्या प्रमाणे “नरसिराम हे अत्यंत साधे आणि विनम्र आहेत.” नरसिरामला कोणती मदत हवी याबद्दल त्यांना विचारण्यात आलं. यावर नरसिराम यांनी आर्थिक मदत न घेता व्यवसायासाठी एका चांगल्या जागेची मागणी केली. यानंतर आनंद महिंद्र यांनी त्यांच्या मुंबईतील स्टुडिओ डिझाईन टीमची मदत घेतली.
आता डिझाईन टीमने नरसिराम यांच्यासाठी दुकानाच्या काही डिझाईन्स तयार केल्या आहेत. त्यातील एक डिझाईन निवडून त्याप्रमाणे पुढील काम सुरु होईल.
मंडळी व्यवसाय कोणताही असला तरी मार्केटिंग भारी करता आली पाहिजे हे नरसिराम यांच्या उदाहरणावरून कळतं.