'फ्रेन्डशिप डे'च्या दिवशी या मुलाने बापाचे ४६ लाख रुपये उडवले....एवढ्या पैश्याचं त्याने काय काय केलं माहित आहे का ?

आज गोष्ट सांगणार आहोत त्या मुलाची ज्याने बापाचे तब्बल ४६ लाख रुपये उधळले. मंडळी, त्याचं वय ऐकून तर याहून मोठा धक्का बसेल. तो १० वीत असून त्याचं वय अवघं १६-१७ वर्षाचं आहे. आता तुम्हाला सांगतो त्याने हे पैसे कुठे उधळले ते.
हा मुलगा जबलपूरच्या एका इस्टेट एजंटचा मुलगा आहे. बापाने एका घराच्या विक्रीतून ६० लाख रुपये मिळवले होते. हे पैसे कपाटात ठेवल्यावर या मुलाने त्यातले हाताला येतील तेवढे पैसे लंपास केले. ही ‘फ्रेन्डशिप डे’च्या वेळची घटना आहे. म्हणजे आपण समजू शकतोच की त्याने हे सगळे पैसे मित्रांवर उडवले.
त्याने मित्रांना २ लाख रुपयांची पार्टी दिली. एका मित्राला होमवर्क करण्याच्या बदल्यात साहेबांनी ३ लाख रुपये देऊन टाकले. आणखी एका गरीब मित्राला तब्बल १५ लाख दिले. तर गर्लफ्रेंडसाठी सोन्याची अंगठी विकत घेतली. त्याच्याच कृपेने त्याच्या वर्गातल्या आणि कोचिंग क्लास मधल्या मित्रांकडे आज स्मार्टफोन आहेत आणि हातात चांदीचे ब्रेसलेट आहेत. काही मित्रांनी तर या पुढे मजल मारली. त्यांनी तर चक्क कार विकत घेतली आहे. मैत्री निभावण्याच्या नादात त्यानं कुणालाही रिकाम्या हाती जाऊ दिलं नाहीय...
जेव्हा या पराक्रमी मुलाच्या वडिलांनी कपाट उघडलं तेव्हा तिथे पैसे नव्हते. मग त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना तपासात चोरीची एकही खुण सापडली नाही. तेव्हा या मुलाची आणि त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात आली आणि सगळं बाहेर पडलं.
मुलाच्या वडिलांनी पोलिसांना त्याच्या मित्राची एक यादी दिली आहे. पोलीस या सर्वांना शोधून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचं काम करत आहेत. ज्या मित्राला त्याने १५ लाख रुपये दिले होते तो सध्या फरार आहे. उरलेल्या मित्रांमधल्या ५ मित्रांच्या घरच्यांनी स्वतःहून पोलिसांना संपर्क साधला आहे. त्यांनी आठवड्याभरात पैसे परत देण्याचं काबुल केलंय. राव, शेवटी पोलिसांना फक्त १५ लाख रुपये वसूल करता आले आहेत.
राव, या प्रकरणात अडकलेली मुलं अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही. त्या मुलाबद्दल बोलायचं झालं तर घरातलं प्रकरण घरातच मिटवण्यात आलंय. पण मुलाला दोन चार रट्टे तर नक्कीच पडले असतील.