मॅकडॉनल्ड तळलेल्या तेलाचा करतेय एक हटके वापर ! काय आहे त्यांचा इकोफ्रेंडली उपाय ?

तुमच्या आमच्या स्वयंपाकघरात काहीना काही दर आठवड्यात तळलेच जाते. सध्या तर पावसाचा मौसम आहे, तर भजी वड्यांचे तळण्याचे प्रमाणही घरात वाढत असते. खाणारे भजी वडे खाऊन तृप्त होतात. पण गृहिणीच्या समोर एक समस्या कढईत शिल्लक राहते. ही समस्या म्हणजे तळणीचे उरलेले तेल. या तेलात कार्बनचे बारीक सूक्ष्म कण तसेच राहून जातात. हे तेल पुन्हा पुन्हा वापरले तर हे कण जाळून जातात आणि खाद्यपदार्थांला घाणेरडा वास येतो. शेवटी हे तेल फेकून देण्याखेरीज दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही.

स्रोत

आपण आपल्यापुरता विचार केला तर ही समस्या आपल्या अर्ध्या-पाव लिटर जळलेल्या तेलाची असते. पण विचार करा, मॅकडॉनल्डसारख्या रेस्टॉरंटच्या प्रत्येक शाखेत हजारो लिटर तळणीचे तेल तयार होत असते. त्यांचे सर्वच खाद्यपदार्थ तेलात तळले जातात. हे तेल फेकून दिले तर पर्यावरणाला धोका उत्पन्न होईल आणि पुन्हा वापरले तर आरोग्याला धोका होईल. यावर मॅकडॉनल्ड्सने एक अफलातून उपाय शोधून काढलाय. आता मॅकडॉनल्ड्स या सर्व तेलाचे रुपांतर जैविक इंधनात (बायो फ्युएल) करून मॅकडॉनल्ड्सच्या सगळ्या गाड्या या इंधनावर धावणार आहेत. एकाच दगडात अनेक पक्षी मारणारा हा निर्णय ‘विक्रम ओगले’ यांनी नुकताच जाहीर केलाय. 

स्रोत

खरं तर याची रंगीत तालीम गेल्या वर्षीच सुरु झाली होती. मुंबईच्या शाखांमध्ये सध्या याच पद्धतीने इंधन निर्मिती होत आहे. ‘युनिकॉन बायो फ्युएल’ यांच्या सोबत मिळून मॅकडॉनल्ड्सने मुंबईतल्या ८५ रेस्टॉरंटमध्ये दर महिना तब्बल ३५,००० लिटर तळणीच्या तेलाचं इंधनात रुपांतर केलं आहे. एवढ्या तेलातून महिन्याला २४ लाख आणि वर्षाकाठी जवळजवळ ३ कोटी रुपयांची बचत मॅकडॉनल्ड्सने केली आहे. शिवाय डीझेल आणि पेट्रोलमुळे जो कार्बन हवेत सोडला जातो, त्याचा धोका या इंधनात नसतो. तळणीच्या तेलातून निघणारा कार्बन हा डीझेलच्या ७५ टक्के पेक्षा कमी असतो. 

मुंबईनंतर बंगलोरमध्ये असाच प्रयोग केला जाणार आहे. विक्रम ओगले’ यांना पुढील काळात मॅकडॉनल्ड्सच्या २७७ शाखांमध्ये तेलापासून जैविक इंधन तयार करायचं आहे.

स्रोत

मॅकडॉनल्ड्सच्या पावलावर पाऊल ठेवून जर इतर बड्या रेस्टॉरंट्सनी हा प्रयोग केला तर इंधनाची बचत आणि पर्यावरणाचं संरक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होतील.

विक्रम ओगले यांच्या बद्दल थोडक्यात :

विक्रम ओगले’ हे मॅकडॉनल्ड्सचे डायरेक्टर आहेत आणि ते २०१५ पासून या पदावर आहेत. २०१२ साली त्यांनी मॅकडॉनल्ड्समध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्याआधी त्यांनी एशियन पेंट्स, मारीको आणि सोनी DADC या कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required