काय? तो १८ महिने हृदयाशिवाय जगला??

 २०१५ च्या नोव्हेंबर महिन्यात स्टान लार्किन नावाच्या २४ वर्षीय युवकाचं हृदय बंद पडलं.  यावर्षीच्या मे महिन्यात त्याच्या शरीरास जुळेल असं हृदय देणारा दाता भेटला आणि तब्बल ५५५दिवसांनी त्याला दुसरं हृदय मिळालं. हे ऑपरेशन अमेरिकेतल्या ’मिशिगन युनिव्हर्सिटीच्या फ्रॅंकेल कार्डिओव्हस्क्युलर सेंटर’ इथे पार पडलं. हे ५५५ दिवस त्याला एक यांत्रिक हृदय बसवण्यात आलं होतं आणि त्या हृदयाला सपोर्ट देणारी सिस्टिम सतत त्याच्यासोबत पाठीवरच्या बॅगेत ठेवण्यात आली होती. अशा प्रकारचं हृदय वापरणारा स्टान लार्किन हा जगातला पहिलाच पेशंट ठरला आहे. स्टान लार्किनचे हार्ट स्पेशालिस्ट, डॉ. जॉनाथन हाफ्ट यांनी हे ऑपरेशन सुखरूप पार पाडले. 

प्रथमत: स्टानला असं यांत्रिक हृदय बसवणं ही कल्पनाच आवडली नव्हती. सतत यंत्रांवर अवलंबून राहाणं कुणाला आवडेल? पण अर्थातच त्याच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. योग्य डोनर मिळाल्याशिवय त्याला नैसर्गिक हृदय बसवता येणार नव्हतं, त्यामुळे दरम्यानच्या काळात असे यांत्रिक हृदय आणि त्या हृदयाची स्पंदनं चालू ठेवणारी सिस्टीम या दोन गोष्टींवर स्टान लार्किन जिवंत राहू शकला. दरम्यानच्या काळात तो बास्केटबॉलही खेळू शकला. यावरून या तंत्राची कमाल लक्षात येते.  

अर्थातच, सर्वच हार्ट पेशंट्सना असे यांत्रिक हृदय बसवावे लागत नाही, पण या युवकाची एकंदरीतच शारिरीक परिस्थिती वेगळी असल्याने हा उपाय योजावा लागला. पूर्णपणे स्वावलंबी असं यांत्रिक हृदय शोधण्यात शास्त्रज्ञांना अजून   यश आलं नाहीय. सध्या तरी हृदय पंप करण्यासाठी पाठीवरच्या सपोर्ट सिस्टीमवरती अवलंबून राहावं लागतं आहे. परंतु एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी असं तंत्रज्ञान उपलब्ध असणं हीच आजच्या घडीला एक मोठी गोष्ट आहे. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required